"तिने फोडलेला हंबरडा...,तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत...", ममता सिंधुताईंची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:10 IST2025-08-18T14:09:43+5:302025-08-18T14:10:40+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई (Mamata Sindutai) यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

"She broke the hambarda..., why are you in such a hurry to leave...", Mamta Sindhutai's emotional post | "तिने फोडलेला हंबरडा...,तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत...", ममता सिंधुताईंची भावुक पोस्ट

"तिने फोडलेला हंबरडा...,तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत...", ममता सिंधुताईंची भावुक पोस्ट

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं शनिवारी (१६ ऑगस्ट) निधन झालं. ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई (Mamata Sindutai) यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

ममता सिंधुताईंनी फेसबुकवर लिहिलं की, ''प्रिय ज्योती ताई, असं अचानक तुमचं पुढच्या प्रवासाला निघून जाणं माझ्यासाठी न पचवता येण्यासारखं आहे. काल तुमचं शेवटचं दर्शन घेताना मला मात्र तुम्ही २००९ साली माईंना भेटायला आला होतात तेच आठवत होतं. सोबत नाजूक चणीची अतिशय गोड अशी तेजु शांतपणे तुमचा आणि माईंचा होणारा संवाद ऐकत होती आणि समजून घेत होती. तुम्ही मात्र माईंची प्रत्येक ढब, प्रत्येक हालचाल टिपून घेत होतात. मी 'सिंधुताई सपकाळ'मध्ये जशीच्या तशी माई वठवताना तुमची निरीक्षण शक्ती किती अफाट आहे हे कळून येत होतं.'' 

त्यांनी पुढे लिहिले की,''मध्यंतरीच्या काळात 'गझलरंग'च्या निमित्ताने आपल्या भेटी होत राहिल्या कधीतरी फोनवर बोलणं होत राहिलं पण कायमच तुम्ही मला माझ्या जवळच्या वाटत राहिल्या. काल तेजूला बघताना मला तुम्ही दिसत होतात ताई. मी या आधी जेव्हा कधी तेजूला भेटले तेव्हाची तेजू आणि कालची तेजू फार फरक जाणवला ताई. माझ्यासारखी ती ही अचानक मोठी झाल्यासारखी वाटली आणि तिच्या जागेवर मला मीच दिसू लागले.  तिचे वाहणारे डोळे तिने फोडलेला हंबरडा मी नाही समजू शकणार तर कोण समजू शकेल. ताई, मनुष्य जन्म नश्वर आहे हे माहीत आहे मला पण तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत ते मात्र प्रश्नचिन्हच आहे माझ्यासाठी. जिथे असाल तिथे आनंदात असा ताई. माईंची भेट झाली तर सांगा ममता ठीक आहे. तुमचा वसा आणि वारसा जबाबदारीने सांभाळते आहे. तुमची, ममता.''

Web Title: "She broke the hambarda..., why are you in such a hurry to leave...", Mamta Sindhutai's emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.