सचिन कुंडलकर म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे लाखो लोकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:40 PM2019-01-08T19:40:00+5:302019-01-08T19:41:42+5:30
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
यंदा 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे पार पडणार आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन मराठी साहित्य संमेलनाला २००० वर्षे आऊटडेटेड, खर्चिक आणि टाईमपास कार्यक्रम असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी सोशल मीडियावर साहित्य संमेलनावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमधून लाखो लोकांनी कुठेतरी जाऊन गोंधळ घालायच्या या कार्यक्रमांचा पुनर्विचार करता येईल का, असा सवाल उपस्थित केला आहे.
कुठल्या तरी अनोळखी जागी जाऊन भयंकर गर्दी करून भाषणे ऐकण्यापेक्षा ज्यांना भेटायचे आहे त्या लेखकांनी आणि कवींनी आपसांत फोन करून पुण्यामुंबईत किंवा चांगल्या निसर्गरम्य जागी जमून छोटी अनौपचारिक गेट-टुगेदर्स केली तर जास्त चांगले होणार नाही का, असा टोला त्यांनी लगावला आहे. साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुंडलकरांनी फेसबुकवर ही पोस्ट लिहिली आहे.
‘मला तर यवतमाळ कुठे आहे हेच माहीत नव्हते. ते आमच्या प्रणव सखदेवने समजावले. भरपूर मोकळेपणाने लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसे येऊन गर्दी करायची का गरज आहे? आपल्या पूर्वजांकडे संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे ती माणसे सारखी सणवार, उत्सव भरवून गर्दी करत. आजच्या काळात तसे करायची गरज उरली आहे का?,’ असा प्रश्न त्यांनी या पोस्टद्वारे विचारला आहे. सचिन कुंडलकरांच्या या पोस्टवर टीका होते आहे.