भारतीय चित्रपटांना रशियाची मोहिनी; हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांसाठी रशियाने अंथरलेय रेड कार्पेट

By संजय घावरे | Updated: June 7, 2024 21:43 IST2024-06-07T21:43:43+5:302024-06-07T21:43:53+5:30

रशिया आणि भारतीय सिनेसृष्टीमधील नातेसंबंध फार पूर्वीपासून अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. रशियाचा उल्लेख असलेले राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पे लाल टोपी रुसी...' हे गाणेही खूप गाजले

Russia's fascination with Indian films; Russia rolls out the red carpet for Hindi-South films | भारतीय चित्रपटांना रशियाची मोहिनी; हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांसाठी रशियाने अंथरलेय रेड कार्पेट

भारतीय चित्रपटांना रशियाची मोहिनी; हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांसाठी रशियाने अंथरलेय रेड कार्पेट

मुंबई - मागील काही वर्षांपासून रशियाने भारतीय चित्रपटसृष्टीला जणू मोहिनी घातली आहे. पूर्वी युरोपमध्ये चित्रीत होणाऱ्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी रशियाची वाट धरली आहे. रशियानेही भारतीय चित्रपटांसाठी जणू रेड कार्पेट अंथरल्याने 'पठाण', 'टायगर', 'सरदार उधम सिंग' या गाजलेल्या चित्रपटांसोबत वर्तमानातही काही चित्रपटांचे शूटिंग तिथे सुरू आहे.

रशिया आणि भारतीय सिनेसृष्टीमधील नातेसंबंध फार पूर्वीपासून अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. रशियाचा उल्लेख असलेले राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पे लाल टोपी रुसी...' हे गाणेही खूप गाजले. मध्यंतरीच्या काळात भारतीय सिनेमांच्या चित्रीकरण स्थळांची दिशा बदलली आणि अरब-गल्फसह युरोपीयन देशांना प्राधान्य दिले गेले. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये मात्र युरोपमधील नयनरम्य लोकेशन्सचे दर्शन घडले, पण युरोप विविध कारणांनी गैरसोयीचे ठरू लागल्याने भारतीय फिल्ममेकर्सनही रशियाची वाट धरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रवासाच्या दृष्टिकोनातून युरोपच्या तुलनेत रशियाचे अंतर खूप लांबचे आणि खर्चिक आहे. भारतीय आणि रशियन हवामानात खूप तफावत आहे. तिथे आठ-दहा महिने हिवाळा असतो. रशियातील बराचसा भाग बर्फाच्छादित असतो. भाषेचा फार मोठा अडसर येतो, तरीही रशियामध्ये शूट करणे भारतीय फिल्ममेकर्सना खूप फ्रेंडली वाटत आहे.

आदित्य चोप्रांच्या यश राज फिल्म्ससोबतच शाहरुख खानची रेड चिली एन्टरटेन्मेंट तसेच हिंदी सिनेसृष्टीतील इतर आघाडीच्या निर्मिती संस्थांनी बिग बजेट चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी रशियाला प्राधान्य दिल्याचे दिसते. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे तिथे चित्रीकरणासाठी काहींचा विरोध असूनही भारतीय सिनेसृष्टीने पाठिंबा दिल्याने आणि रशियानेही मैत्री कायम राखल्याने आणखी काही बिग बजेट भारतीय चित्रपटांचे शूटिंग तिथे सुरू आहे. शाहरुख खानचा 'पठाण', सलमान खानचा 'टायगर', विकी कौशलचा 'सरदार उधम सिंग', वरुण धवन-कियारा आडवाणी यांचा 'जुग जुग जिओ' यांसारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमधील मोठा भाग रशियात शूट झाला आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेला महेश मथाई दिग्दर्शित 'सारे जहां से अच्छा' हा अंतराळवीर राकेश शर्मांचा बायोपिकमधील बराचसा भाग रशियात शूट होणार आहे. याखेरीज रोहित शेट्टी पिक्चर्स, एम. ए. एन्टरटेन्मेंट, एक्सेल एन्टरटेन्मेंटसारख्या आघाडीच्या प्रोडक्शन हाऊसेसनाही रशिया खुणावत आहे.

भारतीय चित्रपटांसाठी बाजारपेठ
रशियात भारतीय चित्रपटांना चांगली मागणीही आहे. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग व्यतिरिक्त, अर्खांगेल्स्क, बेल्गोरोड, काझान, पेन्झा, सेराटोव्ह, तुला, उल्यानोव्स्क आणि चेबोकसरीसह ४० पेक्षा अधिक ठिकाणी भारतीय चित्रपट रशियन भाषेत डब करून प्रदर्शित केले जातात. त्यामुळे पुढील काही वर्षांत भारतीय चित्रपट रशियन चित्रपटांच्या बाजारपेठेवर पकड आणखी मजबूत करेल असे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दाक्षिणात्य सिनेमांमध्येही रशिया
एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या 'आरआरआर' चित्रपटासोबत अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा - द राईज', रजनीकांत यांचा 'रोबो २.०', 'विनर' असे बरेच दाक्षिणात्य चित्रपट रशियात शूट झाले आहेत. अजितचा 'वलिमै', विजयचा 'बिस्ट', 'कोब्रा', 'धाम धूम', 'अग्नी सिरगुगल' आदी कॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये रशिया आहे.
 

Web Title: Russia's fascination with Indian films; Russia rolls out the red carpet for Hindi-South films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.