रोमँटिक अन् थ्रिलरचा ‘शॉर्टकट’
By Admin | Updated: July 13, 2015 02:24 IST2015-07-13T02:24:21+5:302015-07-13T02:24:21+5:30
इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाइल, विविध अॅप्लिकेशन्सच्या कचाट्यात तरुणाई अडकत चालली आहे. एका बाजूला विज्ञानाची होणारी प्रगती उपयुक्त ठरत असली तरी

रोमँटिक अन् थ्रिलरचा ‘शॉर्टकट’
इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाइल, विविध अॅप्लिकेशन्सच्या कचाट्यात तरुणाई अडकत चालली आहे. एका बाजूला विज्ञानाची होणारी प्रगती उपयुक्त ठरत असली तरी दुसरीकडे त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी युवा पिढी पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावत असताना ‘शॉर्टकट’ घ्यायलाही मागे-पुढे पाहात नाही. अशाच घातक ठरू शकणाऱ्या सायबर क्राइम या विषयावर तयार करण्यात आलेल्या ‘शॉर्टकट’ या मराठी सिनेमाच्या टीमने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन ‘शॉर्टकट’ उलगडला.
अभिनेता वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि गायक कुशल देशपांडे यांनी संवाद साधला. सोशल मीडियावरील वावर सध्याच्या तरुण-तरुणींसाठी स्टेटस बनू लागला आहे. सतत हातात रेंगाळणाऱ्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेल्या या पिढीला आपण टेक्नोसॅव्ही म्हणतो; पण या तंत्रज्ञानाचे आता विपरीत परिणामही दिसू लागले आहेत. विविध अॅप्लिकेशन्सच्या जगात गुंतलेल्या या तरुणाईला आजूबाजूच्या जगाचाही विसर पडू लागला आहे. मग त्यामध्ये सख्खे मित्र असोत वा कुटुंबीय. अशाच एका तरुणाची कथा ‘शॉर्टकट’मध्ये उलगडण्यात आली आहे. या तरुणाची भूमिका वैभव तत्त्ववादी याने साकारली आहे. या भूमिकेविषयी तो सांगतो, की फेसबुक, ट्विटर हा जीवनाचा भाग आहे, पण जीवन नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. शाळेपासूनच खूप लाजाळू असलेला तरुण तंत्रज्ञानाच्या वापरात मात्र खूप तरबेज असतो. त्याआधारे तो हॅकर बनतो आणि पुढे त्यात गुरफटत जातो. तो कसा गुरफटत जातो आणि त्याच्या आयुष्याची कशी वाताहत होते, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
‘शॉर्टकट’मध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरेही असून, कथा-पटकथा हरीश राऊत यांची आहे. पटकथा त्यांच्यासोबत विजय नारायणे आणि राजेश बाळापुरे यांची आहे. शकील खान सिनेमॅटोग्राफर असून, सिनेमात रॉक संगीतासोबत रोमॅँटिक संगीताची मेजवानी मिळणार आहे. नीलेश मोहरीर, सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनीत दीक्षित, चॉँद साध्वानी आणि निक अशा संगीतकारांचे संगीत आहे. स्वप्निल बांदोडकर, कौशिक देशपांडे, मोहंमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, सावनी रवींद्र, आनंदी जोशी आणि राही यांनी गाणी गायली आहेत.