"चल मेरे भाय" म्हणणारे ऋषी कपूर साकारणार अमिताभच्या मुलाची भूमिका
By Admin | Updated: May 19, 2017 12:46 IST2017-05-19T12:46:33+5:302017-05-19T12:46:33+5:30
बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे

"चल मेरे भाय" म्हणणारे ऋषी कपूर साकारणार अमिताभच्या मुलाची भूमिका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - नसीब चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या छोट्या भावाची भूमिका निभावत "चल मेरे भाय" म्हणणारे ऋषी कपूर आता त्यांच्या मुलाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार आहेत.
गुजराती लेखक-दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’ या नाटकावर आधारित सिनेमा बनवला जात आहे. सिनेमात अमिताभ आणि ऋषी कपूर बाप - लेकाची भूमिका साकारताना दिसतील. गुजराती भूमिका साकारण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असेल.
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर दोघेही 80 च्या दशकातले सुपरस्टार होते. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दोघांचीही कारकिर्द यशस्वी ठरली. दोघांनी अनेक चित्रपटांमधून एकत्र कामही केलं. ‘अमर अकबर अॅन्थनी’,‘नसीब’,‘कभी कभी’, "अजुबा "यासारखे हिट चित्रपट त्यांनी दिले. १९९१ मध्ये आलेला ‘अजुबा’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. पण आता 26 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र येत असून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करताना दिसतील.
नेहमी वेगवेगळा प्रयोग करणारे अमिताभ या चित्रपटात 102 वर्षाच्या वृद्धाची भूमिका निभावणार असून चित्रपटातील अमिताभ व ऋषी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तरण आदर्श यांनी हा फोटो ट्विट केला आहे. उमेश शुक्ला या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. याआधी उमेश शुक्ला यांनी अभिषेक बच्चन, ऋषी कपूर आणि आसीनसोबत ‘ऑल इज वेल’ चित्रपट दिग्दर्शित केला होता