REVIEW : निराशाजनक ‘रंगून’!
By Admin | Updated: February 24, 2017 13:04 IST2017-02-24T13:04:43+5:302017-02-24T13:04:43+5:30
सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ सिनेमा आज बॉक्सऑफिसवर रिलीज झाला आहे.

REVIEW : निराशाजनक ‘रंगून’!
ऑनलाइन लोकमत/ जान्हवी सामंत
मुंबई, दि. 24 - सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ सिनेमा आज बॉक्सऑफिसवर रिलीज झाला आहे. गेल्या ब-याच दिवसांपासून या ना त्या कारणाने या सिनेमाची चर्चा होती, आता जाणून घेऊया हा सिनेमा कसा आहे?
सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत यांची मुख्य भूमिका असलेला रंगून सिनेमात स्वातंत्र्यपूर्व भारतातील एका 'वॉर रोमान्स'ची कहाणी आहे. यानिमित्ताने दुस-या महायुद्धादरम्यानची लव्ह ट्रँगलची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सिनेमातील काही भाग अतिशय सुंदर आहेत तर काही ठिकाणी सिनेमा अतिशय रटाळ वाटत आहे.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या बहुप्रतिक्षित-बहुचर्चित ‘रंगून’ सिनेमाकडून प्रेक्षकांना ब-याच अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात ‘रंगून’ने निराशा केली आहे. सैफ अली खान, शाहिद कपूर आणि ग्लॅमरस कंगना या दमदार तिकडीचा अभिनय केवळ कमजोर कथानकामुळे व्यर्थ वाटून जातो.
‘फिअरलेस नादिया’ या अॅक्शन लेडीच्या आयुष्याशी मिळत्याजुळत्या ज्युलिया (कंगना राणौत) नामक पात्राच्या एन्ट्रीसोबत सिनेमा सुरू होतो. दुसरे महायुद्ध सुरू आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना भारताला ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र करण्यासाठी लढत आहे. अशा युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक(शाहिद कपूर), रूसी बिलीमोरिया(सैफ अली खान) व ज्युलिया(कंगना) हे तीन पात्र आपल्याला भेटतात.
रूसी एका स्टुडिओचा मालक असतो. अॅक्शन स्टार व निर्माता असलेला रूसी एका स्टंटमध्ये आपला हात गमावतो आणि यानंतर त्याचे अॅक्शन करिअर संपुष्टात येते. ज्युलिया ही त्याकाळची एक लोकप्रीय अभिनेत्री असते तर नवाब मलिक ब्रिटीश सैन्यातला एक भारतीय जवान असतो.
जपानी सैन्याच्या तावडीत युद्धकैदी म्हणून आठ महिने घालवल्यानंतर नवाब मलिक एकदिवस त्यांच्या तावडीतून निसटतो. ज्युलिया ही रूसीच्या प्रेमात असते. एकदिवस रूसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न ती रंगवत असते. याचदरम्यान ब्रिटीश आर्मी आपल्या जवानांच्या मनोरंजनासाठी एका मोठ्या स्टारला पाठवण्याची विनंती रूसीला करते.
रूसी यासाठी ज्युलियाला बर्मा बॉर्डरवर पाठवण्याचा निर्णय घेतो. रूसी तिच्यासोबत जाऊ शकणार नसतो. त्यामुळे ज्युलियाच्या सुरक्षेसाठी तिच्यासोबत एका तुकडीला पाठवले जाते. या तुकडीत नवाब मलिकचाही समावेश असतो. पण अचानक स्थिती बिघडते आणि ज्युलिया व नवाब तुकडीपासून तुटून शत्रूंच्या भागात अडकतात.
शत्रूंच्या तावडीतून सुखरुप सुटून दोघांनाही भारतीय हद्दीत परतायचे असते. कोसळणारा पाऊस, उपासमार आणि शत्रूंची भीती अशा सगळ्या वातावरणात ज्युलिया व नवाबमध्ये आकर्षण व प्रेमाचा खेळ सुरू होतो. शत्रूंना चुकवून ज्युलिया व नवाब कसेबसे भारतीय सीमेवर पोहोचतात पण त्यांच्या प्रेमात रूसी अडथळा बनून उभा राहतो.
सिनेमा सुरुवात चांगली आहे. युद्ध आणि नवाब-ज्युलियाचे बहरते प्रेम यामुळे हा सिनेमा इंटरवलपर्यंत सुसह्य वाटतो. पण सेकंड हाफमध्ये युद्ध, प्रेम, विश्वासघात असा सर्व मसाला दाखवण्याच्या नादात सिनेमा कुठेतरी भरकटला आहे. सिनेमा रंगवण्याच्या नादात लांबच लांब दृश्ये आणि अनावश्यक क्लायमॅक्समुळे सिनेमा कंटाळवाणा होतो. पहिल्या हाफमध्येच सिनेमाचा शेवट काय होणार, हे कळून चुकल्याने सगळी उत्सुकताही संपते.
कागदावर सिनेमाची कथा इंटरेस्टिंग वाटत असली तरी प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना त्यात काहीही इंटरेस्टिंग जाणवत नाही. सिनेमातील गाणीही निस्तेज वाटतात. मुख्य पात्रांवर फारशी मेहनत घेतली गेलेली नाही, हेही स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे सगळ्या सिनेमाचा भार एकटी कंगना आपल्या खांद्यावर पेलताना दिसते. केवळ कंगना या सिनेमात काहीसा प्रभाव टाकते. पण दुदैवाने तिचे ग्लॅमर आणि स्टाईल हेच अधिक भाव खाऊन जाते.
कॅप्टन अमेरिकासारखे पात्र तर प्रचंड निराशा करते. दृश्यांपाठोपाठ दृश्य येतात. पण ग्लॅमर आणि स्टाईल यापलीकडे त्यातील काहीच आपल्याला अपील होत नाही. सिनेमाचे काही सीन्स चांगले आहेत. कंगना आणि जपानी अपहृत यांच्यातील काही सीन्स शिवाय कंगना व सैफ यांच्यातील एक दोन दृश्ये वगळली तर सिनेमा कुठेही तुम्हाला बांधून ठेवत नाही. सरतेशेवटी विशाल भारद्वाजच्या सिनेमाकडून इतकी निराशा अपेक्षित नाही.