हलीमसाहेबांना आदरांजली
By Admin | Updated: March 6, 2017 02:57 IST2017-03-06T02:57:55+5:302017-03-06T02:57:55+5:30
सतारीवर अद्भुत स्वरावली वाजवून जनमानसात अढळ स्थान मिळविणारे वादक म्हणून, अब्दुल हलीम जाफर खान खाँसाहेबांचे नाव इतिहासात कायमचे नोंदले गेले

हलीमसाहेबांना आदरांजली
-अमरेंद्र धनेश्वर
सतारीवर अद्भुत स्वरावली वाजवून जनमानसात अढळ स्थान मिळविणारे वादक म्हणून, अब्दुल हलीम जाफर खान खाँसाहेबांचे नाव इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे. हलीमसाहेबांचे जानेवारी महिन्यात वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. त्यांनी स्थापन केलेली ‘हलीम अकादमी आॅफ सितार’ ही संस्था त्यांचा सुपुत्र आणि शिष्य झुनन हलीम खान चालवणार आहे. यापूर्वीही तो सक्रीय होता. आता त्याच्या खांद्यावर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे. तो समर्थपणेही जबाबदारी पेलेल, असा विश्वास वाटावा, अशा पद्धतीने ‘खिराज’ हा कार्यक्रम शनिवारी वांद्रे रेक्लेमेशन परिसरातील माणिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
‘संगीत नाटक अकादमी’चे प्रमुख शेखर सेन हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. ‘संगीत नाटक अकादमी’ने खाँसाहेबांच्या शैलीचे आणि विचारधनाचे दस्तावेजीकरण करण्याच्या दृष्टीने एक प्रदीर्घ ध्वनिचित्रफीत तयार केली. त्या ध्वनिचित्रफितीच्या निर्मितीत सतारवादक आणि तबलावादक नयन घोष यांचा सहभाग होता. त्यातील संपादित भाग कार्यक्रमात दाखवण्यात आला. खाँसाहेबांची दिलखुलास मुलाखत बहारदार वाटली.
अश्विनी भिडे यांचे गायन नेहमीप्रमाणेच प्रभावी होते. त्यांनी ‘पूर्वा’ हा राग सुरुवातीला गायला. कोमल रिषभ, कोमल धैवत आणि शुद्ध मध्यमाचा प्रयोग असणारा हा राग जरी गंभीर प्रकृतीचा असला, तरी कुठेतरी हुरहुर निर्माण करतो. अश्विनी भिडेंनी त्यात प्राण ओतल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर, ‘नंदध्वनी’ हा स्वनिर्मित राग एका मध्यलय बंदिशीच्या माध्यमातून त्यांनी मांडला. ‘नंद’ आणि ‘हंसध्वनी’ या रोग रागांचे मिश्रण त्यात होते, ते मनोवेधक वाटले. विश्वनाथ शिरोडकर (तबला) आणि सीमा शिरोडकर (हार्मोनियम) यांची साथ उत्तम होती. दिल्लीचे सुप्रसिद्ध संतूरवादक भजन सोपोरी यांचे वादन त्यानंतर झाले.
>विद्या डेंगळेंचे वादन
‘ताजमहाल टी हाउस’ (वांद्रे पश्चिम लीलावती रुग्णालयाजवळ, सेंट जॉन बॅप्टिस्ट रस्ता) हे हिंदुस्तानी संगीताचे एक केंद्र म्हणून उदयाला आले आहे. रविवारी १२ मार्च रोजी सकाळी १० ते ११.३० या काळात व्हायोलिन वादक विद्या डेंगळे यांचे वादन ऐकायला मिळणार आहे. दिल्ली घराण्याच्या तालमीत त्या तयार झाल्या आहेत. महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. त्यातले आणखी वैशिष्ट्य म्हणजे, तबला साथ उन्मेषा आठवले ही युवती करणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
<‘संगीत नाटक अकादमी’ने खाँसाहेबांच्या शैलीचे आणि विचारधनाचे दस्तावेजीकरण करण्याच्या दृष्टीने एक प्रदीर्घ ध्वनिचित्रफीत तयार केली आहे. सतारवादक आणि तबलावादक नयन घोष यांचा यात मोठा सहभाग होता. त्यातील काही भाग या कार्यक्रमात दाखविण्यात आला.