विनोदातला साधेपणा कायम आठवत राहील...
By Admin | Updated: December 3, 2014 03:33 IST2014-12-03T03:32:42+5:302014-12-03T03:33:59+5:30
विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांनी एक काळ अक्षरश: गाजवला होता. त्यांचे विनोदी चित्रपट पाहण्यात एक पिढी घडली. त्यांनी चित्रपटातून विनोदातला साधेपणा खूप उत्तमरित्या पेश केला होता

विनोदातला साधेपणा कायम आठवत राहील...
अनुज अलंकार, मुंबई
विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांनी एक काळ अक्षरश: गाजवला होता. त्यांचे विनोदी चित्रपट पाहण्यात एक पिढी घडली. त्यांनी चित्रपटातून विनोदातला साधेपणा खूप उत्तमरित्या पेश केला होता. भूमिका कोणतीही आणि कितीही कठीण असली तरी ती अत्यंत सहजपणे साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. असा हा अवलिया कलाकार मात्र गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ बॉलीवूडपासून दूर होता. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या साध्या विनोदी अभिनयाचा पटच डोळ््यासमोर तरळला.
देवेन वर्मांनी आपल्या करिअरमधे विविध धाटणीच्या विनोदी भूमिका केल्या. पण गुलजार यांच्या 'अंगूर’ चित्रपट त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातील दुहेरी भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटात संजीव कुमार यांचीही दुहेरी भूमिका होती. त्यांच्याबरोबर दुहेरी भूमिका साकारणे हे खरेतर देवेन यांच्यासाठी आव्हान होते. पण ते आव्हानही त्यांनी लिलया पेलले. हा चित्रपट पाहताना एकाही दृश्यात क्षणभरही संजीवपेक्षा देवेन कमी आहे असे अजिबात जाणवत नाही. यावरून या दोघांच्यात स्पर्धा होती असे मुळीच नाही. उलट संजीव आणि देवेननी या भूमिका आपापल्या पद्धतीने सर्वांगसुंदर साकारल्या. आवर्जून बघावेत अशा बॉलीवूडमधील काही चित्रपटांच्या यादीत 'अंगूर’ चित्रपटाचा समावेश होतो.
देवेन यांनी हृषीकेश मुखर्जी, वासू चटर्जी आणि गुलजार अशांसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांबरोबर जास्त काम केले. सहज आणि साधेपणातून नेमका आशय चित्रपटातून मांडण्याची त्या तिघांची हातोटी होती. कठिण विषयही अगदी सोप्या पद्धतीने त्यांच्या चित्रपटातून मांडले जात. त्यामुळेच देवेनसारख्या कलाकाराचा अभिनय असा सहजपणे घडत गेला.
अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही देवेन यांनी आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला.मसाला चित्रपट बनवण्याकडे त्यांचा जास्त कल होता. पण त्याचबरोबर कलाकारांना सांभाळणे ही गोष्ट मात्र त्यांना जमली नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दाना पानी’ चित्रपटातून सामान्य माणसाला पोट भरण्यासाठी कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे संवेदनशीलपणे दाखवले होते. हा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाला रामराम ठोकला.
लोकांना हसवण्यासाठी फक्त अश्लील विनोदांची वा आचकट-विचकट हावभावांची गरज नसते तर अगदी साधासा विनोदही तुमच्या अभिनयकौशल्याने रंगू शकतो हे नेहमीच दाखवून दिले. किंबहुना हाच संदेश त्यांनी नकळतपणे दिला.