अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित "डॅडी" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:58 IST2017-06-14T10:41:28+5:302023-08-08T15:58:22+5:30
बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपाल याचा मोस्ट अवेटेड चित्रपट "डॅडी"चा ट्रेलर रिलीज झाला आहे

अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित "डॅडी" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपाल याचा मोस्ट अवेटेड चित्रपट "डॅडी"चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात अरुण गवळीचं कुटुंब, गुन्हेगारी, राजकारण आणि त्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा सर्व काही दाखवण्यात येणार आहे. अभिनेता अर्जून रामपाल मुख्य भुमिकेत असून अरुण गवळी साकारताना दिसणार आहे.
मंगळवारी रात्री चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये अर्जून रामपाल अरुण गवळीच्या भुमिकेत एकदम फिट बसत आहे. लांब केस आणि दाढी ठेवलेला अर्जून रामपाल कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या भुमिकेला उत्तम साकारेल अशी अपेक्षा आहे.
ट्रेलरमध्ये अरुण गवळी अंडरवलर्डमध्ये येण्यापासून ते न्यायालयाकडून शिक्षा होईपर्यंत सर्व काही दाखवण्यात आलं आहे. अरुण गवळीची ओळख असलेला पांढरा कुर्ता पायजमा आणि गांधी टोपीही अर्जुन रामपालने घातली आहे. गवळी समर्थकही लाडक्या ‘डॅडी’चा उदोउदो करताना पाहायला मिळतात. इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला ‘डॅडी’ हा चित्रपट अशिम अहलुवालिया यांनी दिग्दर्शित केला आहे.
अरुण गवळीवर याआधी चित्रपट बनवण्यात आले आहेत. मराठीत आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटात मकरंद देशपांडे गवळींच्या भूमिकेत दिसला होता.
अर्जून रामपाल याने चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी अरुण गवळी पॅरोलवर बाहेर असताना भेट घेतली होती. अरुण गवळीला समजून घेण्यासाठी त्याने खूप सारा वेळ सोबत घालवला. "बायोपिक बनवणं सोपी गोष्ट नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी जगजाहीर करत नाही. मी जेव्हा अरुण गवळीला भेटलो तेव्हा चित्रपटाची कथा ऐकवली. त्यांना चित्रपटाची कथा आवडली, तसंच चित्रपटासाठी आतमधील काही गोष्टीदेखील माहिती असणं गरजेचं असल्याचंही ते बोलले", असं अर्जून रामपालने सांगितलं आहे.