भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब

By Admin | Updated: August 28, 2015 11:41 IST2015-08-28T04:03:20+5:302015-08-28T11:41:56+5:30

मैत्री आणि बंधुभावाचा पाकिस्तानला संदेश देणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’नंतरचा दिग्दर्शक कबीर खान यांचा ‘फॅण्टम’ हा चित्रपट म्हणजे भारतीय भावभावनांचा आरसाच म्हणावा लागेल.

Reflections on the feelings of Indians | भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब

भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब

-  अनुज अलंकार (हिंदी चित्रपट परिक्षण)

मैत्री आणि बंधुभावाचा पाकिस्तानला संदेश देणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’नंतरचा दिग्दर्शक कबीर खान यांचा ‘फॅण्टम’ हा चित्रपट म्हणजे भारतीय भावभावनांचा आरसाच म्हणावा लागेल. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा जसा खात्मा केला, त्याचप्रमाणे भारतानेही पकिस्तानात घुसून मुंबई हल्ल्यातील दोषींना धडा शिकवावा, या भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर चित्रित करणाऱ्या कथासूत्रावर आधारित ‘फॅण्टम’ हा चित्रपट आहे.
लष्करात असलेला दानियाल खान (सैफ अली) काश्मीरमध्ये तैनात असतो. एका घटनेमुळे त्याला लष्करातून बडतर्फ केले जाते. तरीही तो एकटाच काश्मिरात राहतो. मुंबई हल्ल्यानंतर दिल्लीत ‘रॉ’ ही गुप्तचर संस्था एक मोहीम आखते. मुंबई हल्ल्यास जबाबदार असलेल्यांचा पाकिस्तानात घुसून खात्मा करण्याची जबाबदारी दानियालवर सोपविली जाते. या मोहिमेसाठी तो सुरुवातीला लंडनला जातो. तेथे त्याची भेट नवाजसोबत (कतरिना कैफ) होते. नवाजच्या मदतीने तो ‘लष्कर’च्या एका बड्या दहशतवाद्याचा खात्मा करतो. लंडनहून अमेरिकेत जाऊन दानियाल मुंबई हल्ल्याच्या कटातील हॅडलीला ठार करतो. त्यानंतर दानियाल पाकिस्तानात जाण्यासाठी सिरिया गाठतो. तेथून नवाजसोबत तो पाकिस्तानात दाखल होतो. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आणि सल्लाऊल्ला खानचा खात्मा करण्याचा त्याचा बेत असतो. या मोहिमेतही तो यशस्वी होतो. एकूणच फॅण्टम हा चित्रपट संदेश देण्यास यशस्वी झाला आहे. भावनात्मकदृष्ट्याही हा चित्रपट यशस्वी झाला आहे.
वैशिष्ट्ये : भारतीयांच्या भावना प्रतित करणारा हा चित्रपट आहे. मुंबई हल्ल्यावर एका पत्रकाराने लिहिलेल्या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक बेतले आहे. चित्रपटातील अनेक संवाद टाळ्या घेणारे तसेच दृश्ये देशभक्ती जागविणारी आहेत. चित्रणही (असीम मिश्रा) शानदार असून सिरिया आणि बैरुतमधील अ‍ॅक्शन दृश्ये हॉलीवूडच्या चित्रपटाच्या तोडीची आहेत.
कौसर मुनीर यांचे संवाद भिडणारे आहेत.

का पाहावा : पाकिस्तानात घुसून मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याची जिद्द.

का पाहू नये : एक था टायगर आणि एजंट विनोद यासारख्या चित्रपटांचा प्रभाव.

उणिवा : ‘एक था टायगर’चा प्रभाव या चित्रपटावर दिसतो. तसेच एजंट विनोदमधील पात्राचा सैफ अली खानवर प्रभाव असल्याचेही जाणवते. या दोन्ही बाबी टाळल्या गेल्या असत्या तर हा चित्रपट आणखी चांगला झाला असता. मध्यंतराआधीच चित्रपटाची गती धिमी होते. एडिटिंगच्या बाबतीतही कमकुवतपणा आढळतो. कतरिनाच्या देहबोलीतूनही ‘एक था टायगर’ची आठवण होते. गीत-संगीतही जेमतेम आहे.

Web Title: Reflections on the feelings of Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.