अन्यायाविरुद्ध आवाज उठवा
By Admin | Updated: April 25, 2017 23:52 IST2017-04-25T23:52:58+5:302017-04-25T23:52:58+5:30
पंखुरी अवस्थी सध्या एका मालिकेत अमला ही मुख्य भूमिका साकारत आहे. तिने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या एकंदर कारकिर्दीबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

अन्यायाविरुद्ध आवाज उठवा
पंखुरी अवस्थी सध्या एका मालिकेत अमला ही मुख्य भूमिका साकारत आहे. तिने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या एकंदर कारकिर्दीबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
पंखुरी, आज तू अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहेस, तुझ्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
- अभिनेत्री बनायचे हे मी लहानपणीच ठरवले होते; पण माझ्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्राशी संबंधित नसल्याने अभिनयक्षेत्रात प्रवेश कसा करायचा, हेच मला कळत नव्हते. मी कॉलेज जीवनात अनेक नाटकांमध्ये कामे केली आहेत. त्याच वेळात मला दूरदर्शनवरील एका मालिकेसाठी विचारण्यात आले. पण, काही कारणास्तव ही मालिका होऊ शकली नाही. पण, या मालिकेच्या निमित्ताने माझी काही लोकांशी ओळख झाली होती. त्यांनी मला माझ्या पहिल्या मालिकेच्या आॅडिशनबाबत सांगितले आणि तिथून माझ्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. मी या दरम्यान एका ठिकाणी नोकरीदेखील केली होती. पण, अभिनयात जम बसतोय हे लक्षात आल्यावर मी ही नोकरी सोडली.
तुझी मालिका अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करणार आहे, हे खरे आहे का?
आज आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय प्रगती केली आहे, तरीही आज आपण स्त्रिला दुय्यम वागवतो. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यास तिला पुन्हा जगण्याची उमेद न देता आपण प्रत्येक गोष्टीत तिच्यावरच बोट दाखवतो, यावरच आधारित आमची मालिका असून, मी एका हिमाचल प्रदेशमध्ये राहाणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. अमलावर बलात्कार झाल्यानंतर तिचे आयुष्य कशाप्रकारे बदलले हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका फातमागुल या तुर्किश मालिकेवर आधारित आहे.
एक स्त्री म्हणून तुझे या सगळ्या गोष्टींबाबत काय म्हणणे आहे?
एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला असल्यास तिला इतरांच्या पाठिंब्याची गरज असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. खरे तर तिची या सगळ्या गोष्टीत काहीही चूक नसते. पण, तरीही तिलाच अनेकवेळा सुनावले जाते. आज या सगळ्या गोष्टी बदलण्याची गरज आहे. बलात्कार पीडित व्यक्तीला समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. तिचे पुनर्वसन करण्यासाठी आपण सगळ्यांनी तिला मदत केली पाहिजे. अनेकवेळा बलात्कार पीडित स्त्रीला वाळीत टाकले जाते ही अतिशय वाईट गोष्ट आहे.
तू भारताच्या अनेक शहारांमध्ये राहिली आहेस, भारतातील शहरे ही स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत असे तुला वाटते का?
आज भारतातील कोणतेच शहर स्त्रियांसाठी सुरक्षित आहे असे मला वाटत नाही. कारण, रात्रीच्या वेळात आजही बाहेर पडताना स्त्री शंभर वेळा विचार करते. प्रचंड घाबरलेली असते. एक स्त्री कोणतेही दडपण मनात न ठेवता ज्यावेळी रात्री शहरात फिरू शकेल तेव्हा शहर स्त्रियांसाठी सुरक्षित झाले आहे असे मी म्हणेन. मी आज अभिनेत्री असल्याने चित्रीकरण संपवून घरी जायला मला नेहमीच खूप उशीर होतो. त्यावेळी माझ्या मनात घरी पोहोचेपर्यंत एक प्रकारची भीती असते. अनेक वर्षांपूर्वी मी बंगळुरू येथे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत फिरत असताना एका माणसाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यावेळी मी त्याच्या कानाखाली वाजवली होती. मुलींना शांत न बसता अशा लोकांना योग्य उत्तर देण्याची गरज आहे असे मला वाटते.