राहुल रवैल यांचा अमोल पालेकरांवर ‘निशाणा’
By Admin | Updated: September 27, 2015 02:00 IST2015-09-27T02:00:20+5:302015-09-27T02:00:20+5:30
‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाच्या निवडीला आॅस्कर निवड समितीचे अध्यक्ष असलेले अमोल पालेकर यांनीच विरोध केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केला आहे.

राहुल रवैल यांचा अमोल पालेकरांवर ‘निशाणा’
‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाच्या निवडीला आॅस्कर निवड समितीचे अध्यक्ष असलेले अमोल पालेकर यांनीच विरोध केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केला आहे. आॅस्करसाठी ‘कोर्ट’च्या निवडीला प्रथम विरोध करीत नंतर ’असे काही घडलेच नाही’ अशा आविर्भावात यांनी लगेच काहीशी पलटी मारली, असेही ते ‘सीएनएक्स’शी बोलताना म्हणाले. आपला पालेकर यांच्या कार्यपद्धतीला विरोध असल्यानेच निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
रवैल म्हणाले, ‘‘आॅस्करकरिता भारतीय चित्रपटांच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालेकरांनी आपली पत्नी संध्या गोखले आणि मुलीला बसण्याची परवानगी दिली असल्याचा गौप्यस्फोट करीत रवैल यांनी बैठकीचा इतिवृत्तांत ‘सीएनएक्स’शी बोलताना कथन केला. बैठकीमध्ये चित्रपटांविषयी चर्चा सुरू असताना पालेकर प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करीत होते. कोर्ट चित्रपटाची निवड व्हावी असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.
मते फिरवणे, चुकीची मतमोजणी, जाहीर केली जाणारी फसवी मतसंख्या आणि खोटे बहुमत हा प्रकार संतापजनक होता. मतसंख्या दाखविण्यास त्यांनी नकार दिला. फेरमतमोजणीची विनंतीही फेटाळण्यात आली. खरे तर त्यांच्या आणि अमोल पालेकर यांच्या डोक्यात वेगळाच चित्रपट होता, तो कोणता हे मी सांगू शकत नाही. मुळात त्यांची बायको बैठकीला बसूच कशी शकते? त्यांना बसविण्यामागचा हेतू काय? याची उत्तरे पालेकरांनी द्यावीत. त्यांना बैठकीमध्ये बसू न देण्यासाठी एकाही ज्युरी सदस्याने विरोध केला नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी जर खोटे बोलत आहे असे वाटत असेल तर पालेकर आणि मला एखाद्या वृत्तवाहिनीवर समोरासमोर आणावे मग सत्य बाहेर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले.
-------
‘कोर्ट’ला विरोधासाठी ज्युरींचे मन वळविण्याचा संध्या गोखले यांचा प्रयत्न
बैठकीच्या मध्यंतरामध्ये चहासाठी ज्युरी सदस्य बाहेर गेले असता त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न पालेकर यांची पत्नी संध्या गोखले करीत होत्या. त्यांच्या मते कोणताही मराठी चित्रपट ६० टक्क्यांच्या वर इंग्लिशमध्ये असू शकत नाही. ’कोर्ट’ हा ७० टक्के इंग्लिशमध्ये आहे. एका मराठी चित्रपट महोत्सवात हा चित्रपट रिजेक्ट झाला होता. त्यामुळे हा चित्रपटाची निवड कशी योग्य नाही हे सांगण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीवर बोलताना अमोल पालेकर म्हणाले, ’फिल्म फेडरेशन’ ही सर्व चित्रपटविषयक काम करणाऱ्या संस्थांची बाप संस्था मानली जाते. ही एक स्वायत्त संस्था आहे. हीच संस्था देशभरातील निर्मात्यांकडून एंट्री मागविते. त्यातून छाननी न करता ते सगळे चित्रपट आॅस्करच्या निवड समितीच्या ज्युरींकडे पाठविते. यंदाच्या वर्षी ३० चित्रपट आले होते. त्यामध्ये अगदी पीके, बाहुबली, बजरंगी भाईजान या चित्रपटांचा समावेश होता. यासाठी समितीकडे मग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेले किंवा समांतर सिनेमेदेखील पाठविले जातात. मात्र जो चित्रपट भारताचे दमदार नेतृत्व करेल अशा कलात्मक चित्रपटांची निवड समितीकडून केली जाते. ‘कोर्ट’ या निकषांवर बसल्यामुळे त्याची एकमताने निवड करण्यात आली.
--------
‘कोर्ट’ला बाजूला ठेवण्याचा पालेकरांचा प्रयत्न
केवळ रवैल यांनीच नव्हे तर आणखी एक ज्युरी सदस्य अरविंद सील यांनीही पालेकरांच्या मनमानी वृत्तीविरुद्ध वाचा फोडली आहे. आम्ही बैठकीमध्ये विविध टप्प्यांवर मत घेत होतो. एका अंतरिम मतप्रक्रियेच्या दरम्यान मार्गरिटा विथ स्ट्रॉ, काका मुट्टयी, मसान आणि कोर्ट या चार चित्रपटांच्या निकालामध्ये फेरफार करण्यात आले. जेव्हा शेवटच्या मतांची फेरतपासणी करण्यात आली, त्यात अमोल पालेकर यांनी चुकीचा निकाल जाहीर केल्याचे आढळले. ते जाणीपूर्वक ‘कोर्ट’ला बाजूला ठेवत होते. मी आणि दिग्दर्शक कमलेश्वर मुखर्जी सातत्याने कोर्टच्या बाजूने बोलत होतो. अंतिम टप्प्यात काका मुट्टयी आणि कोर्ट यामध्ये निवड करायची होती. निवड करणे अवघड होते. मात्र आॅस्करसाठी निवड करण्याकरिता ‘कोर्ट’च योग्य आहे, यावर सर्वांचेच एकमत झाले असल्याचे सील सांगतात.