सेलीब्रिटींच्या आत्महत्यांमागचे प्रश्न मात्र अनुत्तरितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 01:47 IST2016-04-04T01:47:14+5:302016-04-04T01:47:14+5:30
‘बालिका वधू’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली ‘आंनदी’ अर्थात प्रत्युषा बॅनर्जी हिने शुक्रवारी आपल्या गोरेगावस्थित निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली़ प्रेम संबंधातील चढउता

सेलीब्रिटींच्या आत्महत्यांमागचे प्रश्न मात्र अनुत्तरितच
‘बालिका वधू’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली ‘आंनदी’ अर्थात प्रत्युषा बॅनर्जी हिने शुक्रवारी आपल्या गोरेगावस्थित निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली़ प्रेम संबंधातील चढउतार हे या आत्महत्येमागचे कारण असल्याचे मानले जात आहे़ पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे़ पण आयुष्याचा डाव असा अर्ध्यावर सोडून गेलेली प्रत्युषा आपल्या मागे अनेक प्रश्न सोडून गेली आहे़ हे प्रश्न कालही अनुत्तरीत होते़़़ आजही आहेत़ कारण मायानगरीतील झगमगाटात प्रत्युषासारखी अकाली एक्झिट घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी बरीच मोठी आहे़
अपयश, प्रेमात मिळालेला धोका, एकटेपण, अनिश्चितता यापैकी नेमक्या कुठल्या गोष्टीने या अभिनेत्रींचा घात केला, ते कळायला मार्ग नाही़
पण, या अभिनेत्रींची अशी अकाली एक्झिट त्यांच्या चाहत्यांच्या चटका लावून गेली
हे नक्की़
जिया खान
ग्लॅमर, पैसा मिळवण्याचे स्वप्न घेऊन जिया खान मायानगरीत दाखल झाली़ त्यातच मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत जियाला पहिला ब्रेक मिळाला़ ‘नि:शब्द’ हा जिया खानचा पहिला चित्रपट़ खुद्द बिग बी अमिताभही या चित्रपटातील जियाच्या अभिनयाचे मुरीद झाले़ या चित्रपटाने जियाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली़ पण यानंतर जियाचा कुठलाही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यश मिळवू शकला नाही़ ‘गजनी’ या चित्रपटात जिया सहअभिनेत्री म्हणून झळकली़ यातील तिचा अभिनयही वाखाणल्या गेला़ अन् अचानक ३ जून २०१३ रोजी जियाने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी आली़ अपयश आणि सूरज पांचोलीकडून प्रेमात मिळालेला दगा यामुळे जियाने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला़
नफीसा जोसेफ
मॉडल व व्हिजे नफीसा जोसेफ एकेकाळची टॉपची मॉडेल़ पण हे स्थान डळमळायला लागले तसा कदाचित नफीसाचा आत्मविश्वासही डळमळला असावा़ २९ जुलै २००४ रोजी वसोर्वास्थित आपल्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली होती़ गळफास लावून नफीसाने स्वत:ला संपवले़
सिल्क स्मिता
अपार संघषार्नंतर सिल्क स्मिता हिने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये जम बसवला़ सुमारे ५०० चित्रपटांमध्ये सिल्क स्मिताने काम केले़ ‘क्वीन आॅफ साऊथ’चा किताबही मिळवला़ पण दुर्दैवाने ‘सेक्स सिम्बॉल’ यापलीकडे तिला दुसरी कोणतीही ओळख मिळू शकली नाही़ काही चुकीच्या लोकांच्या सल्ल्याला भुलून सिल्क स्मिताने दोन चित्रपटांची निर्मिती केली आणि कर्जाच्या गर्तेत बुडली़ तिच्या डोक्यावर २० कोटींचे कर्ज चढले़ सिल्क स्मिताला शेवटपर्यंत सच्च्या प्रेमाचा शोध राहिला़ पण तिचा हा शोध काही पूर्ण झाला नाही आणि अखेर २३ सप्टेंबर १९९६ रोजी सिल्कने चेन्नईस्थित आपल्या घरी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले.
दिव्या भारती
९० व्या दशकात दिव्या भारतीने प्रेक्षकांना जणू वेड लावले होते़ एैश्वर्य, यश, प्रसिद्धी सगळे काही तिच्या पायाशी लोळण घेत होते़ यादरम्यान अनेक कलाकारांशी तिचे नाव जोडले गेले़ साजिद नाडियावाला याच्यासोबत तिने लग्न केल्याच्याही बातम्या आल्या़ पण खरे काय ते जगाला कळण्याआधीच उण्यापुऱ्या १९ व्या वर्षी दिव्याचा पाचव्या माळ्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला़ हा खून होता, असाही आरोप झाला़ पाच वर्षे पोलिसांनी तपास केला आणि १९९८मध्ये दिव्याच्या मृत्यूची फाईल बंद झाली़ तिने आत्महत्या केल्याचेच अखेर अनेकांनी मान्य केले.
विवेका बाबाजी
‘कामसूत्र कॉडन्स’ जाहिरातीमुळे मॉडेल विवेका बाबाजी एका रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात आली़ पण यशाचा आलेख यानंतर घसरत गेला़ पैसा, प्रसिद्धी मागे पडली़ काळाच्या ओघात अनिश्चिततेच्या गर्तेत लोटली गेलेली विवेका यातून कधीच बाहेर पडली नाही़ २५ जून २०१० रोजी विवेकाने आपल्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकून जीवन संपवले.