हलकीफुलकी चटकदार ‘पाणी’पुरी ...!
By Admin | Updated: May 20, 2017 04:35 IST2017-05-20T04:35:53+5:302017-05-20T04:35:53+5:30
दोन घटका निव्वळ मनोरंजन होईल, असे चित्रपट हल्ली अभावानेच पडद्यावर आलेले दिसतात. ‘चि. व चि.सौ.का.’ या चित्रपटाने मात्र, हटकून करमणुकीचाच

हलकीफुलकी चटकदार ‘पाणी’पुरी ...!
- राज चिंचणकर
मराठी चित्रपट - चि. व चि.सौ.का.
दोन घटका निव्वळ मनोरंजन होईल, असे चित्रपट हल्ली अभावानेच पडद्यावर आलेले दिसतात. ‘चि. व चि.सौ.का.’ या चित्रपटाने मात्र, हटकून करमणुकीचाच वसा घेतल्याप्रमाणे ही गरज पूर्ण केली आहे. एक हलकीफुलकी गोष्ट मांडताना, ती चटकदार कशी होईल याचे व्यवधान राखत, पाणी आणि प्राणी या दोन घटकांना हाती धरत, हा चित्रपट धमाल मस्ती घडवून आणतो.
सत्यप्रकाश उर्फ सत्या आणि सावित्री उर्फ सावी यांची ही गोष्ट आहे. सत्या हा इंजिनीअर असला, तरी पराकोटीचा पर्यावरणप्रेमी आहे. सोलर एनर्जीच्या क्षेत्रात तो काम करणारा आहे. दुसरीकडे सावी ही प्राण्यांची डॉक्टर आहे आणि तिचे प्राणिमात्रांवर प्रचंड प्रेम आहे. इतके की रिक्षात बसतानाही ती आधी रिक्षावाल्याला तो शाकाहारी आहे की नाही, याची खातरजमा करून घेते, तर पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ न देण्यासाठी सत्याचा कायम आटापिटा चाललेला आहे. थोडक्यात, पाणीप्रेमीविरुद्ध प्राणीप्रेमी असा हा सामना आहे. दोघांच्याही घरचे आपापल्या मुलांची लग्ने व्हावीत, म्हणून त्यांचा पिच्छा पुरवत आहेत. लग्नासाठी ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमात सत्या व सावी समोरासमोर येतात. मात्र, त्यात सावी एक भलतीच अट सत्यासमोर ठेवते आणि या लग्नाचे चौघडे जोरजोरात वाजू लागतात.
धिंगाणा घालायचा हेतू पक्का करूनच परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी या जोडीने या चित्रपटाचा घाट घातला आहे. या दोघांनी मिळून लिहिलेली कथा, पटकथा व संवादांना दिग्दर्शक या नात्याने परेश मोकाशी याने स्वत:चा खास ‘टच’ दिला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेत काही ना काही खासियत पेरून ठेवण्याची खुबी त्यांनी वापरल्याने, यातली मंडळी धमाल घडवतात. यातल्या प्रत्येक प्रसंगाला मजेशीरपणाचे कोंदण आहे. सत्या व सावीचा दैनंदिन जगण्यातला अतिरेकीपणा, त्यांच्या कुटुंबीयांचे अर्कचित्रात्मक वागणे, सत्याच्या आजीची तरुणाई अशा अफलातून बैठकीमुळे ही गोष्ट अधिकाधिक रंजक होत जाते.
ललित प्रभाकर याने यात सत्या रंगवला आहे, तर मृण्मयी गोडबोले हिने यात सावी साकारली आहे. प्रेमापासून टोकाच्या भांडणापर्यंतचा त्यांचा हा धमाका खुसखुशीत आहे. दोघांची केमिस्ट्री छान जुळून आली आहे. या दोघांचे कुटुंबीय म्हणून भन्नाट कामगिरी पार पडणाऱ्या वऱ्हाडी मंडळींत सुप्रिया पाठारे, ज्योती सुभाष, पौर्णिमा तळवलकर, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, ऋतुराज शिंदे, आरती मोरे आदी मंडळींचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून हा वऱ्हाडी बँडबाजा धडाक्यात वाजवला आहे. ज्योती सुभाष यांची आजी तर फर्मास आहे. रागिणीच्या भूमिकेतल्या शर्मिष्ठा राऊतचा आक्रस्ताळेपणा, तसेच पुष्कर लोणारकरचा आगाऊपणा लक्षात राहतो.
भारत गणेशपुरे त्यांचा नेहमीचा बाज बाजूला ठेवून यात अस्सल मराठीत संवाद साधतात, हे खरे तर वेगळेपण आहे. मात्र, त्यांना सूत्रधाराच्या भूमिकेत आणून फार काही साध्य झालेले नाही. चित्रपटाचे संगीत दमदार आहे आणि यातले शीर्षक गीत कानांत रुंजी घालते. सुधीर पलसाने यांचे कॅमेरावर्कही मस्त जमून आले आहे. ऐन उकाड्यात हवेची थंडगार झुळूक यावी, तसा आल्हाददायक अनुभव देणारा हा चित्रपट असून, हा अनुभव उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावणारा आहे.