सकारात्मक ऊर्जेची आश्वासक पेरणी

By Admin | Updated: June 28, 2015 01:17 IST2015-06-28T01:17:05+5:302015-06-28T01:17:05+5:30

नैराश्य आले की आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात, पण मनावर ताबा असेल तर अशा नकारात्मक विचारांना दूर ठेवणे कठीण नाही. स्वत:चे दु:ख आभाळासमान

Positive Energy SUPPORT Sowing | सकारात्मक ऊर्जेची आश्वासक पेरणी

सकारात्मक ऊर्जेची आश्वासक पेरणी

‘वेलकम जिंदगी’
मराठी चित्रपट

- राज चिंचणकर

नैराश्य आले की आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात, पण मनावर ताबा असेल तर अशा नकारात्मक विचारांना दूर ठेवणे कठीण नाही. स्वत:चे दु:ख आभाळासमान वाटण्याच्या आणि त्यायोगे आत्महत्या करायला निघालेल्या व्यक्तीला अशा विचारापासून परावृत्त करणे महत्त्वाचे असते. पण समजा आत्महत्या करायला निघालेल्या व्यक्तीला अचानक एखादा कुणी असा भेटला की जो त्याला आत्महत्या कशी करायची याचे पद्धतशीर ट्रेनिंग देईल, तर हमखास चक्रावून जायला होणारच. पण हे सगळे आताच मांडायचे प्रयोजन काय, असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘वेलकम जिंदगी’ या चित्रपटात मिळू शकेल. हे सर्व दृश्यमान करताना नर्मविनोदी बाज या चित्रपटाने स्वीकारला आहे खरा; परंतु त्याचबरोबर त्यातून मिळणारा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो. नकारात्मक बाजूकडून सकारात्मक ऊर्जा मनात पेरण्याचा आश्वासक प्रयत्न या चित्रपटाने केला आहे.
आयुष्यातल्या अनेक घटनांनी मीरा ही तरुणी नैराश्याच्या चक्रात अडकली आहे आणि तिच्या मनात आत्महत्येचे वादळ घोंघावायला लागले आहे. ती या स्थितीतून जात असतानाच तिच्या जीवनात आनंद हा तरुण अनाहूतपणे प्रवेश करतो. पण गंमत अशी की तो तिला आत्महत्येपासून वाचवण्याऐवजी, ती कशी करावी याचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.
एवढेच नव्हे तर, आत्महत्या कशी करावी याचे ट्रेनिंग देणाऱ्या त्याच्या संस्थेत तो तिला एन्ट्री घ्यायला लावतो. आता सामाजिक आणि व्यक्तिगतदृष्ट्या हा सगळा उलटा प्रवास चित्रपटात का दाखवला आहे, याने संभ्रमित झाला असाल तर चित्रपटाचा उत्तरार्ध पाहणे मस्ट आहे. कोण असतो हा आनंद आणि तो अशा प्रकारचे उद्योग का करतो, याचा उलगडा करत हा चित्रपट जिंदगीला वेलकम करतो.
गणेश मतकरी याने या ‘जिंदगी’ची पटकथा आणि संवाद लिहिले असून, एक हटके गोष्ट त्याने यात चितारली आहे. अनपेक्षित असे धक्के देत ही गोष्ट पुढे सरकते. पूर्वार्धात पडद्यावर जे काही दिसते त्याने हबकायला होते; पण उत्तरार्धात त्यामागचे कोडे सुटत जाते. दिग्दर्शक उमेश घाडगे यांनी या गोष्टीला दिलेली ट्रीटमेंट चांगली आहे. एका क्षणी जीवन संपवण्याची आणि दुसऱ्या बाजूला आनंदाने जीवन जगण्यामधली विसंगती चित्रपटातून ठोसपणे उभी राहते. पण यात मध्यंतरापूर्वी आत्महत्येच्या ट्रेनिंगची दाखवलेली प्रात्यक्षिके आवश्यक होती का, असा विचार मनात येत राहतो. जरी या प्रश्नांचे निराकरण नंतर केले असले, तरी काही प्रसंगांना कात्री लावणे गरजेचे होते. चित्रपटाचा शेवटही लांबल्याचे जाणवते. चित्रपटाचा लूक मात्र फ्रेश आहे आणि हा फ्रेशनेस अभिनयाच्या पातळीवरही व्यक्त
होतो.
यात मीरा रंगवणाऱ्या अमृता खानविलकर हिची कामगिरी सरस आहे आणि तिने या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत. स्वप्निल जोशीने आनंद साकारताना त्याच्यातल्या नेहमीच्या स्टाईलला बाजूला सारण्याचा केलेला प्रयत्न यात दिसतो. आनंदाची पखरण करणारी ही व्यक्तिरेखा त्याने मस्त केली आहे.
मोहन आगाशे, भारती आचरेकर, प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री, महेश मांजरेकर, सतीश आळेकर अशी मोठी स्टारकास्ट यात असली, तरी त्यांच्या वाट्याला छोटे छोटे प्रसंग आले आहेत आणि त्यांनी ते त्यांच्यापरीने चांगले रंगवले आहेत. एकूणच, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने हा चित्रपट बघायला लावतो; परंतु त्यासाठी या चित्रपटाच्या पूर्वार्धाकडे मात्र कानाडोळा करायला हवा.

Web Title: Positive Energy SUPPORT Sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.