‘हम्प्टी शर्माची दुल्हन’ लोकप्रिय

By Admin | Updated: July 15, 2014 13:52 IST2014-07-15T13:52:56+5:302014-07-15T13:52:56+5:30

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मुळे बॉलीवूडमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्यात भर म्हणजे ‘एक व्हिलन’नेही १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

Popular 'Humpty Sharma's Bride' | ‘हम्प्टी शर्माची दुल्हन’ लोकप्रिय

‘हम्प्टी शर्माची दुल्हन’ लोकप्रिय

बॉलीवूडमध्ये यश- अपयशाची मालिका सुरूच असते. त्याचा प्रत्यय या आठवड्यात बघायला मिळाला. ‘हमशकल्स’, ‘एक व्हिलन’सारख्या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘बॉबी जासूस’ आणि ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटांमुळे तो आठवडा निराशादायक गेला. आता पुन्हा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मुळे बॉलीवूडमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्यात भर म्हणजे ‘एक व्हिलन’नेही १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
यंदा करण जोहरच्या कंपनीत बनलेल्या दुसऱ्या चित्रपटाने अनपेक्षित यश मिळवले आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आलिया आणि वरुण धवन ही जोडी होती. या जोडीने शहरी तरुणांचे मन जिंकण्यात बाजी मारली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ९ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. अपेक्षेनुसार चित्रपटाला वीकेंडही चांगला गेला. शनिवारी चित्रपटाने ११ कोटींपेक्षा जास्त तर रविवारच्या सुटीचा फायदा घेत चित्रपटाने १३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांत चित्रपटाने ३३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पुढच्या आठवड्यापर्यंत ही कमाई ५० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे.
कथेत दम असता तर चित्रपटाने अजून चांगला पल्ला गाठला असता. पण वरुण-आलियाचा अभिनय आणि संगीत या भक्कम बाजूंमुळे चित्रपट ‘हिट’ आहे.
यापूर्वीच्या आठवड्यात विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ने केवळ तीन दिवसांत सपाटून मार खाल्ला. फक्त १० कोटींची कमाई करत बॉक्स आॅफिसच्या स्पर्धेतून हा चित्रपट बाहेर पडला. मौखिक प्रसिद्धीचा फायदा होऊन चित्रपट तरेल, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने अपयशी चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला. तर ‘लेकर हम दिवाना दिल’ने पहिल्याच दिवशी सपाटून मार खाल्ला. या चित्रपटांच्या तुलनेत मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाला अमाप लोकप्रियता मिळाली. चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले असून १०३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
येत्या शुक्रवारी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यात ‘पिझ्झा’ हा हॉररपट, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’चा सिक्वल ‘हेट स्टोरी २’ आणि अमित साहनीच्या ‘लिस्ट’चा समावेश आहे. यापैकी कोणत्याही चित्रपटाकडून फारशा अपेक्षा नसल्या तरी हॉट सिन्स असल्याने ‘हेट स्टोरी २’ प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे.

टॉप ५ चित्रपट
> हम्प्टी शर्मा की दुल्हनिया - हिट
> बॉबी जासूस - फ्लॉप
> लेकर हम दिवाना दिल - सुपरफ्लॉप
> एक व्हिलन - सुपरहिट
> हमशकल्स - हिट

Web Title: Popular 'Humpty Sharma's Bride'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.