राजकारणातील वादळी पर्वाचा वेध!

By Admin | Updated: September 29, 2015 01:02 IST2015-09-29T01:02:27+5:302015-09-29T01:02:27+5:30

साधारण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी शालेय जीवनात भारताच्या पंतप्रधान म्हणून 'इंदिरा गांधी' हेच उत्तर अनेक वर्षे लिहिले आहे.

Political stroke watchers! | राजकारणातील वादळी पर्वाचा वेध!

राजकारणातील वादळी पर्वाचा वेध!

साधारण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी शालेय जीवनात भारताच्या पंतप्रधान म्हणून 'इंदिरा गांधी' हेच उत्तर अनेक वर्षे लिहिले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात वाढलेल्या पिढीला त्यांच्याविषयी आदर, दरारा व सुप्त आकर्षण कायमच वाटत राहिले. एक राजकीय वादळी पर्व, असा त्यांच्या कारकिर्दीचा उल्लेख केला जातो. हेच वादळ घोंघावत आता थेट रंगभूमीवर येऊन पोहोचले आहे. रत्नाकर मतकरी लिखित व दिग्दर्शित 'इंदिरा' हे नाटक इंदिरा गांधींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा सखोल वेध घेणारे आहे.
इंदिरा गांधींचे राजकीय कर्तृत्व ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे, त्यांच्यासाठी ही नाट्यकृती म्हणजे इतिहासाचे पान नव्याने उलगडणारी आहे आणि जी नवीन पिढी केवळ इंदिरा गांधींचे नाव ऐकून आहे, त्यांच्यासाठी हे नाटक म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधानांची ओळख करून देणारे आहे. भारतीय राजकारणात इंदिरा गांधी हे पर्व सर्वतोपरी वादळी राहिले आहे. अर्थात, त्यांच्याविषयी अनेक मतप्रवाह आहेत; परंतु देशाचे राज्यशकट सक्षमतेने हाकणारी कणखर स्त्री, ही त्यांची प्रतिमा जनमानसात आजही रूढ आहे. त्यांच्याबाबत विविध मतमतांतरे असली, तरी आजही परकीय आक्रमणाची चाहूल जरी लागली, तरी त्यांची आठवण प्रकर्षाने काढणारेही अनेक जण आहेत. राजकारणात घराणेशाहीची पद्धत रूढ करणाऱ्या, देशात आणीबाणी लागू करून लोकशाही स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशी त्यांची एक ओळख असली, तरी दुसऱ्या बाजूला परकीय शक्तीला सज्जड दम भरणारी रणरागिणी अशीही त्यांची प्रतिमा आहे.
देशातला आणीबाणीपूर्व काळ ते इंदिरा नावाचा अस्त, एवढा मोठा आवाका या नाटकाचा आहे. साहजिकच, इंदिरा गांधींच्या जीवनातले किती प्रसंग घ्यायचे याला सीमा नसल्याने हे नाटक थेट तीन अंकी झाले आहे. यात स्वत: इंदिरा गांधी, संजय, राजीव, मनेका, सोनिया, तसेच त्यांची जवळची मैत्रीण पुपुल जयकर ही घरातली मंडळी तर येतातच; परंतु नाट्यातला राजकीय रंग गडद करण्याच्या प्रवासात इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर.के. धवन, काँग्रेसचे तेव्हाचे नेते देवकांत बरुआ, सिद्धार्थ शंकर शर्मा, शारदाप्रसाद या मंडळींसह 'रॉं'चे अधिकारी आर.एन. काओ आदी व्यक्तिरेखाही प्रकटतात.
या नाटकात रत्नाकर मतकरी यांनी मुळातच राजकारणी इंदिरेपेक्षा एक माणूस, एक व्यक्ती म्हणून इंदिरा गांधी कशा होत्या यावर अधिक फोकस ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात ठसलेल्या इंदिरा गांधींच्या रूपाला मतकरींची इंदिरा वेगळ्या मार्गावर घेऊन जाते. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना त्यांनी संहितेत आणल्या असल्या, तरी त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या ऐवजी भावनिक, संवेदनशील अशी इंदिरा रंगवण्याचा ध्यास मतकरींनी नाटकात घेतलेला स्पष्ट दिसतो. त्यामुळे देशात आणीबाणी आणणारी इंदिरा, बांगलादेशला स्वतंत्र करणारी इंदिरा, सुवर्णमंदिरात धडाकेबाज कारवाई करणारी इंदिरा त्यांच्या संहितेतून त्वेषाने प्रकट होत नाही. इंदिरा गांधींना एक माणूस म्हणून ठसवण्याचा प्रयत्न मतकरी अधिक करताना दिसतात. परिणामी, नाटकात इंदिरेच्या व्यक्तिमत्त्वाला घरेलू असे काहीसे स्वरूप प्राप्त होत जाते.
राजकीय वारसदाराच्या नजरेतून पुत्र संजय गांधी यांच्याकडे पाहणारी, संजयच्या चुकांवर वेळोवेळी पांघरून घालणारी, स्वत: पंतप्रधानपदी विराजमान असताना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत होणारी संजयची लुडबूड पुत्रप्रेमापोटी खपवून घेणारी, एवढेच नव्हे तर प्रसंगी भावूक होणारी, संजय व राजीव या मुलांच्या, तसेच मनेका व सोनिया या सुनांच्या नात्यांत अडकलेली इंदिरा या नाटकात मतकरींनी सादर केली आहे आणि नाटकातले इंदिरेचे चित्रण सहानुभूतीच्या नजरेतून केले गेले असल्याचे स्पष्ट होत जाते.
दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून मात्र मतकरींनी हा प्रयोग छान रंगवला आहे. पण तरीही एका वादळाला केवळ हाताच्या ओंजळीत सामावून घेण्याचा केलेला अट्टहास त्यातून प्रकट होताना दिसतो. नाटकात नेपथ्य आहे ते इंदिरा गांधींच्या '१, सफदरजंग रोड' या निवासस्थानातील केवळ दिवाणखान्याचे ! त्यामुळे हा सगळा पट याच ठिकाणी साकारला जातो आणि संहितेपासून नेपथ्यापर्यंत इंदिरेची राजकीय नव्हे तर घरगुती स्वरूपाची प्रतिमा ठसवण्याच्या मतकरींच्या हेतूला अधिकच बळकटी येत जाते. अजित दांडेकर यांनी हे नेपथ्यनिर्माण केले आहे; मात्र रंगमंचाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खुर्चीची योजना खटकते. जरी सत्ताधीश म्हणून या खुर्चीचा प्रतीकात्मक उपयोग केला गेला असला, तरी नाटकाच्या सादरीकरणात ती अडथळा ठरत जाते.
चेहरेपट्टीत कमालीचे साम्य असलेल्या सुप्रिया विनोदने नाटकात इंदिरा गांधींची भूमिका तनमन पणाला लावून साकारली आहे. सुप्रियाची उंची जरी इंदिरेच्या व्यक्तिमत्त्वासाठी कमी वाटत असली, तरी तिने ही उणीव तिच्या अभिनयातून भरून काढली आहे. राजकारणी तसेच घरातली एक व्यक्ती म्हणून तिने ही भूमिका अंतर्बाह्य तयारीने रंगवली आहे. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी सुप्रियाला केलेली इंदिरेची रंगभूषा भन्नाट आहे आणि त्यातून इंदिरेचे व्यक्तिमत्त्व बेमालूम ठसते. संजय गांधींच्या भूमिकेत अभिनेता विक्रम गायकवाड यांना मोठी इनिंग खेळायला मिळाली आहे आणि त्यांनी ही कामगिरी चोख बजावली आहे.
जितेंद्र आगरकर (आर.के. धवन), अतुल महाजन (सिद्धार्थ शंकर शर्मा व स्वामी), सुयश पुरोहित (देवकांत बरुआ व शारदाप्रसाद), लीना पंडित (पुपुल जयकर) या कलावंतांनी त्यांच्या भूमिका उत्तम रंगवल्या आहेत. सतीश आगाशे (आर.एन. काओ), नकुल घाणेकर (राजीव), मनाली काळे (मनेका), पूर्वा नीलिमा सुभाष (सोनिया), भूषण गमरे (पत्रकार) आदी कलावंतांनी योग्य ते रंग भरले आहेत. शिवदास घोडके यांची वेशभूषा, परीक्षित भातखंडे यांचे पार्श्वसंगीत आणि शशांक वैद्य यांची प्रकाशयोजना यातल्या नाट्याला पूरक आहे. ज्यांना इंदिरा गांधींचा करिष्मा पूर्णत: माहीत आहे, त्यांना या नाटकात थोडीफार कमतरता जाणवू शकेल; परंतु इंदिरा गांधींचे केवळ नाव ऐकलेल्या पिढीला मात्र हे नाटक झपाटून टाकेल.

Web Title: Political stroke watchers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.