"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:54 IST2025-11-18T11:47:44+5:302025-11-18T11:54:11+5:30

Girija Oak : 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी', आणि 'जवान' सारख्या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी', आणि 'जवान' सारख्या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही प्रोजेक्टसाठी नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आहे.

तिचा साधेपणा, सोज्वळता आणि सौंदर्यामुळे प्रभावित होऊन चाहते तिला नवी 'नॅशनल क्रश' म्हणत आहेत. या सगळ्यादरम्यान, गिरिजाने तिच्या बालपणीच्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं.

अलीकडेच 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत, गिरिजा ओकने तिने गेल्या काही वर्षांमध्ये अनुभवलेल्या घटनांबद्दल सांगितले. असाच एक प्रसंग तिच्यासोबत लोकल ट्रेनमध्ये घडला होता.

गिरिजा म्हणाली, "लोकल ट्रेनमध्ये लोक तुम्हाला स्पर्श करून निघून जातात, किंवा जाणूनबुजून तुम्हाला धडकतात, हे दुर्दैवाने खूप सामान्य झाले आहे. तुम्हाला नेहमी सतर्क राहावे लागते."

तिने अशाच एका घटनेची आठवण करून दिली आणि सांगितले, "जेव्हा एका मुलाने माझ्यासोबत गैरवर्तन केले होते. तो कुठून आला हे मला कळले नाही कारण मला कोणतीही जाणीव झाली नाही. कदाचित तो एका बाजूने आला असावा."

ती पुढे म्हणाली, "त्याने त्याचा हात माझ्या पाठीवर फिरवला. माझ्या मानेपासून ते माझ्या पाठीपर्यंत आणि मग वेगाने वळून निघून गेला." तिला काय झाले हे समजण्यापूर्वीच तो मुलगा गायब झाला होता. ती त्याला ओळखू शकली नाही, किंवा त्याला पकडू शकली नाही.

गिरिजाने तिच्या शालेय जीवनातील आणखी एक आठवण देखील शेअर केली, जेव्हा तिने एका मुलाच्या थोबाडीत मारली होती जो तिला वारंवार त्रास देत असे. तिने सांगितले की, त्या अनुभवाने तिला स्वतःसाठी उभे राहायला शिकवले.

त्यानंतर तिने सांगितले की तिच्या कुटुंबातील महिलांनी, विशेषतः तिच्या आईने तिला कसे प्रेरित केले.

गिरिजा म्हणाली, "मी खरोखरच खूप भाग्यवान आहे. माझी आजी, माझी आई, मी ज्या सर्व स्त्रियांसोबत वाढले, ज्यांनी मला मोठे केले. त्या सर्वांनी नेहमीच दादागिरीचा आणि वाईट लोकांचा खंबीरपणे सामना केला आहे. तो देखील शांतपणे नाही, तर खूप उघडपणे आणि दृढतेने.''

"मी माझ्या लहानपणी माझ्या आईला बिनधास्त नडताना पाहिले आहे. जर कोणी त्यांना जाणूनबुजून ढकलले, किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांच्या पुढे गेले कारण अशा गोष्टी होतच राहतात, बरोबर? गर्दीच्या ठिकाणी, कोणीतरी तुम्हाला धडकेल, कोणीतरी तुम्हाला स्पर्श करून निघून जाईल हे होतच राहते.", असे गिरिजा म्हणाली.