Boney Kapoor Birthday : श्रीदेवींनी बोनी कपूर यांना राखी बांधली होती...; मग कशी सुरू झाली होती लव्हस्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 02:54 PM2022-11-11T14:54:44+5:302022-11-11T15:03:56+5:30

Boney Kapoor Birthday : मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे बोनी कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. बोनी कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिले. सगळ्यात खास म्हणजे त्यांची लव्हस्टोरी...

मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे बोनी कपूर आज 11 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. बोनी कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिले. सगळ्यात खास म्हणजे त्यांची लव्हस्टोरी.

होय, श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण याच श्रीदेवीच्या प्रेमात बोनी कपूर अक्षरश: वेडे झाले होते. श्रीदेवींनी कधी काळी बोनी कपूर यांना राखी बांधली होती. पुढे याच बोनी कपूर यांच्याशी त्यांनी लग्न केलं.

बोनी कपूर यांचं श्रीदेवींवर एकतर्फी प्रेम होतं. 1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमात चमकत असतानाच बोनी कपूर तिच्यावर फिदा झाले होते. 1978 साली श्रीदेवींचा पहिला हिंदी सिनेमा ‘सोलहवां सावन‘ रिलीज झाला आणि श्रीदेवींना पाहून बोनी जणू त्या सौंदर्याच्या प्रेमात पडले. इतकंच नव्हे तर श्रीदेवींसोबत चित्रपट बनवायचाच, असं त्यांनी ठरवलं.

बोनी कपूर ‘मिस्टर इंडिया’चा प्रस्ताव घेऊन श्रीदेवी यांना भेटायला गेले. पण माझं सर्व काम माझी आई बघते, असं म्हणून श्रीदेवींनी बोनी यांना आईकडे पाठवलं. माझी मुलगी सिनेमात काम करेन पण 10 लाख घेईन, असं श्रीदेवींच्या आईने ठणकावून सांगितलं. त्याचक्षणी 10 नाही, 11 लाख देईन असं म्हणत, बोनी यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी श्रीदेवींना फायनल केलं.

बोनी यांना श्रीदेवी आवडत होत्या. पण श्रीदेवी यांच्या मनात असं काहीही नव्हतं. म्हणूनच श्रीदेवी यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी बोनी यांना 12 वर्षे लागलीत. खुद्द बोनी यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.

‘मिस्टर इंडिया’च्या सेटवर बोनी स्वत: श्रीदेवी यांना काही त्रास तर नाही ना याची काळजी घ्यायचे. इतकंच नाही तर त्यावेळी त्यांनी श्रीदेवींसाठी वेगळा मेकअप रुम अरेंज केला होता.

एकीकडे ‘मिस्टर इंडिया’ तयार होत होता आणि दुसरीकडे बोनी कपूर यांचं श्रीदेवींवरचं प्रेम वाढत चाललं होतं. बोनी कपूर विवाहित होते. पण श्रीदेवींचा विरह त्यांना क्षणभरही सहन होईना झाला. एकदा तर श्रीदेवी चाँदनी चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्यांना भेटायला बोनी थेट स्वित्झर्लंडला गेले होते.

श्रीदेवींच्या जवळ राहण्याचे अनेक बहाणे बोनी कपूर शोधत असत. एकदा श्रीदेवींची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावं लागलं. हा संपूर्ण खर्च बोनी यांनी उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आल्या. पण याच काळात श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरात होत्या.

1984 मध्ये ‘जाग उठा इन्सान’च्या शूटींगदरम्यान श्रीदेवी व मिथुन यांचे प्रेम बहरलं होतं. खरं तर मिथुन दा यांना श्रीदेवीशी लग्न करायचं होतं. मात्र त्यासाठी मिथुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा, अशी श्रीदेवीची अट होती. तर श्रीदेवी आपल्याला धोका देते आहे असे मिथुन यांना वाटत होतं. कारण अर्थातच बोनी कपूर हे होतं.

बोनी कपूर व श्रीदेवी यांच्या तसलं काहीही नव्हतं तरी दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. याच कारणामुळे श्रीदेवी व मिथुन यांच्यात खटके उडायला लागले. असं म्हणतात की, मिथुन यांनी आपल्या प्रेमाची खात्री देण्यासाठी श्रीदेवींना बोनी कपूर यांना राखी बांधायला लावली होती. मात्र ज्याला राखी बांधली, त्याच व्यक्तिशी श्रीदेवींनी नंतर विवाह केला.

श्रीदेवी आणि बोनी कपूर 2 जून, 1996 रोजी लग्नबेडीत अडकले. असं म्हणतात की, श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. त्यामुळे घाईघाईत दोघांनी लग्न केलं. आज श्रीदेवी या जगात नाहीत. पण श्रीदेवींच्या अनेक आठवणी बोनी कपूर यांच्याजवळ आहेत.