पेंढारकर आणि साहित्य संघ
By Admin | Updated: August 12, 2015 04:47 IST2015-08-12T04:47:09+5:302015-08-12T04:47:09+5:30
साहित्य संघ मंदिरातील एक खोली ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्या कार्याची साक्षीदार आहे. साहित्य संघातील रंगमंचाच्या बाजूच्या जिन्यावरून वर

पेंढारकर आणि साहित्य संघ
साहित्य संघ मंदिरातील एक खोली ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्या कार्याची साक्षीदार आहे. साहित्य संघातील रंगमंचाच्या बाजूच्या जिन्यावरून वर गेल्यावर एक छोटा जिना आहे. येथून चढून गेल्यावर असलेल्या या खोलीत बसून अण्णांनी अनेक नाटकांचे आॅडिओ रेकॉर्डिंग करून त्यांचा संग्रह जपून ठेवला. ‘ललितकलादर्श’चे कामही ते गिरगावातील साहित्य संघाच्या पाचव्या मजल्यावरील एका खोलीत करायचे. संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
पेंढारकर ऊर्फ अण्णा हे पहिल्यांदा मुंबईत आल्यावर ओळखीच्या देसार्इंकडे मरिन ड्राइव्हला राहायला होते. यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांसह भाटिया रुग्णालयाजवळ राहायला आले होते. त्याच्या आधीपासूनच ते नेहमी संघात येत-जात असत. तेव्हा ते मला संघात येणारा एक नवीन मुलगा म्हणून ओळखायचे, असे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, कलावंत अरविंद पिळगावकर यांनी सांगितले. त्यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये मी त्यावेळी नाटक केले नव्हते. पण संघाच्या नाटकात काम करताना मला त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली ती संघातच. त्यांच्याबरोबर उगार या गावी एक प्रयोग करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्या नाटकात संपूर्ण पेंढारकर कुटुंब सक्रिय होते. ‘शारदा’चा प्रयोग होता तो. त्यानंतर १९८२-८३ला मला ‘बावन्नखणी’मध्ये दोन भूमिका दिल्या.
मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह सुहास भागवत यांनी सांगितले, की साहित्य संघाशी पेंढारकर यांचा अगदी जिव्हाळ््याचा संबंध होता. सत्तरी ओलांडल्यावरही ते संघात नियमित येत. पाचव्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत बसून ते अनेक तास त्यांचे काम करीत असत़ संस्थेच्या नाटकांच्या बरोबरीनेच संघाच्या नाटकांत, कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. संघातील अनेक कलावंतांनी त्यांच्याकडून शिस्तीचे धडे गिरवले. त्यांची शिस्त सर्वश्रूत आहे. नाटकाची तालीम ३ वाजता असल्यास सर्वांनी तीन वाजताच हजर राहिले पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता. एखाद्या नटाचा प्रवेश दुसऱ्या अंकात असो वा शेवटच्या़, त्यानेही तीनलाच यायचे, ही शिकवण मिळाली आहे. आठच्या ठोक्याला ते नांदी सुरू करायचे. स्टेजवरच्या खोलीत बसून त्यांनी अनेकांना नाटकांचे बॅकग्राउंड म्युझिक तयार करून दिले आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य नाटकांसाठी वाहून घेतल्यामुळे ते नेहमीच नाटकाच्या विचारात असायचे. संघात ऐंशीच्या दशकातही तरुण कलाकार आला की त्याला धोतर नेसता येते की नाही, हे ते पाहायचे. येत नसल्यास त्याला शिकायला सांगायचे. नाटकासाठी लागणाऱ्या गोष्टींपैकी सर्व गोष्टी सर्वांना जुजबी का होईना आल्याच पाहिजेत, असे ते नेहमी सर्वांना सांगायचे. (प्रतिनिधी)
वेगळ््या धाटणीची नाटके
भालचंद्र पेंढारकर यांनी विजय तेंडुलकर यांचे ‘झाला अनंत हनुमंत’ हे नाटकही केले होते. तर चीन युद्धानंतर ‘रक्त नको मज प्रेम हवे’ अशा वेगळ््या धाटणीची नाटकेही त्यांनी केली होती.