समाधानकारक गुणवत्तेने उत्तीर्ण

By Admin | Updated: April 15, 2017 02:34 IST2017-04-15T02:34:26+5:302017-04-15T02:34:26+5:30

अलीकडे विद्यार्थीदशेतल्या मुलांचे भावविश्व रेखाटणाऱ्या चित्रपटांची रांग लागल्याचे एकूणच चित्र आहे. ‘६ गुण’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. परंतु या चित्रपटाने

Passing satisfactory quality | समाधानकारक गुणवत्तेने उत्तीर्ण

समाधानकारक गुणवत्तेने उत्तीर्ण

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट- ‘६ गुण’

अलीकडे विद्यार्थीदशेतल्या मुलांचे भावविश्व रेखाटणाऱ्या चित्रपटांची रांग लागल्याचे एकूणच चित्र आहे. ‘६ गुण’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. परंतु या चित्रपटाने थोडी हटके भूमिका घेतल्याने तो अलीकडच्या काळात आलेल्या अशा प्रकारच्या चित्रपटांपेक्षा जरा वेगळा ठरतो. एक चांगला विषय यात हाताळला आहे; परंतु मांडणीत त्याला वेगळे वळण मिळाल्याने मात्र हा चित्रपट समाधानकारक गुणवत्तेने उत्तीर्ण झाल्याचे पाहावे लागते. पुस्तकी ज्ञान आणि अवांतर वाचन, शिस्त आणि मोकळीक, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा पातळीवर ही गोष्ट हेलकावे घेते. अर्थात, हाच या चित्रपटाचा कणा आहे. एका गावात राहणारा विद्या आणि त्याची आई सरस्वती यांची ही गोष्ट आहे. अतिशय कडक शिस्तीची असलेली ही आई, विद्यावर अभ्यासाचे प्रचंड ओझे ठेवून आहे. विद्या जात्याच हुशार असला, तरी त्याने नेहमी पहिलाच क्रमांक मिळवावा यासाठी तिचा अट्टाहास आहे. साहजिकच, विद्या हा केवळ पुस्तकी किडा बनून राहिला आहे. अशातच शहरातून आलेला राजू, विद्याच्या वर्गात प्रवेश घेतो आणि सर्वगुणसंपन्न अशा राजूमुळे विद्याच्या पहिल्या क्रमांकाला सुरुंग लागतो. परिणामी, सरस्वतीला प्रचंड धक्का बसतो. या पार्श्वभूमीवर, परदेशात वैज्ञानिक असलेले विद्याचे वडील, श्रीगणेश हे गावात येतात आणि त्यांना एकंदर स्थितीची कल्पना येते. नंतर यातून योग्य तो मार्ग काढत ही गोष्ट महत्त्वाच्या संदेशापाशी येऊन पोहोचते.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी किरण गावडे यांनी पेलली आहे. त्यांनी चित्रपटासाठी निवडलेला विषय योग्य आहे आणि त्यातून पालकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचावा, यासाठी केलेली पायाभरणी चांगली आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादल्यास मुलांची एकूणच वाढ खुंटते, यावर ही गोष्ट प्रकाश टाकते आणि हे पोहोचवण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. मात्र ते करताना, गोष्टीत काही अनावश्यक किंवा न पटणारे प्रसंग येतात आणि गोष्टीला वेगळे वळण लागते. शाळेतल्या अभ्यासापासून अचानक कबड्डीच्या खेळापर्यंतचा होणारा प्रवास आणि त्यासाठी पटकथेत करण्यात आलेले जोडकाम तितकेसे जमून आलेले नाही. हा एकूणच विषय चांगला असला, तरी तो अधिक नेटकेपणाने समोर यायला हवा होता. विद्याच्या वडिलांचे काही कबड्डीपटू मित्र विद्याच्या साह्याला धावून येणे, राजूने वय आणि अनुभवाची मर्यादा पार करत विद्याच्या आईला उपदेश करणे, विद्याच्या तोंडी देण्यात आलेले ‘राजहंस’चे पालुपद, सरस्वतीने सतत चाबूकस्वाराच्या थाटात वावरणे अशा काही गोष्टी खटकतात. परंतु, मुलांचे विश्व चितारताना यात इतर चित्रपटांसारखी प्रेमकथा वगैरे न घुसडण्याचा घेतलेला निर्णय मात्र अगदी योग्य आहे. चित्रपटाच्या तांत्रिक पातळीवर, सुरेश देशमाने यांचे कॅमेरावर्क नजरबंदी करणारे आहे; तर लोकेशन्स नजर खिळवून ठेवणारी आहेत.
अभिनयाच्या पातळीवर, विद्याच्या आईच्या म्हणजे सरस्वतीच्या भूमिकेत अमृता सुभाष असली, तरी तिची नाजूक चण आणि तिच्या भूमिकेला असलेला सततचा कठोर भाव यांची सांगड जुळत नाही. मात्र तिने तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. विद्याच्या भूमिकेत अर्चित देवधर याने समजूतदारपणे बॅटिंग केली आहे. अजिंक्य लोंढे याचा राजू लक्षात राहतो. इतर भूमिकांमध्ये सुनील बर्वे, प्रणव रावराणे, अतुल तोडणकर, सिद्धेश परब आदींची कामगिरी ठीक आहे. पालक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना सामावून घेणारा हा चित्रपट असून, तो संवेदनशील पातळीवर रेंगाळणारा आहे. पण यातून पालकांनी ‘धडा’ मात्र नक्कीच घेण्यासारखा आहे.

Web Title: Passing satisfactory quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.