दुबळ्या पटकथेमुळे रंग फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 02:53 AM2016-04-25T02:53:01+5:302016-04-25T02:53:01+5:30

दिग्दर्शक सय्यद अहमद अफजल यांचा लाल रंग हा चित्रपट गैरकारभाराच्या त्या जगात घेऊन जातो, जिथे ब्लड बँकेपासून ते डॉक्टरांच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक बाबी समोर येतात

Pale flick due to a poor screenplay | दुबळ्या पटकथेमुळे रंग फिका

दुबळ्या पटकथेमुळे रंग फिका

googlenewsNext

दिग्दर्शक सय्यद अहमद अफजल यांचा लाल रंग हा चित्रपट गैरकारभाराच्या त्या जगात घेऊन जातो, जिथे ब्लड बँकेपासून ते डॉक्टरांच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक बाबी समोर येतात. या गंभीर विषयाचा मसाला चित्रपट बनविताना रोमान्सचा तडकाही दिला आहे.
चित्रपटाचे कथानक सुरू होते ते हरियाणातील कर्नाल येथून. येथे एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ब्लड बँकेत रक्ताचा अक्षरश: खेळ मांडला गेला आहे. महागड्या दरात रक्ताचा पुरवठा करणे आदी प्रकार सुरू आहेत. तर रक्तदान करणाऱ्यांनाही या प्रकरणात जोडले गेले आहे. या सर्व प्रकरणात केंद्रस्थानी आहे शंकर (रणदीप हुड्डा), जो या महाविद्यालयात शिकत असतानाच या टोळीचा प्रमुख होतो आणि लाखो रुपये कमावतो. याच महाविद्यालयात राजेश (अक्षय ओबेराय) प्रवेश घेतो. शंकर आणि राजेशची प्रथम मैत्री होते. नंतर राजेशही शंकरच्या या गैरकारभाराचा भाग बनून जातो. याच महाविद्यालयात शिकत असलेल्या नीलमसोबत (पिया बाजपेयी) राजेशचे प्रेम आहे. रक्ताच्या विक्रीचा जो खेळ सुरू आहे त्याला एकदम कलाटणी मिळते. कारण एचआयव्ही पॉझिटिव्ह पीडिताचे रक्त येथून विक्री केले जाते आणि पोलीस येथे धरपकड सुरू करतात. प्रथम राजेशला पकडले जाते; परंतु शंकर सर्व गुन्हे कबूल करतो आणि राजेशची सुटका होते. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तुरुंगातून सुटलेला शंकर एक नवे आयुष्य सुरू करतो.
> उणिवा
दिग्दर्शक सय्यद अहमद यांनी एक गंभीर विषय हाताळला आहे; पण विस्कटलेल्या पटकथेने चित्रपटाला दुबळे बनविले आहे. रक्त विक्रीचा गैरकारभार आणि फिल्मी मसाला या चक्रात चित्रपट भरकटत जातो. राजेश आणि नीलम यांचा रोमान्स हा चित्रपटाच्या मूळ कथानकाशी कुठे ताळमेळ खात नाही. चित्रपट मसालेदार करण्यासाठीच हे करण्यात आले आहे. शंकरची प्रेमकहाणीही अर्ध्यावरच राहते.
ब्लड बँकेच्या या प्रकरणाला गांभीर्याने दाखविण्यात आले नाही. चित्रपटात एक गफलत अशी झाली आहे की, दिग्दर्शकाचा पूर्ण फोकस शंकरच्या भूमिकेवर राहिला आहे. ज्यामुळे दुसरे पात्र प्रकर्षाने समोर आले नाहीत. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर शंकरच्या भूमिकेतील रणदीपशिवाय उर्वरित कलाकार सामान्य वाटतात. राजेशच्या भूमिकेत अक्षय ओबेरॉय प्रभाव पाडू शकलेला नाही.
पिया बाजपेयी आणि शंकरची गर्ल फ्रेंड मीनाक्षी
दीक्षित फक्त ग्लॅमरसाठी आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या
भूमिकेत राजेश दुग्गलही सामान्यच वाटतात.
दिग्दर्शक म्हणून सय्यद अहमद अफजल एकदम दुबळे असल्याचे जाणवते.
> वैशिष्ट्ये :
रणदीप हुड्डाचा अभिनय या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. तो हरियाणाचा असल्यामुळे तेथील भाषा व इतर बाजू त्याने ताकदीने मांडल्या आहेत. छायाचित्रीकरण आणि संगीतही चांगले आहे. एकूणच काय तर रणदीप हुड्डाचा अभिनय आणि चांगला विषय असूनही या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा करणे अवास्तव ठरेल.

Web Title: Pale flick due to a poor screenplay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.