‘नटसम्राट’चा केला ‘एकच प्याला!’

By Admin | Updated: February 7, 2016 04:26 IST2016-02-07T04:26:11+5:302016-02-07T04:26:11+5:30

गणपतराव बेलवलकर या एका नटसम्राटाच्या आयुष्याच्या शोकांतिकेला जी कारुण्याची झालर होती तिच्यावर ‘नटसम्राट : असा नट होणे नाही’ या चित्रपटाद्वारे धंद्याच्या मोहाची दारू टाकून ‘नटसम्राट

'Nut Samrat' banana 'single cup!' | ‘नटसम्राट’चा केला ‘एकच प्याला!’

‘नटसम्राट’चा केला ‘एकच प्याला!’

कारुण्याच्या झालरीवर धंद्याच्या मोहाची दारू
गणपतराव बेलवलकर या एका नटसम्राटाच्या आयुष्याच्या शोकांतिकेला जी कारुण्याची झालर होती तिच्यावर ‘नटसम्राट : असा नट होणे नाही’ या चित्रपटाद्वारे धंद्याच्या मोहाची दारू टाकून ‘नटसम्राट’ या अभिजात कलाकृतीचा ‘एकच प्याला’ केला आहे...

एखाद्या कलाकृतीचे चित्रपटामध्ये माध्यमांतर करताना ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ची चर्चा होते. दिग्दर्शकाचा तो अधिकार असल्याने ती घेण्यासही हरकत नाही. पण ही ‘लिबर्टी’ छिन्नीसारखी वापरून त्या कलाकृतीतील सौंदर्य कोरून घ्यावे. या लिबर्टीची पहार वापरून मूळ नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखेवरच प्रहार करणे म्हणजे त्या व्यक्तिरेखेची हत्याच जणू. ‘नटसम्राट’ चित्रपटातही हाच प्रकार घडला असून, गणपतराव बेलवलकर या एका नटसम्राटाच्या आयुष्याच्या शोकांतिकेची जी कारुण्याची झालर होती तिच्यावर धंद्याच्या मोहाची दारू टाकून या अभिजात कलाकृतीचे नुकसान केले आहे.
प्रख्यात नाटककार शब्दप्रभू वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिभेतून उतरलेले शब्दलेणे म्हणजे ‘नटसम्राट!’ या नाटकातील कथावस्तूला खूप महत्त्व असल्याने मूळ नाटकाला कोठेही धक्का दिला जाणार नाही, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेता-निर्माता नाना पाटेकर यांनी सांगितले होते. परंतु, मूळ नाटकात नसलेली रामभाऊ ही विक्रम गोखले यांनी साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात आणली गेली. नाना आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणून प्रेक्षकांनीही ती आनंदानं स्वीकारली. परंतु, शिरवाडकरांनी आप्पासाहेब ही व्यक्तिरेखा मांडताना ‘किंग लिअर’चा आधार घेतला होता. वार्धक्याची ही करुण कहाणी मांडली होती. नात्यांतील उसवत जाणारी वीण माणसाला किती उद्ध्वस्त करते, हे मांडले होते. ते सगळे विसरून चित्रपटामध्ये आप्पासाहेब हे चक्क दारुडे दाखविण्यात आले आहेत. हे आता आणखी प्रकर्षाने जाणवायचे कारण म्हणजे चित्रपटात एक प्रयोग म्हणून नव्याने समाविष्ट केलेल्या प्रसंगात आप्पासाहेब आणि रामभाऊ आयुष्याचा जमा-खर्च मांडताना त्यांच्या हातात दारूचे प्याले देण्यात आले आहेत.
‘एकीकडे ते, ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले आणि दुसरीकडे तू, ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरलास तर विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही म्हाताऱ्यांनी जायचे तरी कोठे?’ असे म्हणून वार्धक्याचे धगधगीत वास्तव मांडणारे आप्पासाहेब चित्रपटात मात्र कायमच हातात दारूचा प्याला घेऊन आपले मद्यधुंद अवस्थेतील तिरकस वाग्बाण घेऊन तयार. चित्रपटातील पार्टीच्या प्रसंगात तर आप्पासाहेब दारूवर कविताच ऐकवितात. ते म्हणतात... ‘तू पी आॅर नॉट तू पी, दॅट इज अ क्वेश्चन, प्यावी की पिऊ नये हा एक जटिल सवाल आहे.’ जगण्याच्या मंथनामध्ये माणसाच्या हाती लागले एक अद्भुत रसायन. रंग, रूप, रस, नाद आणि गंध अशी पंचेंद्रियांना उत्तेजन देणारे. देहाच्या आत असलेल्या प्राणाला उन्मयी अवस्था प्रदान करणारे. अश्वस्त, तळमळणाऱ्या जिवांवर शांतपणे फुंकर घालणारे... सोमरस, मदिरा, वारुणी, सुरा, शांभवी किती सुंदर नावे हिची, चेटकिणीच्या जादूसारखी भलतीच भारी कामं हिची. देहाला घोटागणिक पिसासारखे हलकं करते, मनावरचं दाट धुकं चुटकीसरशी पुसून टाकते... सैतानाने यात आपली किती गुपितं दडविली, कैक नवऱ्यांची काळीजं सिंहासारखी घडविली...

Web Title: 'Nut Samrat' banana 'single cup!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.