नोव्हेंबर महिना अनलकी
By Admin | Updated: December 4, 2014 01:31 IST2014-12-04T01:31:33+5:302014-12-04T01:31:33+5:30
आॅक्टोबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरूख खानचा ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगले यश मिळाले.

नोव्हेंबर महिना अनलकी
अनुज अलंकार, मुंबई
आॅक्टोबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरूख खानचा ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला. मुख्य म्हणजे नोव्हेंबर महिना तर बॉलीवूडसाठी अत्यंत वाईट ठरला. नोव्हेंबरमध्ये जवळपास डझनपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. पण या सर्वच चित्रपटांची बॉक्स आॅफिसवरची अवस्था खूप वाईट होती. चित्रपट व्यवसायातील जाणकारांच्या मते, अपयशी चित्रपटांमुळे फक्त नोव्हेंबर महिन्यात बॉलीवूडचे शंभर कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
इंद्रकुमार दिग्दर्शित रेखाचा ‘सुपरनानी’ हा चित्रपट ३१ आॅक्टोबरला प्रदर्शित झाला असला तरी त्याचे भवितव्य नोव्हेंबर महिन्यातच ठरणार होते. रेखाची जादू म्हणावी तशी न चालल्याने हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर याच महिन्यात केतन मेहतांचा ‘रंगरसिया’, अक्षय कुमारचा ‘शौकीन्स’, यशराजचा ‘किल दिल’, सैफ अली खान प्रोडक्शनचा ‘हॅपी एंडिंग’ आणि करण जोहरच्या कंपनीत ‘उंगली’ असे महत्त्वाचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. याशिवाय काही कमी बजेटच्या चित्रपटांची संख्याही जास्त होती. पण या सर्वच चित्रपटांना अपयश आले असून बिग बजेटच्या काही चित्रपटांनी आपले निर्मितीमूल्यही वसूल केलेले नाही. ‘सुपरनानी’ चित्रपटाचे निर्मितीमूल्य १८ कोटींच्या आसपास होते. मात्र त्याने तीन कोटींपेक्षा कमी कमाई केली. केतन मेहतांचा ‘रंगरसिया’ प्रदर्शित होण्यासाठी तब्बल ९ वर्षे लागली. २२ कोटी निर्मितीमूल्य असलेल्या या चित्रपटाने ५ कोटींपेक्षाही कमीच कमाई केली. अक्षय कुमारच्या शौकीन्सचे ४० कोटी निर्मितीमूल्य होते, पण त्याने २८ कोटींच्या आसपास कमाई केली. यशराजचा ‘किल दिल’ चित्रपट ४० कोटींमध्ये बनला होता. त्याने ३० कोटी कमावले. सैफ अली खानच्या ‘हॅपी एंडिंग’ चित्रपटाला मात्र मोठे नुकसान सहन करावे लागले. चित्रपटाचे निर्मितीमूल्य ५५ कोटींचे होते, पण हा चित्रपट २० कोटीही कमावू शकला नाही. तर करण जोहरच्या कंपनीत तयार झालेल्या ‘उंगली’ची अवस्था त्याहून वाईट होती. ३५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १४ कोटींच्या आसपास कमाई केली.
तर छोट्या बजेटच्या चित्रपटांना लाखाच्या कमाईवरच समाधान मानावे लागले. या चित्रपटांमधील डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘झेड प्लस’ चित्रपटाने आतापर्यंत फक्त ४० लाखांची कमाई केली आहे.