मराठीत रुजतोय ‘वर्कशॉप’चा नवा ट्रेंड
By Admin | Updated: January 6, 2016 01:30 IST2016-01-06T01:30:36+5:302016-01-06T01:30:36+5:30
कोणताही आविष्कार किंवा कलाकृतीच्या परिपूर्णतेतून यशस्वितेची दालनं उभी होतात. मग ती कलाकृती संगीत, नाटक अशा कोणत्याही क्षेत्राशी निगडित असो.

मराठीत रुजतोय ‘वर्कशॉप’चा नवा ट्रेंड
कोणताही आविष्कार किंवा कलाकृतीच्या परिपूर्णतेतून यशस्वितेची दालनं उभी होतात. मग ती कलाकृती संगीत, नाटक अशा कोणत्याही क्षेत्राशी निगडित असो. चित्रपट क्षेत्र त्याला काहीसे अपवाद म्हणता येईल. आता हेच पहा ना, एखाद्या कलाकाराला घराण्याच्या गायकीचे संस्कार आत्मसात करताना गुरूच्या परंपरेतील गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याबरोबरच, ‘रियाज’ची गरज असते, तरच सूरांवरची त्यांची पकड मजबूत होते आणि सांगीतिक व्यासपीठावर एका परिपूर्ण व अभिजात मैफिलीचा आनंद ‘तानसेन’ समवेत ‘कानसेनांनाही मिळतो. हीच गोष्ट नाटक या कलाप्रकारालाही समप्रमाणात लागू होते. म्हणजे एखाद्या नाटकाची संहिता निश्चित झाली आणि कलाकारांची निवड झाली की, लगेच ते नाटक रंगभूमीवर येते का? तर तसे नाही. त्यानंतर त्या नाटकांच्या तालमी सुरू होतात...
कलाकाराची त्या भूमिकेतील समरसता, दिग्दर्शकाला कलाकारांकडून काय हवे आहे ही समज, पात्रांची एकमेकांशी ओळख होणे ही प्रक्रिया तालमी दरम्यानच घडते आणि मग त्यामध्ये परिपूर्णता आल्यानंतरच ते नाटक रंगदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज होते. थोडक्यात काय, तर ‘परफेक्शन’ येण्यासाठी तालमी किंवा रियाजातून त्यावर हुकूमत गाजविण्याच्या प्रक्रियेचे मंथन हे घडावेच लागते. चित्रपट क्षेत्र या ‘प्रॅक्टिस’च्या प्रोसेसिंगपासून काही अंशी दूरच आहे, म्हणावे लागेल. कलाकार घडविणाऱ्या फिल्म इन्स्टिट्यूूटची संख्या दिवसागणिक वाढतच आहे आणि जाणार... पण सांगायचा हेतू हा आहे की, जर एखादा चित्रपट काढायचा आहे, तर कलाकारांना एकत्र करून त्यांना चित्रपटाच्या प्रक्रियेची ओळख करून देणे, हा प्रकार चित्रपटसृष्टीला तरी अवगत नाही. कारण इथे स्वत:ला ‘महान’ वर्गात मोडणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही. गेल्या काही वर्षातील परिस्थिती पाहता, सेटवर आल्यानंतर चित्रपटातील कलाकारांची एकमेकांशी ओळख होते.
एकमेकांशी त्यांचा विशेष संवाद होतच नाही. आपले काम झाले की, व्हॅनिटीमध्ये जाऊन बसणे, इतके ते ‘विरक्त’ असल्यासारखे वागतात. मग चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायला नको... आपले काम संपले, अशा आविर्भावात एकमेकांना पाठ करून ते पुढचा रस्ता धरतात... मराठी चित्रपटसृष्टी मात्र याला काही अंशी अपवाद आहे. विविध विषय, त्यातील आशयघनता, मांडणी यातून ‘प्रयोग आणि सृजनशीलतेकडे मराठीची वाटचाल सुरू आहे. यात अधिक परिपूर्णता आणण्यासाठी आता कलात्मक चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी ‘वर्कशॉप’ घेण्याचा नवीन पायंडा चित्रपटसृष्टीमध्ये पाडला आहे. फँड्री’, ‘ख्वाडा’, ‘परतू’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी आपल्या आशयघनता आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मांडणीमुळे केवळ प्रेक्षकांनाच नव्हे, तर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवातील ज्युरींना स्वत:ची दखल घेणे भाग पाडले. त्याचे श्रेय अशा ‘वर्कशॉप’सारख्या वेगळ्या प्रयोगांनाही जाते. ख्वाडासारख्या चित्रपटांमधील कलाकारांना अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही कलाकारांनी लोकांना जिंकून घेतले. त्यामुळे नव्या दमाच्या कलाकारांसाठी अशी ‘वर्कशॉप’ वरदान ठरत आहेत. कलात्मक चित्रपटाच्या माध्यमातून का होईना, एक नवा ‘टे्रंड’ मराठीमध्ये रुजला आहे. त्याचे स्वागत निश्चित करायला हवे!नव्या कलाकारांची ‘कॅमेऱ्या’शी ओळख होणे महत्त्वाचे आहे. चित्रपटातील भूमिका या जगायला लागतात, यासाठी पात्रामध्ये समरसून जाणे गरजेचे असते. कलाकारांमध्ये उत्तम केमिस्ट्री असणे आवश्यक आहे. या शिवाय पोस्ट प्रॉडक्शनमध्ये येणाऱ्या अडचणी, बजेटची मर्यादा, या विषयी चर्चा घडावी लागते. विषय, भाषा आणि व्यक्तिरेखा अवगत करण्यासाठी ‘वर्कशॉप’ फायदेशीर ठरतात. ती एका संपूर्ण ‘टीम’ची कलाकृती बनते.
भाऊसाहेब कऱ्हाडे, दिग्दर्शक (ख्वाडा)