यंदा नवीन केमिस्ट्री
By Admin | Updated: January 4, 2016 02:26 IST2016-01-04T02:26:59+5:302016-01-04T02:26:59+5:30
जे काही नवीन असेल त्यावर प्रेम करणे, त्याचे स्वागत करणे हे तर बॉलीवूडचे वैशिष्ट्य आहे. नावीन्याच्या याच आर्कषणापोेटी बॉलीवूडला अनेक नवीन जोड्या मिळाल्या आहेत.

यंदा नवीन केमिस्ट्री
जे काही नवीन असेल त्यावर प्रेम करणे, त्याचे स्वागत करणे हे तर बॉलीवूडचे वैशिष्ट्य आहे. नावीन्याच्या याच आर्कषणापोेटी बॉलीवूडला अनेक नवीन जोड्या मिळाल्या आहेत. आधी अशा जोडयांच्या यशस्वीतेबाबत शंका उपस्थित करण्यात आली असली, तरी नंतर मात्र त्या जोड्यांनी इतिहास घडवला आहे. या नवीन वर्षातही असाच प्रयोग घडतो आहे. ज्या जोड्यांची कल्पना कठीण वाटते, अशा जोड्यांचे चित्रपट यंदा पडद्यावर येत आहेत. त्यांचीच ही रंजक माहिती...
रणवीर सिंग - वाणी कपूर
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, महोब्बते, दिल तो पागल है या सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य चोपडाने ७ वर्षांनतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली आहे. रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बेफिकरे’ हा चित्रपट केवळ आदित्य चोपडासाठीच नव्हे, तर ‘अनयुजव्हल जोडी’मुळे चर्चेत आला आहे. रणवीर सिंगकडे ‘इमर्जिंग स्टार’ म्हणून पाहिले जात आहे, तर ‘शुद्ध देसी रोमांस’मधून बॉलीवूडमध्ये पर्दापण करणाऱ्या वाणीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ‘बेफिकरे’साठी अनेक मोठ्या स्टार्सच्या नावाची चर्चा होती. मात्र, बाजी मारली, ती रणवीर सिंग व वाणी कपूरने. वाणी कपूरने आतापर्यंत केवळ दोन चित्रपटांत काम केले आहे.
अर्जुन क पूर- करीना कपूर
आर. बाल्की आपल्या विषयप्रधान चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये बाल्कीचा ‘की अँड का’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यासाठी त्याने करीना कपूर व अर्जुन कपूरची निवड केली आहे. विशेष म्हणजे, यात अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. करीनापेक्षा अर्जुन लहान असूनही तो तिच्या नवऱ्याची भूमिका करीत आहे. या चित्रपटातून घरी राहणारा नवरा व कमविणारी पत्नी हा विषय हाताळला जाणार आहे. शहरी समाजातील लिंगभेद चव्हाट्यावर आणणारा हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. करीनाने या चित्रपटाला होकार देताना नेमका काय विचार केला असेल, याची बॉलीवूडमध्ये चर्चा आहे.
आदित्य रॉय कपूर-कतरिना कैफ
‘रॉक आॅन फेम’ अभिषेक कपूर यांच्या दिग्दर्शनात आदित्य रॉय कपूर व कतरिना कैफ फितूरमध्ये एकत्र येत आहेत. चार्ल्स डिन्कन यांच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात पूर्वी रेखा काम करणार होती. मात्र, तिने नकार दिल्यावर तब्बू ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. रॉक आॅन हा चित्रपट महत्त्वाकांक्षेवर आधारित होता. फितूरमध्येही तसेच दिसेल यात शंका नाही. मात्र, त्याहूनही जास्त उत्सुकता नव्या जोडीविषयी लागली आहे.
दिलजीत दोसांझ-
करीना कपूर
यंदा प्रदर्शित होणाऱ्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात पंजाबी फोक गायक दिलजीत दोसांझ-करीना कपूर एकत्र दिसतील. यात शाहिदही प्रमुख भूमिकेत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देड इश्किया फेम अभिषेक चौबे करीत आहेत. हा सिनेमा पंजाबमधील ड्रग्ज माफियावर आधारित आहे. आलिया भट्टदेखील यात आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे.
टायगर श्रॉफ-
श्रद्धा कपूर
शब्बीर खान यांच्या दिग्दर्शनात प्रथमच टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर हे ‘बाघी’ या चित्रपटातून एकत्र येत आहेत. अॅक्शन स्टार अशी इमेज बनवू पाहणारा टायगर व सेंसेटिव्ह अभिनय करणारी श्रद्धा असा हा नवीन प्रयोग आहे. बाघी हा ‘रोमँॅटिक-अॅक्शन पॅक्ड’ चित्रपट असेल. यात टायगर आपले प्रेम मिळविण्यासाठी जोरदार फायटिंग करताना दिसेल.