‘नीरजा’ची वेगवान भरारी

By Admin | Updated: February 23, 2016 02:43 IST2016-02-23T02:43:55+5:302016-02-23T02:43:55+5:30

स्वत:चा जीव गमावून तीनशेपेक्षा जास्त प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या धाडसी हवाईसुंदरी नीरजा भानोतवर बनविलेल्या ‘नीरजा’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर उत्तम सुरुवात केली.

Neeraja's fast fare | ‘नीरजा’ची वेगवान भरारी

‘नीरजा’ची वेगवान भरारी

स्वत:चा जीव गमावून तीनशेपेक्षा जास्त प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या धाडसी हवाईसुंदरी नीरजा भानोतवर बनविलेल्या ‘नीरजा’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर उत्तम सुरुवात केली. प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांतच त्याने २२ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. प्रसारमाध्यमांतूनही ‘नीरजा’चे कौतुक झाल्यामुळे पहिल्या दिवशी त्याची चार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली. शनिवार आणि रविवारी कमाईला वेग आला. शनिवारी ‘नीरजा’च्या व्यवसायाचा आकडा सात कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला तर रविवारी ही कमाई नऊ कोटींवर पोहोचली. ‘नीरजा’सोबत इतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले तरी ‘नीरजा’ला सोमवारीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. चित्रपट बघणाऱ्यांची प्रतिक्रिया त्याच्या यशात मोठी भूमिका बजावत आहे.
‘नीरजा’सोबत प्रदर्शित झालेले अन्य चित्रपट बॉक्स आॅफिसवर टिकू शकले नाहीत. ‘लव्हशुदा’पासून ‘लव्ह डायरेक्ट’ आणि इतर चित्रपट पहिल्याच दिवशी आपटले. तरुणाईसाठी बनलेला प्रेमकथेवरील ‘लव्हशुदा’कडून काहीशा आशा होत्या परंतु पहिल्याच दिवशी त्याने शरणागती पत्करली.
याआधी प्रदर्शित झालेल्या कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘फितूर’ चित्रपटाने दहा दिवसांत १८ कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘सनम रे’ची कमाई काहीशी चांगली राहिली. टी-सीरिजच्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये १७ कोटी रुपये जमविले. दुसऱ्या वीकेंडपर्यंत त्याची कमाई २६ कोटींच्या जवळपासची झाली. ‘नीरजा’ दाखल होताच या दोन्ही चित्रपटांच्या व्यवसायाचा जणू रस्ताच बंद झाला. तिसऱ्या आठवड्यात सनी देओलच्या ‘घायल वन्स अगेन’ने ३५ कोटींची कमाई केली व ही कमाई खूप चांगली समजली जात आहे.
गेल्या आठवड्याप्रमाणेच येत्या शुक्रवारीही नव्या चित्रपटांची गर्दी होणार आहे. प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपटांत ‘तेरे बिन लादेन’चा सीक्वेल आणि समलैंगिकता या संवेदनशील विषयावर बनलेल्या हन्सल मेहतांचा ‘अलिगढ’चा समावेश आहे. ‘अलिगढ’ बुद्धिवादी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवू शकतो. ‘तेरे बिन लादेन’चा सीक्वेल आधीच्या भागाचे यश पुन्हा मिळावे, अशी आशा बाळगून आहे. या दोन चित्रपटांशिवाय बॉलीवूड डायरीज, लव्ह शगुनसह पाच चित्रपट प्रदर्शित होतील.

Web Title: Neeraja's fast fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.