‘मोगली आया... मस्ती लाया’
By Admin | Updated: April 9, 2016 17:23 IST2016-04-09T02:38:50+5:302016-04-09T17:23:51+5:30
काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर झळकलेली मोगलीची कथा मुलांना प्रचंड आवडली होती. जंगल बुकवर आधारित ही कथा पुन्हा आली आहे; परंतु या वेळी ती मोठ्या पडद्यावर आहे.

‘मोगली आया... मस्ती लाया’
काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर झळकलेली मोगलीची कथा मुलांना प्रचंड आवडली होती. जंगल बुकवर आधारित ही कथा पुन्हा आली आहे; परंतु या वेळी ती मोठ्या पडद्यावर आहे. जंगलबुकला हॉलीवूडने चित्रपटाचे रूप दिले आहे. त्यामुळे अॅनिमेशनपासून तांत्रिक गुणवत्तेपर्यंत एक सर्वांगसुंदर असा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला असून, नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियंका चोप्रा आदी दिग्गजांनी विविध पात्रांना आवाज दिला आहे, तर पडद्यावर प्रत्यक्षात मोगली आहे.
ज्यांना मोगलीची कथा ठाऊक नाही त्यांच्यासाठी थोडक्यात ही कथा. मोगली (नील सेठी) हा एक मानवी मुलगा आहे. मात्र, जंगलातील लांडग्यांचा कळप त्याचा सांभाळ करतो. मोगली त्यांच्यापैकी एक बनतो. शिकारीसह प्रत्येक गोष्टीत तो त्यांच्यासोबत राहतो. बिल्ला बघीरा हा मोगलीचा सर्वांत चांगला मित्र असून, नेहमी मोगलीचे संरक्षण करत असतो. तथापि, जंगलचा राजा शेर खानला मोगली अजिबात आवडत नसतो आणि तो नेहमी त्याच्या विरोधात असतो. त्यावरूनच शेर खान आणि जंगलातील इतर प्राण्यांत संघर्ष होतो. शेर खानमुळे मोगलीला पुन्हा एकदा जंगल सोडून जाण्याची वेळ येते. वाटेत माकडांचा कळप त्याला घेरतो. तेव्हा बिल्ला आणि बल्लू अस्वलाच्या मदतीने तो वाचतो. त्यानंतर मोगली जंगलात परतून शेर खानला मारतो आणि तेथे जंगलचा कायदा प्रस्थापित करतो.
या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे हा एक अॅनिमेशन चित्रपट आहे. यात मोगली सोडृून उर्वरित सर्व पात्रे अॅनिमेशनद्वारे तयार करण्यात आलेली आहेत. मोगलीचे पात्र बालकलाकार नील सेठीने वठविले आहे. आपली निरागसता आणि धाडसाद्वारे नीलने मोगलीचे पात्र जिवंत केले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या भारदस्त आवाजाद्वारे शेर खानला खऱ्या अर्थाने खलनायकाचे रूप दिले आहे, तर अस्वलाच्या आवाजात पंजाबी फोडणी देऊन इरफानने या पात्राला मजेदार बनविले आहे. बघीराला ओम पुरी यांनी आवाज दिला आहे. प्रियंका चोप्राने मोगलीवर प्रेम करणाऱ्या जंगलातील नागिणीचा आवाज डब केला आहे. मोगलीचा सांभाळ करणारे अस्वल रक्षाला शेफाली शाहचा आवाज आहे. अॅनिमेशनच्या प्रत्येक पातळीवर खूप परिश्रम घेण्यात आले असल्याचे चित्रपट पाहताना क्षणोक्षणी जाणवते. चित्रपट थ्री डी असल्यामुळे अॅनिमेशनचा आनंद अनेक पटीने वाढतो.
उणिवा : प्रियंका चोप्राचा आवाज असलेले नागिणीचे पात्र लवकर संपते. अनेक दृश्यांची लांबी जास्त आहे.
>का पाहावा?
परीक्षेच्या तणावातून मुक्त झालेल्या मुलांसाठी मोगलीची कथा ही एक चांगली भेट ठरू शकते. हा चित्रपट पाहताना त्यांना खूप मजा येईल. ज्यांनी टीव्हीवर मोगली पाहिलेला आहे, त्यांना आठवणींना उजाळा देता येईल.
का पाहू नये?
हा अॅनिमेशन चित्रपट असून, मुलांसाठी आहे. एकूण काय, तर जंगल बुक एक प्रकारे जंगल में मंगलसारखा अनुभव असून, मुले त्याचा आनंद लुटतील.