मोहम्मद रफींचा अपमान; करण जोहरवर टीकास्त्र
By Admin | Updated: November 2, 2016 03:51 IST2016-11-02T03:51:55+5:302016-11-02T03:51:55+5:30
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एका वादग्रस्त संवादामुळे दिवंगत लोकप्रिय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा अपमान झाला

मोहम्मद रफींचा अपमान; करण जोहरवर टीकास्त्र
मुंबई : ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एका वादग्रस्त संवादामुळे दिवंगत लोकप्रिय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा अपमान झाला आहे. त्यावरून त्यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
‘ऐ दिल..’ चित्रपटाची नायिका अनुष्का शर्मा हिच्या तोंडी असलेल्या ‘मोहम्मद रफी गाते नही, रोते थे’ या संवादास शाहीद रफी यांनी जोरदार आक्षेप घेतला असून त्याबद्दल जोहर यांनी रफी व त्यांच्या लाखो चाहत्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
शाहीद रफी म्हणाले, मी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. पण अनुष्काच्या तोंडी असलेले हे वाक्य रफीसाहेबांचा अपमान करणारे आहे. माझ्या वडिलांनी करणच्या वडिलांच्या (यश जोहर) चित्रपटांसाठी गाणी गायली होती आणि त्याने आता हे करावे, यावरून करणची मला लाज वाटते.
पार्श्वगायक अल्पावधीत विस्मृतीत जाण्याच्या हल्लीच्या जमान्यात रफी साहेबांच्या चाहत्यांची संख्या आजही कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रफीसाहेबांच्या या अपमानाचा निषेध करणारे संदेश त्यांच्या ९ हजारांहून जास्त चाहत्यांनी मला पाठविले आहेत, असे शाहीद रफी यांनी सांगितले.
हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे व लोकांनी तो पाहिला आहे. त्यामुळे जे नुकसान व्हायचे ते झालेले आहे. करण जोहर आता चित्रपटातून हा संवाद काढून टाकतील, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी निदान माफीचे पत्र तरी द्यावे, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
>ज्याने हा संवाद लिहिला आहे, तो मूर्ख आहे. रफीसाहब कोण होते, याची त्यांना जराही कल्पना असल्याचे दिसत नाही. रफीसाहब हे चतुरस्त्र गायक होते. अख्यायिका बनलेल्या या गायकाबद्दल ते असे अभद्र लिहूच कसे शकतात?
शहीद रफी,
मोहम्मद रफी यांचे चिरंजीव