मराठी चित्रपटांनी ‘या’ बॉलिवूड स्टार्सनालावलं याड!
By Admin | Updated: May 13, 2017 00:22 IST2017-05-13T00:22:54+5:302017-05-13T00:22:54+5:30
एक काळ असा होता, की, मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळविण्यासाठी अक्षरश: धडपड करावी लागत असे. परंतु काही वर्षांचा विचार

मराठी चित्रपटांनी ‘या’ बॉलिवूड स्टार्सनालावलं याड!
एक काळ असा होता, की, मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळविण्यासाठी अक्षरश: धडपड करावी लागत असे. परंतु काही वर्षांचा विचार केल्यास नवे विषय घेऊन येणाऱ्या मराठी चित्रपटांनी स्वत:चा नवा प्रेक्षक निर्माण केला आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनाही मराठी चित्रपटांचा लळा लावला आहे. त्यामुळे सध्या अनेक निर्माते मराठी चित्रपट निर्मितीसाठी सरसावत आहेत. नुकतेच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत दुसऱ्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. पहिल्या ‘विटू-दांडू’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अजयप्रमाणे इतरही काही बॉलिवूड निर्माते आहेत, ज्यांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे व करत आहेत, त्याचा हा आढावा...
प्रियांका चोप्रा (व्हेंटिलेटर)
बॉलिवूड-हॉलिवूडबरोबरच प्रादेशिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या प्रियांका चोप्रा हिच्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने जबरदस्त करिष्मा केला आहे. तब्बल ११८ कलाकारांना घेऊन बनविण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेच, शिवाय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानेही त्यास सन्मानित करण्यात आले. प्रियांकाचे हे यश इतरही बॉलिवूडमधील दिग्गजांना मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित करणारे असेल,
यात शंका नाही.
जॉन अब्राहम(सविता दामोदर परांजपे)
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरीत्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर ‘मद्रास कॅफे’, ‘रॉकी हॅण्डसम’ आणि ‘फोर्स-२’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. आता मराठी चित्रपटसृष्टीकडे ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाची तो निर्मिती करत आहे. चित्रपटात सुबोध भावे आणि राकेश बापट मुख्य भूमिकेत आहेत.
शाहरुख खान
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या दणदणीत यशानंतर शाहरुख खान आणि रोहित शेट्टी ही जोडी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत चमकणार आहे. रोहित शेट्टीने शाहरुख खानशी मराठी चित्रपटाचा विषय आणि त्यासंदर्भात आधीच चर्चा केली होती. या विषयावर आपण काही करू शकतो का, असे विचारताच शाहरुखने लगेच होकार दिला होता. या चित्रपटाची पटकथा लिहून पूर्ण झाल्याचेही समजते.
करण जोहर (‘सैराट’ रिमेक)
मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठीबरोबरच हिंदीच्याही प्रेक्षकांना अक्षरश: याड लावलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर तर या चित्रपटाच्या प्रेमात पडला असून, तो आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनविण्याची तयारी करीत आहे. या चित्रपटात कोण कलाकार काम करणार याविषयी अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी, शाहरुखचा मुलगा आर्यन खान, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्या नावाची चित्रपटात वर्णी लागेल अशी मध्यंतरी चर्चा रंगली होती. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कथेत कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते.
रोहित शेट्टी (‘झाला बोभाटा’ रिमेक)
‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेता अजय देवगणला घेऊन बनवणार आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचा ट्रेलर पाहून इतका भारावून गेला होता की, त्याने या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या गोलमाल सीरिजच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला रोहित या चित्रपटाचे हक्क विकत घेणार आहे.