मराठी चित्रपटात झळकायचेय!

By Admin | Updated: May 12, 2017 01:27 IST2017-05-12T01:27:11+5:302017-05-12T01:27:11+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सध्या मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहेत.

Marathi film staring at! | मराठी चित्रपटात झळकायचेय!

मराठी चित्रपटात झळकायचेय!

मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सध्या मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहेत. आता या यादीत अभिनेता अमित संध याचेही नाव जोडले गेले असून, त्याने मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याच्या ‘सरकार-३’च्या निमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्यानेच याबाबतचा खुलासा केला आहे. ‘सरकार-३’मध्ये अतिशय दमदार भूमिकेत असलेल्या अमित संध यांच्याशी साधलेला हा संवाद...
‘सरकार-३’मध्ये तू सुभाष नागरेच्या नातवाची भूमिका साकारत आहेस, यासाठी तुला मराठी भाषेचा अभ्यास करावा लागला काय?
मला सुरुवातीपासूनच मराठी भाषेचा आदर अन् आकर्षण आहे. सध्या मी मराठी शिकत आहे. जेव्हा ‘सरकार-३’मध्ये मी अमिताभ बच्चन यांच्या तोंडून काही मराठी डायलॉग ऐकले तेव्हा मी खूपच भारावून गेलो. अन् मीही काही डायलॉग बोलावेत अशी मी लगेचच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. परंतु स्क्रिप्टमध्ये माझ्या पात्रासाठी मराठी डायलॉग लिहिले गेले नसल्याने त्यांनी त्यास नकार दिला. परंतु माझ्यातील मराठी भाषा शिकण्याच्या उत्सुकतेचे त्यांनी कौतुकही केले. मी दोन दिवसांपूर्वीच ‘तुझी आई कशी आहे?’ हे मराठी वाक्य शिकलो आहे. भविष्यात मला एखाद्या तरी चित्रपटात मराठी डायलॉग बोलण्याची संधी मिळावी.
तुझे मराठीप्रतीचे आकर्षण पाहता, तू मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहेस का?
होय, माझी मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल
सुुरू आहे. मी एका मराठी शोवर काम करीत असून, त्यामध्ये मराठीतील अनेक दिग्गज आहेत. त्याचबरोबर मी एका मराठी वेबसीरिजमध्येही झळकणार आहे. मराठी प्रेक्षकांना माझे काम आवडेल अशी मला अपेक्षा आहे.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुला खूप स्ट्रगल करावे लागल्याचे तू वारंवार सांगतोस, याविषयी काय सांगशील?
होय, हे खरं आहे. मी बऱ्याचदा आॅडिशनसाठी जात होतो; परंतु काम मिळत नव्हते. अशा वेळी मी खूप निराश होत होतो. परंतु मी हार मानली नाही. प्रत्येक वेळी नव्या उमेदीने मी कामाचा शोध घेत होतो. खरं तर इंडस्ट्रीत स्थिर होण्यासाठी प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल करावाच लागतो. जेव्हा मला सलमान खानच्या ‘सुलतान’मध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला काहीसा दिलासा मिळाला. आता ‘सरकार-३’मध्ये मी एका प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याने हा माझ्या करिअरच्या दृष्टीने खूप मोठा ब्रेक असेल, असे मी समजतो.
‘सरकार-३’मधील तुझ्या भूमिकेसाठी खुद्द महानायक बच्चन यांनी शिफारस केली होती, याविषयी काय सांगशील?
खरं आहे, अमिताभजींनी शिफारस केल्यामुळेच मला ही भूमिका मिळाली आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तसेच अमिताभजी यांचा मी आयुष्यभर ऋणी असेल. हा चित्रपट करताना मला माझ्या भूमिकेला पूर्णपणे न्याय द्यायचा होता. त्यामुळेच मी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. अपेक्षा करतो की, चित्रपटातील माझे काम दिग्दर्शक, सहकलाकार आणि प्रेक्षकांना आवडेल.
या चित्रपटात यामी गौतमही तुझ्यासोबत एक वेगळी भूमिका साकारते आहे, कसा अनुभव आहे?
यामीबद्दल बोलायचे झाल्यास ती एक दमदार अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर राहिला आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेली आमची लव्हस्टोरी ही वेगळ्या प्रकारची असून, प्रेक्षकांना ती भावेल यात शंका नाही; याचे संपूर्ण श्रेय मी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना देऊ इच्छितो. कारण ते त्यांच्या पात्रांना अशाप्रकारे सादर करतात की, प्रेक्षक ते बघण्यासाठी आतुर असतात.
तुझा ड्रीम रोल कोणता?
मी या विचाराने कधीच वाटचाल केली नाही. मिळालेली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी ड्रीम रोलच आहे. चांगलं काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच माझा ड्रीम रोल आहे. भविष्यात मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. प्रत्येक भूमिकेत नावीन्य निर्माण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेणार आहे. ‘सरकार-३’नंतर माझ्या करिअरला वेगळे वळण मिळेल याची मला खात्री आहे.
(मुलाखत : सतीश डोंगरे)

Web Title: Marathi film staring at!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.