मराठी चित्रपट - केवळ गोष्टीचेच तेवढे वजनी माप..!
By Admin | Updated: November 12, 2016 05:19 IST2016-11-12T05:19:53+5:302016-11-12T05:19:53+5:30
अंगाने स्थूल असलेल्या काही जणांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड असतो; तर काही जण मात्र जे आहे ते स्वीकारून आनंदाने जगत असतात.

मराठी चित्रपट - केवळ गोष्टीचेच तेवढे वजनी माप..!
- राज चिंचणकर
अंगाने स्थूल असलेल्या काही जणांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड असतो; तर काही जण मात्र जे आहे ते स्वीकारून आनंदाने जगत असतात. पण शरीराने जाड असलेल्या युवतींना मात्र या जाडेपणाचा मानसिक विकार जडतो. या ना त्या प्रयत्नाने बारीक होण्याचा त्यांचा आटापिटा सुरू असतो. या पार्श्वभूमीवर, जाड असण्यात वाईट काहीच नाही; असे छातीठोकपणे विधान करणारा चित्रपट म्हणजे ‘वजनदार’!
या चित्रपटाने अगदीच वेगळा विषय जरी हाताळला असला, तरी त्याची मांडणी मात्र हवी तितकी ‘वजनदार’ झालेली नाही. परिणामी, या चित्रपटाची गोष्टच तेवढी वजनी मापाची असल्याचे स्पष्ट होत जाते. एका वेगळ्या विषयावर केंद्रित केलेले लक्ष, इथपर्यंतच या चित्रपटाने हे ‘माप’ ओलांडले आहे.
पाचगणीमध्ये राहणारी पूजा ही तरुणी आणि इथे लग्न होऊन आलेल्या कावेरीची ही गोष्ट आहे. या दोघीही अंगाने जाडजूड असतात; म्हणजे चित्रपटाचे तसे म्हणणे आहे म्हणून ते तसे स्वीकारणे भाग आहे. तर, एकदा एका पार्टीत डान्स करताना या दोघी टेबलवरून पडतात आणि तिथे हंशा पिकतो. त्याचवेळी या दोघींचा व्हिडीओ काढला जात असतो आणि हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावरून व्हायरल होतो. साहजिकच, या दोघींना उघडपणे फिरण्यावर मर्यादा येते. या घटनेतून त्या दोघी बारीक व्हायचे मनावर घेतात. त्यासाठी करण्यात येणारे त्यांचे उपद्व्याप म्हणजे या चित्रपटाची गोष्ट आहे.
सचिन कुंडलकर याने या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी कामगिरी पार पाडली आहे. यासाठी त्याने निवडलेला विषय हटके आहे; मात्र पटकथेत तो दोन पावले मागे गेला आहे. जाड असलेल्या व्यक्तींना न्यूनगंडातून बाहेर पडायला लावणारा सकारात्मक विचार त्याने यात दिला आहे खरा; परंतु यातल्या काही गोष्टी पचनी पडत नाहीत. अनेकदा तर हा चित्रपट आहे की बारीक होण्याचे फंडे सांगणारे ट्रेनिंग सेंटर आहे; असा प्रश्न पडतो. बरं, एवढे होऊनही पूजा नक्की कशामुळे बारीक होते हे अनुत्तरितच ठेवले आहे. या चित्रपटात पूजा निदान जाड तरी दिसते; मात्र हे जाडपण कावेरीच्या अंगावर काही फारसे दिसत नाही. म्हणजे निदान न्यूनगंड यावा इतकी काही ती यात जाड नाही. मग हा सगळा खटाटोपही तितका परिणामकारक उरत नाही.
जाडपणाच्या विषयावर अजून खोलात जाऊन चित्रपटात काही मांडता आले असते, तर या गोष्टीचा परिणाम अधिक टोकदार झाला असता. सतत झोपलेला दिसणारा सईचा नवरा असो किंवा पूजाची ‘खादाडगिरी’ असो; यांचे प्रमाण अंमळ जास्तच झाले आहे. काही प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत. पण असे सगळे असले, तरी जाड म्हणजे वाईट काही नाही, हे या चित्रपटाचे म्हणणे मात्र यात ठासून सांगण्यात आले आहे आणि तेही महत्त्वाचे आहेच.
पाचगणीचा अप्रतिम निसर्ग हा यातला प्लसपॉइंट आहे. इथल्या लोकेशन्सवर मिलिंद जोग यांचा फिरलेला कॅमेरा प्रसन्न आहे. त्यामुळे चित्रपट देखणा झाला आहे. अविनाश-विश्वजीत यांचे संगीतही या निसर्गात रममाण झाले आहे. प्रिया बापट (पूजा) आणि सई ताम्हणकर (कावेरी) यांनी ढोबळमानाने जाडजूड होऊन साकारलेल्या भूमिका मस्त आहेत. प्रियाला यात भाव खाण्यास बराच वाव होता आणि तिने यातल्या खाऊगिरीसोबत भावही खाल्ला आहे. थोड्याबहुत फरकाने घुसमट होणाऱ्या विवाहित स्त्रीची भूमिका सईने चोख रंगवली आहे. पण या दोघींच्या व्यक्तिमत्त्वाला अजून कंगोरे हवे होते, असे वाटत राहते.
पूजाचा प्रियकर आलोक, या भूमिकेत सिद्धार्थ चांदेकरने सहजाभिनय केला आहे. समीर धर्माधिकारी, चेतन चिटणीस, चिराग पाटील, आदिती देशपांडे आदी कलावंतांची साथ चित्रपटाला लाभली आहे. अंगावरचे वजन कमी करण्यासाठीचा आदर्श उपाय म्हणे काही हा चित्रपट नव्हे; पण एखादी साधीसुधी गोष्ट विनोदासह अनुभवायची असेल तर मात्र हे ‘वजन’ उचलून पाहायला हरकत नाही.