मराठी चित्रपट - फक्त प्रशांत दामले यांचीच मेहरबानियाँ

By Admin | Published: April 22, 2016 11:50 PM2016-04-22T23:50:14+5:302016-04-22T23:50:14+5:30

शेरलॉक होम्सपासून ते व्योमकेश बक्षी आणि आता @लक्ष्य’, ‘सीआयडी’सारख्या मालिकांमुळे प्रेक्षकही हुशार झालाय. त्यामुळे मर्डर मिस्ट्रीसारखे विषय हाताळण्यासाठी पटकथा दमदार असणे आवश्यक झाले आहे

Marathi Film - Only Prashant Damle's Mehrbanes | मराठी चित्रपट - फक्त प्रशांत दामले यांचीच मेहरबानियाँ

मराठी चित्रपट - फक्त प्रशांत दामले यांचीच मेहरबानियाँ

googlenewsNext

प्रियांका लोंढे
शेरलॉक होम्सपासून ते व्योमकेश बक्षी आणि आता @लक्ष्य’, ‘सीआयडी’सारख्या मालिकांमुळे प्रेक्षकही हुशार झालाय. त्यामुळे मर्डर मिस्ट्रीसारखे विषय हाताळण्यासाठी पटकथा दमदार असणे आवश्यक झाले आहे. तर्काचा अचूक वापर झाला नाही तर अनेकदा गूढ हास्यास्पद होऊन जाते. ‘भो भो’मध्ये अगदी असंच झालंय; मात्र प्रशांत दामले यांच्या मेहरबानीने चित्रपट सुसह्य झाला आहे. त्यात कुत्र्याची भूमिका हे वेगळे वैशिष्ट्य. ‘तेरी मेहरबानीयॉँ’चा खूप प्रभाव जाणवतो. संपूर्ण कथानक एका कुत्र्याभोवती फिरते, हे त्यातील वैशिष्ट्य.
स्मिता भांडारकर (अनुजा साठे) या महिलेचा खून झालाय. तिचा पती विनायक (सुबोध भावे) याने त्यांचाच कुत्रा सॅँडी याच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीकडे एक करोडचा क्लेमही केला आहे. येथे प्रवेश होतो खासगी गुप्तहेर व्यंकटेश भोंडे यांचा. प्रशांत दामले यांनी साकारलेली ही भूमिका संपूर्ण चित्रपट तारून नेण्यास समर्थ ठरते. नाटकाचे अक्षरश: हजारो प्रयोग केल्याने त्यांचं टायमिंग अचूक आहे. वेगळ्या प्रकारचा गुप्तहेर साकारताना त्यामध्ये कारुण्याची किनारही आहे. ती प्रेक्षकांना कोठेतरी हेलावूनही टाकते. लग्नाची मुलगी अचानक अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर त्या धक्क्यातून स्वत:ला सावरू न शकलेले भोंडे त्यांचे मन रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांमध्ये रमवितात. स्वत:चे एक वेगळे विश्व त्यांनी या कुत्र्यांभोवती तयार केलेले असते. त्यामुळे एका कुत्र्यावर खुनाचा आरोप झाला म्हटल्यावर त्यांचे सर्व ताकदीनिशी तपासाला लागण्याची संगतीही लागते. मात्र, पटकथेमध्ये अनेक त्रुटी असल्याने त्यांनाही मर्यादा येतात. डिटेक्टिव्हगिरीच्या कथांमध्ये पारंगत झालेल्या प्रेक्षकाला काही प्रसंग पटत नाहीत. पिसाळलेला कुत्रा म्हणून पोलिसांत झालेली नोंद असो की खुनाच्या सगळ्या तपासामध्ये महत्त्वाचा असणारा टॅब मिळविण्याचा प्रसंग असो, त्यामध्ये दिग्दर्शकीय कौशल्य दाखविण्याची आणखी गरज होती. भरत गायकवाड यांचा मराठीतील दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट असला तरी त्यांनी अनेक मालिकाही केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा निश्चित होत्याच. मराठी चित्रपट म्हटले की विनोद पाहिजेच, असे एक समीकरण का तयार झाले आहे, हेच कळत नाही. त्यामुळे विनोदनिर्मितीचे प्रयत्न ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. प्रशांत दामलेंसारखा कसलेला अभिनेता असल्याने प्रसंग निभावून नेले आहेत. मात्र, विक्रम भांडारकर (सौरभ गोखले) याच्याशी त्यांचे उडालेले खटके धमाल उडवून देतात. खूप वर्षांनी प्रशांत दामले मध्यवर्ती भूमिकेत पाहावयास मिळत आहेत. या भूमिकेला त्यांनी न्यायही दिला आहे. सुबोध भावे (विनायक भांडारकर), अश्विनी एकबोटे (कावेरी भोंडे), शरद पोंक्षे (डॉ. दळवी), सौरभ गोखले (विक्रम भांडारकर), संजय मोने (पी.डी.) यांनी चांगली साथ दिली आहे. प्रशांत दामले यांची वेगळी भूमिका हे एक आकर्षण असले आणि एका टप्प्यावर चित्रपट उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी ठरत असला तरी रहस्य आणि क्लायमॅक्स मनाला भिडत नाहीच. त्यामुळे अगदीच रहस्याची आवड असेल तर टीव्हीवर अनेक पर्याय आहेतच की! नेहमी विनोदी भूमिका करणाऱ्या प्रशांत दामले यांचा थोडासा वेगळा चित्रपट एवढेच बाकी काय!

Web Title: Marathi Film - Only Prashant Damle's Mehrbanes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.