मराठी चित्रपटसृष्टी होतेय‘झिंगाट’!
By Admin | Updated: September 29, 2016 02:03 IST2016-09-29T02:03:58+5:302016-09-29T02:03:58+5:30
कोरिओग्राफी, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा अनेक क्षेत्रांत लीलया वावरणारी फराह खान म्हणजे बॉलिवूडमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ‘तुतक तुतक तुतिया’

मराठी चित्रपटसृष्टी होतेय‘झिंगाट’!
कोरिओग्राफी, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा अनेक क्षेत्रांत लीलया वावरणारी फराह खान म्हणजे बॉलिवूडमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ‘तुतक तुतक तुतिया’ या आगामी हिंदी चित्रपटात तिने कॅमिओ रोल केला आहे. त्यानिमित्त तिने ‘सीएनएक्स’शी साधलेला संवाद...
‘‘म राठी चित्रपटसृष्टी दिवसागणिक प्रयोगशील होत आहे. प्रेक्षकांपर्यंत अधिकाधिक संवेदनात्मक आणि आशयघन चित्रपट पोहोचविण्याचे प्रयत्न मराठी दिग्दर्शकांकडून होत आहेत. या नवनव्या विचारप्रवाहांना प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘सैराट’. मी सैराट पाहिलेला नाही; पण प्रेक्षकांनी इतक्या मोेठ्या प्रमाणात ‘सैराट’चे संगीत डोक्यावर घेतलंय. ते पाहून आता मलाही ‘सैराट’सारख्या मराठी चित्रपटासाठी काम करावेसे वाटते आहे,’’ असे फराह म्हणाली.
तू ‘तुतक तुतक तुतिया’मध्ये कॅमिओ रोल केलास. याचा तुझा अनुभव कसा होता?
- मी यापूर्वी ‘शिरीन फरहाद की निकल पडी’मध्ये भूमिका केली होती. त्यानंतर ‘तुतक़.’मध्ये मी माझीच म्हणजे फराह खानचीच भूमिका केली आहे. चित्रपटासाठी आम्ही जवळपास 12 तास सतत शूटिंग करायचो. सेटवर खूप धम्माल करायचो. चित्रपटाची थीम ही डान्सवर आधारित आहे. त्यामुळे त्यात मी कोरिओग्राफरच्याच भूमिकेत दिसणार आहे. प्रभू देवा, सोनू सूद आणि तमन्ना भाटिया यांना सेटवर त्रास देणं हे माझं आवडीचं काम होतं. त्यांना मी माझ्या तालावर नाचवायचे. प्रभू चित्रपटात असल्याने मला कोरिओग्राफीसाठी मदत झाली.
प्रभू देवासोबतची तुझी ट्युनिंग कशी आहे?
- ‘बी टाऊन’मध्ये माझं फार कमी लोकांसोबत जमतं. कोरिओग्राफर प्रभू देवा त्यांपैकीच एक़ मला तो कामावर नितांत प्रेम करणारा आणि कामावर निष्ठा असलेला कलाकार वाटतो. आम्ही खूप चित्रपटांची कोरिओग्राफी एकत्र केलेली आहे. त्याच्यासोबत काम करणं, नेहमीच एक आगळावेगळा अनुभव असतो. एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून प्रभू अतिशय प्रगल्भ व विनम्र आहे.
तुझा ‘सक्सेस फ ॉर्म्युला’ काय आहे?
- यश-अपयश यावरून तुमचे आयुष्य जोखले जाते. माझ्या मते, प्रत्येकाने एकदा तरी अपयशाला सामोरे गेलेच पाहिजे. माझा सक्सेस फॉर्म्युला विचाराल तर तो असाच आहे. कितीही अपयश येवो; ते नकारात्मक न घेता, सकारात्मक घ्या. कारण हा मार्ग तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातो. मीही अपयश अनुभवले; पण त्याच अनुभवातून समृद्ध होत पुढे गेले. त्यामुळे पडा, धडपडा; पण यशाचा पाठपुरावा सोडू नका, एवढाच माझा सक्सेस फॉर्म्युला आहे.
चित्रपट लीक होण्याचे प्रमाण वाढलेय, त्याबद्दल काय वाटते?
- प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक कलाकार यांच्या अपार कष्टातून चित्रपट साकारत असतो. या कष्टांवर पाणी पडणार असेल, तर एक कलाकार या नात्याने मला वाईट वाटणे हे साहजिकच आहे. चित्रपट लीक होण्याचे वाढते प्रमाण चित्रपटसृष्टीसाठी धोकादायक आहे. दुर्दैवी आहे. माझ्या मते, प्रत्येक चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊनच पाहिला गेला पाहिजे. तरंच त्यातील कलाकाराच्या भूमिकेला न्याय मिळतो. चित्रपट लीक होण्याचे प्रकार कुठे तरी थांबायला हवेत. त्याशिवाय चांगल्या चित्रपटांना न्याय मिळणार नाही.
समाजासाठी तुझे योगदान काय?
- मी एक समाजप्रिय व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात समाजाला विशेष स्थान आहे. समाजाप्रति माझे योगदान विचाराल तर फार काही जास्त नाही; पण एक व्यक्ती या नात्याने समाजासाठी जेवढं करायला हवं तेवढं मी नक्कीच करते. अनेक एनजीओ आणि गतिमंद मुलांच्या संस्थांना मी सातत्याने भेट देत असते. रिअॅलिटी शोंमध्ये मिळालेली गिफ्ट, कधी पैशाच्या तर कधी वस्तंूच्या स्वरूपात मी या संस्थांना मदत करते. समाजाचा एक घटक म्हणून मला ही मदत पुरेशी वाटते. तसेच, ‘आयव्हीएफ इनफर्टिलिटी’साठी जनजागृतीचेही माझे प्रयत्न आहेत.
तुझा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ काय आहे?
- ‘मायनॉर्टी रिपोर्ट’, ‘लाईव्ह आॅन द एज’, ‘आॅब्लिव्हियन’, ‘रेन मॅन’ या इंग्रजी चित्रपटांत काम करणारा टॉम क्रुझ हॉलिवूडचा टॉपचा अभिनेता मानला जातो. त्याला घेऊन खरं तर मला चित्रपट साकारायचा आहे. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे; पण त्यासाठी केव्हाचा मुहूर्त उजाडतो, हे मात्र मला ठाऊक नाही. सध्या नवनवीन कलाकारांच्या येण्याने स्पर्धा वाढली आहे; पण ‘क्वॉलिटी मॅटर्स’ना? त्यामुळे टॉमसोबतच्या चित्रपटाचे कथानक हे अतिशय उत्तम दर्जाचे असेल. हा चित्रपट रॉक करणार, यात काही शंका आहे का? (हसत-हसत)
- aboli.kulkarni@lokmat.com