​बागी-२ चे प्रमोशन सोडून टायगर श्रॉफने केला या मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 10:09 IST2018-03-07T04:39:55+5:302018-03-07T10:09:55+5:30

दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ.....असा एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलिवूड स्टार टायगर ...

Tiger Shroff left the promotion of Baji-2 and launched the trailer of this Marathi film | ​बागी-२ चे प्रमोशन सोडून टायगर श्रॉफने केला या मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच

​बागी-२ चे प्रमोशन सोडून टायगर श्रॉफने केला या मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच

स्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ.....असा एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या बागी-२ या सिनेमाच्या ऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचे प्रमोशन करतोय आणि तेही केवळ मैत्री खातर.
येत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित बागी-२ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शन निर्मित गावठी हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. गावठी या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ॲण्डी हा प्रसिद्ध सिने तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझाचा सहाय्यक. फ्लाईंग जट या रेमो डिसोझा दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ अभिनित चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान टायगरला डान्स स्टेप तसेच सीन समजावून सांगण्याचे काम अर्थातच आनंदकुमार उर्फ ॲण्डीचे होते. ॲण्डीच्या शांत, संयमी, मितभाषी आणि विनम्र स्वभावामुळे टायगर आणि ॲण्डीची चांगली गट्टी जमली. फ्लाईंग जट येऊन गेला पण टायगरने ॲण्डीशी मैत्री कायम ठेवली. ॲण्डीने एक मराठी फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि ती उत्तम झाल्याचे टायगरला रेमो डिसोझाकडून समजले, तेव्हा त्याने फोन करून ॲण्डीचे अभिनंदन केले.
गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोझा सरांच्या हस्ते पहिले गाणे प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरे ‘भन्नाट’ हे गाणे प्रकाशित व्हावे, अशी ॲण्डीची मनोमन इच्छा होती. परंतु गावठी आणि बागी-२ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने आता टायगर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार नाही, हे मनाशी धरून दिग्दर्शक आनंदकुमार उर्फ ॲण्डीने टायगरकडे कधी विचारणा केली नाही. परंतु, टायगरने एखादे ट्वीट किंवा शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीयो अपलोड करावा, या हेतूने ॲण्डीने टायगरला एक फोन केला. बोलण्याच्या ओघात ॲण्डीने त्याच्या मनातील खरी इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरे गाणे लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला, इतकेच नाही तर तारीख आणि वेळही सांगितली. आणि ६ मार्च रोजी मुंबईत एका भव्यदिव्य सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते गावठी या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसऱ्या गाण्याचे संगीत प्रकाशित झाले. इतकेच नव्हे तर टायगर आणि बॉस्को ‘भन्नाट’ या ध़डाकेबाज आयटम साँगवर ॲण्डीसोबत मनसोक्त थिरकले.
“फ्लाईंग जाट या माझ्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान ॲण्डीसरांकडून मला जे काही मिळालं, त्याने माझी कला अधिक बहरली, असं मी मानतो. ॲण्डी सरांचा डान्स हा चमकणाऱ्या वीजेप्रमाणे आहे. त्यामुळे मला त्यांच्यासमोर आता नाचताना थोडं दडपण आलं होतं. ते अतिशय कल्पक आणि मेहनती माणूस आहेत. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेला गावठी हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असेल, याची मला खात्री आहे. ट्रेलर आणि गाणे पाहून चित्रपटाबद्दल मलाच जास्त उत्सुकता लागलीय. माझा बागी-२ आणि गावठी एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही मी गावठी नक्कीच पाहिन!” अशा भावना टायगर श्रॉफ याने याप्रसंगी व्यक्त केल्या.

Also Read : रेमो डिसोझा गावठीच्या टीमसोबत थिरकला ‘दिसू लागलीस तू’ या गाण्यावर

Web Title: Tiger Shroff left the promotion of Baji-2 and launched the trailer of this Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.