Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review : सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची'पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: December 2, 2022 01:33 PM2022-12-02T13:33:35+5:302022-12-02T13:44:38+5:30

Goshta Eka Paithanichi : जाणून घ्या कसा आहे, सायली संजीव आणि सुव्रत जोशीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमा.

Sayali Sanjeev starrer Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review | Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review : सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची'पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review : सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची'पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : सायली संजीव, सुव्रत जोशी, आरव शेट्ये, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता हनमघर, अदिती द्रवीड, मोहन जोशी, शशांक केतकर, मधुरा वेलणकर-साटम, गिरीजा ओक, सविता मालपेकर, सुहिता थत्ते, जयवंत वाडकर, पूर्णिमा अहिरे
लेखन-दिग्दर्शक : शंतनू रोडे
निर्माते : अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता
शैली : ड्रामा
कालावधी : २ तास ३ मिनिटे
दर्जा : तीन स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे

राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरत पैठणीची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रामाणिकपणे जीवन जगण्याची वृत्ती जागवणारा आहे. पैशांची श्रीमंती नसली तरी माणसानं मनाची श्रीमंती राखली पाहिजे आणि पैशांनी श्रीमंत असलेल्या व्यक्तींनीही विचारांनी श्रीमंत असल्याचं आपल्या वागण्यातून दर्शवलं पाहिजे हा मंत्र या चित्रपटात आहे. दिग्दर्शक शंतनू रोडेनं एक साधं-सोपं कथानक कुठेही अतिशयोक्ती न करता साधेपणानंच सादर करणं हेच या पैठणीचं खरं सौंदर्य आहे. पैठणीच्या माध्यमातून क्लायमॅक्समध्ये उलगडलेले मानवी मनोवृत्तीचे पैलू अतिशय सुरेख आहेत.

कथानक : चित्रपटाची कथा फुल विक्रेता सुजीत आणि घरीच साड्यांना फॅाल-बिडींग करणाऱ्या प्रामाणिक इंद्रायणीची आहे. कामानिमित्त सायकलवरून फिरणाऱ्या सुजीतचा अपघात होतो. ऐन दिवाळीपूर्वी झालेला अपघात आणि उपचारांसाठी झालेला खर्च दोघांनाही सतावत असतो. पूर्ण बरा होण्यापूर्वीच सुजीत घरबसल्या पुष्पगुच्छ बनवायला सुरूवात करतो. मुलाला फटाके घेण्याचीही त्यांची ऐपत नसते. सुजीत रुग्णालयातून घरी येतो आणि त्याच दिवशी गावातील श्रीमंत स्मिताताईही इंद्रायणीकडे एक काम घेऊन येतात. त्यांच्यासोबतच टायटल रोलमधल्या सव्वालाखाच्या पैठणीचीही एंट्री होते. त्यानंतर पैठणी कोणते रंग उधळते ते पहायला मिळतं. मानवाप्रमाणे पैठणी नऊ महिन्यांमध्ये कशी जन्म घेते तेसुद्धा थोडक्यात दाखवलं आहे.

लेखन-दिग्दर्शन : चांगल्या विचारावर आधारलेली आणि मानवतेचा अतिशय महत्त्वाचा गुण अधोरेखित करणारी वनलाईन सुरेख आहे. मानवी जीवनातील नीतीमूल्यांशी सांगड घालणारी साधी कथा कुठेही ग्लॅमर टच न देता साधेपणानेच हाताळली आहे. कितीही संकटं आली तरी धीरोदात्तपणे त्यांचा सामना करायला हवा हे शिकवणारी आहे. पैठणीच्या निमित्ताने काही वेगळे ट्रॅक्स ओपन करताना गती थोडी मंदावली असून, फापटपसारा वाढला आहे. फटाक्यांच्या ट्रॅकद्वारे लहान मुलाच्या मनांमधील प्रामाणिकपणा गंमतीशीरपणे दर्शवला आहे. 'हातात आली की काळजाला भिडते पैठणी...' हा संवाद प्रत्येक स्त्रीच्या मनातील भाव सांगणारा आहे. 'माणसानं जेवढं शक्य आहे तेवढं तरी चांगलं वागलं पाहिजे', हा चित्रपटाच्या शेवटी असलेला संवाद जीवनासोबतच जगण्याचं सार सांगणारा आहे. चाफ्याच्या गाण्यासोबत पैठणी लावणीही श्रवणीय आहे. संकलनात कात्री चालवण्याची आणि मेकअपसोबतच गेटअपवर लक्ष देण्याची गरज होती. कंटिन्यूटीमध्ये काही उणीवा राहिल्या आहेत. पार्श्वसंगीत, लोकेशन्स आणि कला दिग्दर्शन चांगलं आहे. या जगात जगण्यासाठी खूप साधं राहूनही उपयोगाचं नसतं हे दाखवणारी काही दृश्येही यात आहेत. 

अभिनय : सायली संजीवनं साकारलेली इंद्रायणी पैठणीइतकीच सुरेख आहे. इंद्रायणीतील साधेपणा, विचारांतील सौंदर्य आणि वागण्यातील खरेपणा सायलीनं अचूकपणे सादर केला आहे. सुव्रतनं प्रचंड ताकदीनं कॅरेक्टर साकारताना आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे वठवली आहे. लहानग्या आरव शेट्येनं कौतुकास्पद काम केलं आहे. मनाची श्रीमंती दर्शवणारी व्यक्तिरेखा मृणाल कुलकर्णींनी अत्यंत सहजपणे साकारली आहे. गिरीजा ओक हे सरप्राईज पॅकेज असून, तिनं छोटीशी भूमिका आणि लावणी छान सादर केली आहे. मोहन जोशींचा छोटासा गंमतीशीर रोल कुतूहल वाढवणारा आहे. मधुरा वेलणकरचं वेगळं रूप यात आहे. सुहिता थत्तेंच्या रूपात समजूतदार व्यावसायिका आहे. प्राजक्ता हनमघर, अदिती द्रवीड, शशांक केतकर, सविता मालपेकर, जयवंत वाडकर, पूर्णिमा अहिरे यांनीही चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, काही अनावश्यक ट्रॅक्स, संकलन
थोडक्यात : या चित्रपटात काही उणीवा राहिल्या असल्या तरीही प्रामाणिकपणे जगायला शिकवणाऱ्या नाजूक, सुंदर, नक्षीदार पैठणीचा प्रवास पाहण्याजोगा आहे.

Web Title: Sayali Sanjeev starrer Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.