दीड कोटी खर्चूनही प्रसाधनगृह बंदच; दीनानाथ नाट्यगृहाकडे पालिकेचे दुर्लक्ष

By संजय घावरे | Published: August 19, 2023 01:22 PM2023-08-19T13:22:40+5:302023-08-19T13:28:30+5:30

२०२१ मध्ये दीड कोटी रुपये खर्च करूनही अद्याप दीनानाथ नाट्यगृहातील समस्या संपलेल्या नाहीत.

Neglect of the Municipality towards Dinanath Theater | दीड कोटी खर्चूनही प्रसाधनगृह बंदच; दीनानाथ नाट्यगृहाकडे पालिकेचे दुर्लक्ष

दीड कोटी खर्चूनही प्रसाधनगृह बंदच; दीनानाथ नाट्यगृहाकडे पालिकेचे दुर्लक्ष

googlenewsNext

संजय घावरे

मुंबई - २०२१ मध्ये दीड कोटी रुपये खर्च करूनही अद्याप दीनानाथ नाट्यगृहातील समस्या संपलेल्या नाहीत. नाटयगृहातील पुरुष प्रसाधनगृह महिन्याभरापासून बंद असल्याचा त्रास प्रेक्षकांना होत आहे. नाटयगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पुस्तक विक्रीसाठी उभारलेली पत्र्याची शेड नाटकांच्या सेटच्या गाड्या तसेच कलाकारांच्या बसेससाठी अडथळा ठरत आहे. भविश्यात ती तुटल्यास कोणताही निर्माता जबाबदार राहणार नसल्याचा इशारा निर्माता संघाकडून देण्यात आला आहे.

विले पार्लेसारख्या उच्चभ्रू वस्तीतील रसिकांचे आवडते असलेले मुंबई महानगरपालिकेचे दीनानाथ नाट्यगृह मागील बऱ्याच दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. पहिल्या मजल्यावरील पुरुष प्रसाधनगृह लिकेज दुरुस्तीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद आहे. आजही ते त्याच स्थितीत आहे. यामुळे नैसर्गिक विधींसाठी पुरुषांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. वयोवृद्ध नागरिक आणि अपंग व्यक्तींना याचा खूप त्रास होत आहे. आठवड्याभरात होणारे दुरुस्तीचे काम महिना संपला तरी पूर्ण न झाल्याने प्रेक्षक संतापले आहेत. याचा परिणाम तिकिट बुकिंगवर होत असल्याचे नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. 


२०२१मध्ये पालिकेच्या बिल्डींग डिपार्टमेंटने नाट्यगृहाची डागडुजी केली. यात टेरेस व प्रसाधनगृहाच्या वॉटरप्रूफींगसह ग्रीनरुमचे नूतनीकरण करण्यात आले. यासाठी दीड कोटी रुपये खर्च करूनही अवघ्या दीड वर्षात प्रसाधनगृह पुन्हा लिकेज झाल्याने तोडावे लागले आहे. त्यामुळे या कामात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय निर्मात्यांकडून व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात डेप्युटी चिफ इंजिनीयर, बीएम संजीवकुमार पांडव 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, प्रसाधनगृहातील लिकेज शोधण्यासाठी पाईप आणि प्लॅस्टर तोडण्यात आले, पण कॅान्ट्रॅक्टरने वेळेत काम पूर्ण न केल्याचा त्रास प्रेक्षकांना सहन करावा लागत आहे. लवकरच प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. दीड वर्षांपूर्वी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केले त्याच्याकडून आता अतिरिक्त पैसे न देता काम करण्यात येईल असेही पांडव म्हणाले.

आम्ही जबाबदार नाही...
जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे कार्यवाह व निर्माते दिलीप जाधव यांनी दीनानाथ नाट्यगृहाला पत्र पाठवून पुरुष प्रसाधनगृह बंद असल्याने रसिकांना त्रास होत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे कोणतेही नुकसान झाल्यास निर्माते जबाबदार राहणार नसल्याचा ईशाराही त्यांनी दिला आहे. 

दुर्घटनेला आमंत्रण...
नाटयगृहातील पहिल्या मजल्यावरील काही खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. निकृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनयमची फ्रेम्स वापरल्याने त्यातून काचा निखळल्या आहेत. अचानक एखादी काच बाहेर पडून दुर्घटना घडली तर दुखापत होण्याची भीती प्रेक्षकांसोबतच नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना आहे. 

- दिलीप जाधव (निर्माते, अष्टविनायक)
दीनानाथच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुस्तक विक्री केंद्र सुरू केले आहे. त्याला आमची कसलीही हरकत नाही, पण नाटकाचे समान घेऊन येणाऱ्या बस तसेच टेम्पोमुळे शेड तुटू शकते याचा विचार ती बांधण्याची परवानगी देताना केला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे नाट्यगृहातील मुलभूत गरजांकडेही लक्ष नसल्याचा त्रास प्रेक्षकांसह आम्हालाही भोगावा लागत आहे.

- संदीप वैशंपायन (समन्वयक, नाट्यगृहे आणि जलतरण तलाव)
पुस्तकांच्या स्टॉलसाठी उभारण्यात आलेल्या शेडचा कापून त्यासाठी उभारलेले खांब दोन फुटांनी आत घेण्यात येतील. पत्राही दोन फुट कापायला सांगितले आहे. त्यानंतर नाटकांच्या मोठ्या गाड्या तसेच बसेसच्या वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही.

Web Title: Neglect of the Municipality towards Dinanath Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.