मराठी सिनेमाला हक्काचे सिनेमागृह मिळायला हवे – मकरंद अनासपुरे
By सुवर्णा जैन | Updated: October 20, 2018 18:00 IST2018-10-20T17:13:47+5:302018-10-20T18:00:00+5:30
गावाच्या ठिकाणी तीसच्या तीस दिवस कधीच नाटकं होत नाही. त्यामुळे या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृह म्हणून केला गेला आणि अगदी 20 रू. आणि 30 रू. दराने तिकीट उपलब्ध करून दिले तर सामान्यातील सामान्य माणसाला तिथे जाऊन सिनेमाचा आनंद घेता येईल.

मराठी सिनेमाला हक्काचे सिनेमागृह मिळायला हवे – मकरंद अनासपुरे
सुवर्णा जैन
मराठी सिनेमांना स्वतःचे हक्काचे सिनेमागृह मिळाले तर मराठी सिनेमा कोणत्याही चित्रपटसृष्टीला टक्कर देऊ शकतो असं अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या टॉक शोच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास संवाद साधला आणि प्रत्येक प्रश्नावर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.
इथे गप्पांना नाही तोटा कारण पाहुणा आहे मोठा अशा टॅगलाईनसह आपला नवा टॉक शो 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' रसिकांना भावतो आहे. या शोचं कोणं वेगळेपण रसिकांना भावलं असं आपल्याला वाटतं?
बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर सूत्रसंचालन करतो आहे त्याचा मुळात एक वेगळा आनंद मिळतोय. टॉक शोचं एक वैशिष्ट्य असतं की पाहुण्यांना खूप खुलवावं लागतं. मनमोकळ्या गप्पा मारता मारता अनौपचारिकता आली की पाहुणे खुलत जातात असं मला वाटतं. विविध विषयांवर त्यांना बोलतं करण्याची संधी लाभते. दुसरं महत्त्वाचे म्हणजे निवेदकाकडे उत्स्फूर्तता आणि हजरजबाबीपणा पाहिजे. दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त इतर प्रश्नांना हात घालण्याचं कसब निवेदकाकडे असले पाहिजे हे सगळे करताना पाहुणे दुखावले जाणार नाही हे काळजी घेत त्या गोष्टी मांडणं हेच खरं निवेदकाचं कौशल्य असते. हे सगळं करताना खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटतंय.
बऱ्याच कालावधीनंतर या शोच्या माध्यमातून आपण छोटा पडद्यावर पुनरागमन केले आहे. तर यामागे काही विशेष कारण?
कोणतंही काम केल्यानंतर मी छोटा गॅप किंवा अल्पविराम घेतो. कारण सातत्याने एकच काम करत राहिलं की ते ओव्हरएक्सपोझ किंवा अति होण्याची भीती असते. याच कारणामुळे मी कदाचित मालिकांमध्ये काम केलेलं नाही. कारण मालिकांमध्ये काम केलं की लोक तुम्हाला तुमच्या नावानं न ओळखता मालिकेतील नावाने ओळखू लागतात. अशापद्धतीचं ओव्हर-एक्सपोझ होणं टाळण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच कारणामुळे कोणतंही काम केल्यानंतर मी छोटा ब्रेक घेतो. एखादी चांगली संधी आली की ती स्वीकारतो आणि मग काय करण्याचीही मजा काही वेगळीच असते.
आपण तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे, मात्र सगळ्यात जास्त आपण कशात रमता ?
मी विविध माध्यमांमध्ये काम केलं आहे. नाटक केलं, सिनेमा केला, आणि छोटा पडदाही.. प्रत्येक ठिकाणी रमलो. कारण माध्यम माझ्यासाठी महत्त्वाचे नाही कारण माझ्या कामावर माझे प्रेम आहे. मी जितका सिनेमात रमलो तितका नाटकातही रमलो. जाऊ बाई जोरात यासारख्या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग केलेत. शंभराहून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. शंभराहून अधिक जाहिरातीसुद्धा केल्यात. हजाराहून अधिक कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रात मी तितकाच रमतो आणि त्याचा आनंद घेत प्रेक्षकांनाही तो आनंद द्यायला आवडतो.
आधी आपण केलेले शो आणि आताचे शो यांत आपल्याला काय फरक जाणवतो?
दिवसागणिक इंडस्ट्रीत तंत्रज्ञान बदलत चाललं आहे. त्यामुळे स्पर्धाही तितकीच कडवी होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकजण या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. याआधीही मल्टि कॅमेरा सेटअपमध्ये काम केले आहे. सगळंच भव्यदिव्य झाले आणि त्यामुळे रसिकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा वाढत जात आहे.
आपण आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. अशी कोणती भूमिका साकारण्याचं स्वप्न आहे का?, बायोपिकमध्ये काम करणार का?
मी कधीही स्वप्न पाहात नाही. जे काम मिळते ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. आगामी काळात एखादा बायोपिक करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करेन. यापूर्वीही तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमात काम केले होते. जसा दिग्दर्शक मिळतो तसं काम घडत जातं. उत्तम दर्जाचा दिग्दर्शक असेल तर त्या पद्धतीचे दर्जेदार काम होते आणि ते करायलाही मला आवडेल.
अनेक दर्जेदार मराठी सिनेमा बनतात, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात तरीही त्या सिनेमांना तिकीटखिडकीवर म्हणावं तसं यश का मिळत नाही ?
चांगले मराठी सिनेमा बनूनही म्हणावं तसं यश मिळत नाही. यासाठी मराठी सिनेमांना स्वतःच्या हक्काची सिनेमागृहं नसणं हे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे वगळता दिवसा नाटकांची परंपरा नाही. बऱ्याच ठिकाणी नाट्यगृहं आहेत. गावाच्या ठिकाणी तीसच्या तीस दिवस कधीच नाटकं होत नाही. त्यामुळे या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृह म्हणून केला गेला आणि अगदी 20 रू. आणि 30 रू. दराने तिकीट उपलब्ध करून दिले तर सामान्यातील सामान्य माणसाला तिथे जाऊन सिनेमाचा आनंद घेता येईल. सुवर्णकमळ मिळालेला सिनेमा प्रेक्षकांना आपल्याकडे पाहायला मिळत नाही अशी प्रेक्षकांना खतं असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर थोडा विचार व्हायला हवा.
कोणती गोष्ट आपण बदलली पाहिजे तर सिनेमा दाक्षिणात्य सिनेसृष्टी किंवा जगातील कोणत्याही सिनेसृष्टीला टक्कर देईल असं आपल्याला वाटते?
गेल्या 2 दशकांमध्ये मराठीत आशयघन सिनेमांची निर्मिती होत आहे. त्यामुळे अशा सिनेमांना न्याय मिळायला हवा. तरूण दिग्दर्शकांनी मोठ्या मेहनतीने मराठी सिनेमाला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर नेलं आहे ही तमाम मराठीजनांसाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र प्रेक्षक म्हणून ते सिनेमा पाहायला मिळाले पाहिजेत. आपल्यालाही आपले सिनेमा पाहाता आले पाहिजेत. त्यासाठी तालुका ठिकाणच्या एसटी डेपो असतात तिथे छोटे छोटे थिएटर ज्याला आपण मिनीप्लेक्स म्हणतो ते उभारले गेले पाहिजेत. त्यामुळे 12 कोटी लोकसंख्येपैकी किमान 1 कोटी लोक मराठी सिनेमा पाहतील. त्यानिमित्ताने निर्मात्याला प्रत्येकी 10 रूपयेप्रमाणे 10 कोटी तरी मिळतील. त्यामुळे साहजिकच मराठी सिनेमाची व्याप्ती आणि लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. सिनेमाला असा भरघोस प्रतिसाद मिळाला तर आणखी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण सिनेमा बनण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे कितीतरी प्रसंग आहेत त्या प्रत्येकावर एखादा सिनेमा बनू शकतो. सिनेमाला लागणे बजेट, भव्यदिव्यता सगळं आपल्याकडे आहे. फक्त रसिकांचा प्रतिसाद हवा आहे आणि त्याचा मोबदला मिळाला तर जगातील कुठल्याही चित्रपटसृष्टीला टक्कर देण्याची क्षमता मराठी सिनेमाकडे आहे. बाहुबलीसारख्या सिनेमाला दक्षिणकडे जसा प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद मराठी सिनेमाला मिळाला तर मराठी चित्रपटसृष्टी एक मोठी इंडस्ट्री म्हणून नावारूपाला येईल. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात सिनेमा बनवले आण बघितलेही जातात. महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक हिंदी सिनेमा बघतो मात्र मराठी तितकेसे बघत नाहीत. त्यामुळे हे चित्र बदललं तर मराठी चित्रपटसृष्टीलाही आणखी सोन्याचे दिवस येतील याची तीळमात्र शंका नाही.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर फिरता, शेतकऱ्यांशी संवाद साधता.. या चळवळीबाबत आणि ‘नाम’च्या आजवरील कामाबाबत जाणून घ्यायला आवडेल...
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गेल्या 3 वर्षांपासून अविरत कार्य सुरू आहे. जवळपास अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त जलसंधारणाचे काम नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून झाले आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील विविध शेतकरी बांधवांच्या जीवनावर झालेला पाहायला मिळेल. याशिवाय ज्या महिला एकट्या आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी त्यांना मदतीचा हातही दिला आहे. शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बीडच्या आर्वीमधील शिरूर कासार तालुक्यात साडेतीनशे मुलांच्या शिक्षणाची सोय होईल इतके मोठे वसतीगृह नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. याशिवाय सीमेवर काही दुर्घटना घडल्या तर त्यासाठी विशेष गट नाम फाऊंडेशनने तयार केला आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. जाहिरात न केल्याने त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचतही नसेल. मात्र नामचा उद्देश गाजावाजा करणे हा बिल्कुल नाही. मुळात काम होणं, समाजात चांगलं आणि सकारात्मक काम होणं हे नाम फाऊंडेशनसाठी महत्त्वाचे आहे. हे काम खूप महत्त्वाचे ठरेल याची खात्री आहे.