महाराष्ट्राबाहेर शूटिंग म्हणजे आपल्याच सहकाऱ्यांची उपासमार; मनसेने सुनावलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:00 IST2021-04-22T18:59:49+5:302021-04-22T19:00:12+5:30
अनेक मराठी मालिकांनी गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे, यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राबाहेर शूटिंग म्हणजे आपल्याच सहकाऱ्यांची उपासमार; मनसेने सुनावलं
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लादले आहेत. त्यानुसार काही दिवस मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणाला बंदी आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेक हिंदी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहे. त्याचसोबत आता अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण देखील महाराष्ट्राच्या बाहेर होणार असून अनेक मालिकेच्या टीम परराज्यात रवाना देखील झाल्या आहेत.
अनेक मराठी मालिकांनी गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 22, 2021
अमेय खोपकर यांनी याबाबत नुकतेच ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण राज्याबाहेर म्हणजेच गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होतंय. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’ घरीच बसवून वाऱ्यावर सोडून देण्यात आलंय. रंजक वळणावर असलेल्या मालिकांचा प्रेक्षक दुरावू नये याची काळजी करतानाच आपल्याचं सहकार्यांची उपासमार करतोय याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे, असे म्हणत अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना चांगलेच सुनावले आहे.