‘डिस्को सन्या’च्या ‘जय हरी विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ या गाण्याला प्रेक्षकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 13:53 IST2016-07-25T08:23:23+5:302016-07-25T13:53:23+5:30
काही दिवसांपूर्वीच पंढरपुरची वारी आणि रमजान ईद हे दोन्ही सण प्रमाचे व बंधूभावाचे नाते जपत आनंदाने साजरा करण्यात आले. ...

‘डिस्को सन्या’च्या ‘जय हरी विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ या गाण्याला प्रेक्षकांची पसंती
या गाण्यात एकीकडे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला दिलेली साद....तर दुसरीकडे संगीततल्या डेप्थमध्ये जाऊन अल्लाहला पुकारताना बॉलिवूडचे गायक शबाब साबरी यांचा सुफी सरगममधला आवाज...सोबतीला प्रत्येकाच्या मनात रूजणारे गाण्याचे शब्द...यामुळे हे गाणे एकदम धमाकेदार असून प्रेक्षकांच्या ओठी रुळणार आहे. विषेश म्हणजे बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या चित्रपटांना सुपरहिट गाणे देणारे ‘दबंग गायक’ शबाब साबरी हे या गाण्यातून प्रथमच मराठीत गात आहेत. ‘काय कसली शेंडी...अन काय कसली दाढी...काय कसला भगवा...अन काय कसला हिरवा...’ गाण्याच्या या सुरवातीच्या दोन आळींतच गाण्याची ओळख करून माणूसकीचा संदेश देण्यात आला आहे. तसेच गाण्याचा शेवट हा गायक नंदेश उमप आपल्या लोकसंगीतातून ‘अल्लाह हू अकबर’ तर गायक शबाब साबरी सुफी संगीतातून हे ‘जय हरी विठ्ठल’ असे बोलताना केला आहे. त्यामुळे केवळ गाण्यांच्या शब्दातूनच नव्हे तर एकमेकांच्या देवतांना साद घालून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे,
हे या गाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे गीत असून कुठेतरी माणसा-माणसातली माणूसकी, आपुलकी जागी व्हावी असं हे गाणे ऐकल्यावर वाटू लागतं. आपल्या गाण्यातून सामाजिक प्रबोधन होईल किंवा नाही यापेक्षा हा विचार जरी काही क्षणासाठी आपण या समाजात रुजवू शकलो तरी पुरेसं असल्याचं संगीतकार व निर्माते सचिन-अभिजीतना वाटतं. या गाण्यातील काळजाचा ठाव घेणारे शब्द चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी लिहीले असून, रोमारोमात भिनणारे संगीत आणि याच्या जोडीला तितक्याच उच्च प्रतिच्या चित्रीकरणाने हे गाणे प्रत्येकाच्याच मनात एक जाणीव निर्माण करून जाते. बालकलाकार पार्थ भालेराव आणि अभिनेता संजय खापरे यांच्यातील गंमतीदार कसरतीने रोमांचकारी रोलर कोस्टर राईडचा अनुभव मांडलेला ‘डिस्को सन्या’ हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.