नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा असावा : दिलीप प्रभावळकर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 26, 2023 11:24 PM2023-11-26T23:24:49+5:302023-11-26T23:25:06+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

As a actor, you should have a touch of humanity: Dilip Prabhawalkar | नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा असावा : दिलीप प्रभावळकर

नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा असावा : दिलीप प्रभावळकर

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो आणि नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता असे मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. 

१३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह व विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार सोहळा रविवारी डॉ. काशिनाथ घाणेकरनाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रभावळकर यांना मृध्गंध जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. नाटककार, फिल्ममेकर्स, लोककलावंत यांच्यामुळे माझ्या अभिनयाची जडणघडण झाली. मला ज्या भूमिका मिळाल्या त्या भूमिकांमधून मी शिकत गेलो. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोकलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मला मिळाला हे माझे भाग्य मानतो. त्यांनी मला प्रेक्षकांशी संवाद कसा साधायचा हे शिकवले.

यावेळी संगीत क्षेत्रासाठी सुदेश भोसले, लोककलेसाठी आतांबर शिरढोणकर, समाजसेवा क्षेत्रासाठी अनुराधा भोसले, अभिनय क्षेत्रासाठी चिन्मयी सुमीत आणि सुमीत राघवन, नवोन्मेष प्रतिभा पुरस्कारासाठी केतकी माटेगावकर आदींना मृद्गंध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. दिग्गज कलाकारांनी उपेक्षित वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करुन दिले तर त्यांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकवर्गही मिळेल अशी अपेक्षा उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केली.नाट्य, कला, संगीत या कार्यक्रमांना आले की बरे वाटते कारण येथे सभात्याग होत नाही असे डॉ. गोऱ्हे मिश्कीलपणे म्हणाल्या.

चिन्मयी सुमीत यांनी मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला असता तोच धागा पकडून डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, लोकशाहीरांचा आवाज विधानपरिषदेत कसा दुमदुमेल यासाठीही प्रयत्न करु असे आश्वासन दिले. नंदेश उमप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नरेश म्हस्के, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी, सरिता उमप आदी उपस्थित होते.

Web Title: As a actor, you should have a touch of humanity: Dilip Prabhawalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.