नाटकातून मांडले विवेकानंदांचे विचार!
By Admin | Updated: January 12, 2016 03:28 IST2016-01-12T03:28:30+5:302016-01-12T03:28:30+5:30
स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘आयडियल ड्रामा अॅण्ड एंटरटेनमेंट अॅकॅडमी’ने (आयडिया) केला आहे. मंगळवारी मुंबई

नाटकातून मांडले विवेकानंदांचे विचार!
मुंबई : स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘आयडियल ड्रामा अॅण्ड एंटरटेनमेंट अॅकॅडमी’ने (आयडिया) केला आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील कुसुमाग्रज भाषा भवनात ‘स्वामी विवेकानंद’ नाटकाचा पहिला प्रयोग दुपारी ३ वाजता मोफत सादर केला जाईल.
नाटकाचे दिग्दर्शक मुजीब खान यांनी नाटकाबद्दल सांगितले की, ‘सईद हमीद यांनी लिहिलेल्या या नाटकातून स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण जीवनाचे सार लक्षात येईल. हिंदू आणि मुस्लीम धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींना बगल देत विवेकानंदांनी कशाप्रकारे सुवर्णमध्य साधला, याचे काही किस्सेही नाटकात पाहायला मिळतील. एकूण १० कलाकार कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत.’
‘उठा, जागृत व्हा!’ : ‘उठा, जागृत व्हा आणि लक्ष्यप्राप्तीपर्यंत थांबू नका’ या विवेकानंदांच्या आवाहनाची छबी नाटकातून दिसणार आहे. विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या सहकार्याने हे नाटक उभे राहिले आहे. यापुढेही मुंबईसह प्रथम राज्यात आणि नंतर देशात या नाटकाचे सादरीकरण मोफत करणार असल्याचे मुजीब खान यांनी सांगितले. अधिकाधिक लोकांना त्यांचे विचार कळावेत, या उद्देशाने या नाटकाचे प्रयोग भविष्यात सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंगालीचा तडका : मूळ बंगालचे असल्याने नाटकात थोडा बंगाली साज दिसून येतो. मात्र संपूर्ण नाटक हिंदी भाषेतून सादर केले जाणार आहे. नाटकात एका बंगाली गाण्याचा आवर्जून समावेश केल्याचे खान यांनी सांगितले. हलक्याफुलक्या आणि बोलीभाषेत नाटक सादर केल्याने तरुणांना ते अधिक जवळचे वाटेल, असा दावाही त्यांनी केला आहे.