कपिल शर्माला चॅनलकडून एक महिन्याचा अल्टिमेटम?
By Admin | Updated: April 3, 2017 12:05 IST2017-04-03T12:05:50+5:302017-04-03T12:05:50+5:30
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या कॉमेडियन कपिल शर्मानं आपला "द कपिल शर्मा शो" बंद करावा लागेल, याचा स्वप्नातही कधी विचार केला नसावा.

कपिल शर्माला चॅनलकडून एक महिन्याचा अल्टिमेटम?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या कॉमेडियन कपिल शर्मानं आपला "द कपिल शर्मा शो" बंद करावा लागेल, याचा स्वप्नातही कधी विचार केला नसावा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात या शोचा नव्याने करार होणार होता. 106 कोटी रुपयांपर्यंत याचा करारदेखील करण्यात आला होता. मात्र, कपिल शर्मा-सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे हा करार वादात सापडणार असल्याचे चित्र आहे.
"द कपिल शर्मा शो" पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी चॅनेलकडून कपिलला एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कपिल शर्मा आणि कार्यक्रमातील अन्य सह कलाकारांसाठी ही शेवटची संधी असल्याचंही बोलले जात आहे. जर या संधीचं त्यांनी सोनं केलं तर चॅनेल हा शो पुढे चालवण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. तसं न झाल्यास शो बंद होण्याची टांगती तलवार कपिलवर आहे.
सध्या शोचा टीआरपी पाहता, कपिलसाठी सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा यांच्याशिवाय शोमध्ये कॉमेडी करणं कठीण झालं आहे. दरम्यान, ही सर्व मंडळी शोमध्ये पुन्हा सहभागी होण्याच्या मनस्थितीतही नाहीत. यामुळे शो बंद करण्याशिवाय चॅनेलकडे दुसरा पर्यायही नाही, अशी माहिती आहे.
सुनील ग्रोव्हरसहीत दुस-या सह कलाकारांनी शो सोडल्यापासून आतापर्यंत दोन एपिसोड झालेत. मात्र या दोन्ही एपिसोडचा टीआरपी जबरदस्त घसरला आहे. दरम्यान सुनील ग्रोव्हर व अन्य कलाकारांच्या अनुपस्थितीत शो खेचण्याचा पुरेपुर प्रयत्न कपिल शर्मा करत आहे. मात्र त्याला प्रेक्षकांना हसवण्यात हवं तसे यश मिळताना दिसत नाही. कपिलने शोमध्ये राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि अहसान कुरेश यांना घेतलं आहे. मात्र यातही त्याला फारसं यश मिळालेलं नाही.
दरम्यान, नुकतंच सुनील ग्रोव्हरनं नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये एक लाईव्ह शो केला. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी या शोला भरभरून प्रतिसादही दिला. यामुळे आता कपिल शर्मा स्वतःचा शो बंद होण्यापासून वाचवणार की खुद्द नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर सादर होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.