‘गाण्यातला भाव समजणे महत्त्वाचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:02 IST2017-05-27T01:56:19+5:302023-08-08T16:02:42+5:30
‘पल’ या अल्बममुळे गायक केके प्रकाश झोतात आला, तर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील ‘त़डप तडप के इस दिल से’ हे गाणे त्याच्या करिअरचे टर्निंग पॉर्इंट ठरले

‘गाण्यातला भाव समजणे महत्त्वाचे’
- गिताजंली अंबरे
‘पल’ या अल्बममुळे गायक केके प्रकाश झोतात आला, तर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील ‘त़डप तडप के इस दिल से’ हे गाणे त्याच्या करिअरचे टर्निंग पॉर्इंट ठरले. यानंतर अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली. जवळपास २० वर्षांच्या करिअरमध्ये ५०० गाणी त्याने गायली. त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्याच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद...
४तुझा ‘पल’ हा अल्बम खूपच गाजला त्याबद्दल सांगशील?
- मी दिल्लीवरून येताना एक अल्बम करायचा असे डोक्यात ठेवून आलो होतो. पल या अल्बममुळे मला माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. खूप वर्षांचे माझे स्वप्न पूर्ण झाले. ‘यारो दोस्ती बडी ही हसीन है’, ‘याद आयेंगे ये पल’ हे गाणं आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. जेवढी माझी चित्रपटातली गाणी हिट आहेत तेवढीच माझी ही दोन्ही गाणीसुद्धा लोकप्रिय आहेत. फे्रंडशिप डेला, फेअरवेलच्या ठिकाणी आजही ही गाणी आवर्जून ऐकू येतात.
४तुझे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते, मग तू गायक कसा झालास?
- लहानपणी आपली खूप स्वप्न असतात त्यापैकीच एक माझे डॉक्टर व्हायचे होते. माझ्या लहानपणी एक डॉक्टरकाका यायचे जे आम्हाला बरे नसताना औषध देऊन जायचे. त्यांना बघून मला नेहमी असे वाटायचे, काय मस्त काम करतात हे. त्यांना बघून मला लहानपणी वाटायचे, की मी पण डॉक्टर बनेन. मोठ्या झाल्यावर कळले की, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते हे काही आपल्याला जमणार नाही. (हसून) शाळेत असताना एकदा गाणे गायले आणि माझे गाणे संपताच लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. माझ्या शिक्षकांनी येऊन माझे कौतुक केले. यानंतर मी अनेक स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात मला बक्षिसे मिळत गेली आणि इथून खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला.
४‘तडप तडप के’ हे गाणे तुझ्या करिअरचे टर्निंग पॉईंट
ठरले का?
- या गाण्याने मला घराघरांत पोहोचवले. १९९९ हे साल माझ्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. ‘हम दिल दे चुके सनम’ मधील या गाण्याने माझ्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हे गाण्याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. हे गाणे प्रदर्शित झाल्यावर जेव्हा मला लोक भेटायचे तेव्हा त्यांच्या रिअॅक्शन्स काहीशा अशा असायच्या, ‘अरे तू तर खूप तरुण आहेस. मग तुझ्या आवाजात एवढे इमोशन कुठून आले? मला वाटते गाण्याला कधी तुमच्या वयाची मर्यादा नसते. एकदा तुम्ही त्याला आपले म्हटले की, मग ते तुमचे होते. या गाण्यानंतर मला अनेक गाण्यांच्या आॅफर्स मिळाल्या.
४जवळपास २० वर्षे तुला या म्युझिक इंडस्ट्रीत पूर्ण झाली आहेत, आजच्या संगीतात काय बदल झाल्याचे तुला जाणवते ?
- खूप संगीतकार तरुण मुले आहेत. आजकाल स्पर्धा ही तेवढीच वाढली आहे. आपल्या देशात टॅलेंटची काहीच कमी नाही आहे. खूप वेगवेगळे आवाज आपल्या सतत कानावर पडतायेत. गाण्याचे तंत्रज्ञान बरेच विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे बराच वेळ वाचतो. मात्र, गायकाने यावर खूप अवलंबून राहू नये. कारण याचा उपयोग गायकाला लाईव्ह गाताना होत नाही. यामुळे फक्त तुमचा स्पीड वाढला आहे. कामे लवकर होतात. स्टुडिओत जाऊन ४० मिनिटांत तुम्हाला या नव्या तंत्रज्ञानामुळे गाणे रेकॉर्ड करणे सोपे झाले आहे.
४रिअॅलिटी शोबद्दल तुझे मत काय आहे?
- मी जास्त रिअॅलिटी शो बघत नाही. या रिअॅलिटी शोमधून अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याचा प्लॅटफॉर्म मिळतो. परीक्षक त्यांच्यातील स्पार्क बघून त्यावर मेहनत घेऊन त्यांना प्रेक्षकांपर्यंत आणतात. त्यामुळे अनेक वेगळे आवाजदेखील इंडस्ट्रीला मिळाले आहेत. जेवढे जास्त सिंगर तेवढी व्हरायटी ऐकायला मिळते.
४सध्या यू ट्यूबवर सिंगल साँगचा ट्रेंड चालू आहे. केके आम्हाला सिंगल साँग गाताना दिसणार आहे का?
- मी सिंगल्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात जास्त कठीण सिंगल्स करणेच असते. आधी अल्बममध्ये ७ ते ८ गाणी असायची आता सिंगल्समध्ये असे होत नाही. माझे दोन तीन सिंगल्स साँग कच्चे पक्के तयार आहेत.