‘नच बलियेमुळे झाली फॅन फॉलोर्इंगमध्ये वाढ’

By Admin | Updated: January 14, 2017 06:47 IST2017-01-14T06:47:54+5:302017-01-14T06:47:54+5:30

मराठीतील आजची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतेय. तिने नच बलियेचे

'Increase in Fan Follow Up due to Nach Baliya' | ‘नच बलियेमुळे झाली फॅन फॉलोर्इंगमध्ये वाढ’

‘नच बलियेमुळे झाली फॅन फॉलोर्इंगमध्ये वाढ’

मराठीतील आजची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतेय. तिने नच बलियेचे विजेतेपद मिळवले. तसेच ‘24’ या मालिकेत ती अनिल कपूरसोबत झळकली. तिच्या या प्रवासाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
छोट्या पडद्यावर सध्या अनेक रिअ‍ॅलिटी शो सुरू आहेत. या रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धकांना फायदा होतो का?
-मी माझ्या करिअरची सुरुवात एका रिअ‍ॅलिटी शोद्वारे केली आहे. सिनेस्टार की खोज या कार्यक्रमात झळकल्यानंतरच मी इंडस्ट्रीत आले. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शो तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळवून देतो असे मी नक्कीच म्हणेन. पण या प्लॅटफॉर्मचा वापर कशाप्रकारे करायचा हे तुम्ही तुमचे ठरवायचे असते. मी रिअ‍ॅलिटी शो केल्यानंतर काही मालिकांमध्ये काम केले. त्या वेळी तू तर चित्रपटात काम करण्यासाठी अगदी योग्य आहेस, मालिकांमध्ये का काम करतेस असे माझे अनेक फ्रेंड्स मला म्हणायचे. पण मी केवळ माझ्या मनाचे ऐकले. काम कोणतेही असूदे, ते तुम्ही मनापासून केले पाहिजे असे मी मानते. मी त्या वेळी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज मला यश मिळवता आले आहे.
प्रस्थापित कलाकार आॅडिशनपासून दूर राहतात, पण तू आजही आॅडिशन द्यायला तयार असतेस याचे कारण काय?
-एकदा कलाकारांनी त्यांच्या क्षेत्रात जम बसवला की, त्यांना आॅडिशनला जायला आवडत नाही. पण मी आजही कोणत्याही आॅडिशनला जायला तयार असते. माझ्या मते आॅडिशन हे तुमचे नसून तुम्ही साकारणार असलेल्या भूमिकेचे असते. त्यामुळे कोणतेही आॅडिशन देण्यात कमीपणा का मानायचा? आणखी दहा वर्षांनीदेखील मला कोणी आॅडिशनला बोलावले तर मी हसत जाईन.
नच बलिये या कार्यक्रमाचे तू आणि तुझे पती हिमांशू मल्होत्राने विजेतेपद मिळवलेस, या कार्यक्रमाचा तुला किती फायदा झाला?
-नच बलिये या कार्यक्रमातून मला खूप काही शिकायला मिळाले. मी सगळ्या प्रकारचे नृत्यप्रकार चांगल्याप्रकारे सादर करू शकते हे लोकांना या कार्यक्रमामुळे कळले. एक वेगळी अमृता या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मी या कार्यक्रमानंतर रणवीर सिंगसोबत काही इव्हेंट केले. तसेच मला यानंतर अनेक मालिकांच्या आॅफर्स मिळाल्या. त्यामुळे नच बलिये माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मालिकांच्या आॅफर्स येत असल्या तरी मालिकेत काम करायचेच नाही असे मी ठरवले आहे. कारण मालिकेत काम करायचे असल्यास तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवसच त्यासाठी द्यावा लागतो. सुट्ट्या न घेता रोज कित्येक तास चित्रीकरण करावे लागते. या गोष्टी मला आवडत नसल्याने मी मालिकेपासून दूरच राहाते.
एका डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका बजावतेस, तू स्वत: एक चांगली नर्तिका आहेस, त्यामुळे परीक्षण कसे करायचे हे तू काही ठरवले आहेस का?
-मी परीक्षण करताना कधीही इमोशनली विचार करत नाही. माझ्यासाठी नृत्य हे सगळ्यात महत्त्वाचे असते. उगाचच कशाही पद्धतीने नाचलेले मला आवडत नाही. त्यामुळे मी परीक्षण करताना थोडीशी स्ट्रीक्ट राहाणार आहे.

Web Title: 'Increase in Fan Follow Up due to Nach Baliya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.