‘निगेटिव्ह भूमिका मला भावतात’
By Admin | Updated: March 31, 2017 05:18 IST2017-03-31T05:18:21+5:302017-03-31T05:18:21+5:30
छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून प्रियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे

‘निगेटिव्ह भूमिका मला भावतात’
-Suvarna Jain -
छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून प्रियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील ‘वर्षा’ म्हणून घराघरात पोहोचलेली प्रिया सध्या छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारत आहे. याचनिमित्ताने सीएनएक्स लोकमतने प्रियाशी दिलखुलास साधलेला संवाद.
सध्या तू ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत काम करीत आहेस, या मालिकेत तू आजवर कधीही न केलेल्या गोष्टी केल्या आहेस, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
- या मालिकेत मी निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारत आहे. आजवर मी बऱ्याच निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. मात्र या भूमिकेला वेगळी शेड आहे. याआधी लेहंगा, भले मोठे दागदागिने, मोठी बिंदी, फुलआॅन गुजराती-राजस्थानी अशा प्रकारची भूमिका कधीही साकारली नव्हती. त्यामुळे या भूमिकेचा आॅरा काही निराळाच आहे. गुजराती आणि राजस्थानी भाषेचा सरमिसळ करत ती बोलते. ही भूमिका साकारण्याआधी मी फक्त तिची कल्पना केली, की ही व्यक्तिरेखा कशी असेल? कारण मी साकारत असलेली व्यक्ती फक्त हिंदीत बोलली तर काही मजा येणार नाही. त्यामुळे गुजराती-राजस्थानी भाषेचा एकत्रित वापर करून बोलल्याने भूमिकेला वेगळं वजन लाभलं आहे. याआधीही ‘तू तिथे मी’ या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरी त्यात फार काही वेगळं करायला मिळालं नव्हतं. मात्र त्यानंतर ज्या मालिकांमध्ये विशेष करण्यासारखं काही असेल अशाच भूमिका साकारण्यावर मी भर दिला आणि आता मी त्याचा आनंद घेते आहे.
मराठी असो किंवा हिंदी दोन्ही भाषेतील मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडण्यात तू यशस्वी ठरली आहेस. मात्र दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना तुला काय वेगळेपण जाणवलं?
- मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करताना बराच फरक मला जाणवतो. हिंदीत काम करताना एकाच वेळी खूप जास्त रसिकांपर्यंत पोहोचता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बजेट. हिंदी मालिकांचं बजेट हे मराठी मालिकांपेक्षा तुलनेने जास्त असते. मराठीत विशेष शूट असेल तर दोन युनिट लावली जातात. मात्र हिंदीचं तसं नसतं, तिथे कायमच दोन युनिट कार्यरत असतात. त्यामुळे कलाकारांना कोणत्याही गोष्टीसाठी तडजोड करावी लागत नाही. इथे मला एक किस्सा शेअर करावासा वाटतो. एकदा ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या शूटसाठी मी काश्मीरला गेले होते. महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला लोक ओळखतातच. मात्र काश्मीरमध्ये मी गेल्यावर मला तिथले लोक ओळखतील, याची कल्पनाही नव्हती. तिथल्या लोकांनी मला जणू काही आश्चर्याचा धक्का दिला. मला पाहून ते खूप खूश झाले. यावरून मला हिंदी मालिकांचे प्रेक्षक वर्ग किती मोठा असतो हे कळले. कलाकाराला रसिकांकडून कौतुकाची थाप मिळणे, त्यांचं प्रेम मिळणं हेच हवं असते. त्यादिवशी काश्मीरच्या लोकांच्या त्या प्रतिसादामुळे मी केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं.
बऱ्याच वर्षांपासून तू मालिकांमध्ये काम करीत आहेस. तुला या इंडस्ट्रीत काही बदल झालेत, असे वाटते का?
- सध्या मालिकांमध्ये निरनिराळे प्रयोग होत आहेत. विशेषत: मराठी मालिकांमध्येही हे प्रयोग होत आहेत आणि ते रसिकांनाही भावतायत. प्रत्येक वेळी नावीन्यपूर्ण गोष्टी आणि नवे प्रयोग होणं गरजेचं आहे. मी सुरुवात केली तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मात्र आता हळूहळू चित्र पालटू लागलं आहे. त्यातच मी मराठीत काम करीत राहिले असते तर कदाचित रसिकांचं प्रेम किंवा इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकले नसते. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आजही इंडोनेशियामध्ये सुरू आहे. तिथल्या रसिकांच्या मला प्रतिक्रिया येतात. त्यामुळे खूप अभिमान वाटतो.
तू निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. शिवाय इतर प्रकारच्याही भूमिका तू तितक्याच खुबीने निभावल्या आहेस. मात्र तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात?
- निगेटिव्ह असो किंवा मग चांगल्या शेड असलेल्या पॉझिटिव्ह भूमिका दोन्ही एन्जॉय करते. निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारण्यात कलाकाराचा जास्त कस लागतो, असं मला वाटतं. मी ज्या वेळी निगेटिव्ह भूमिका साकारते त्या वेळी त्यात माझ्या सहकलाकाराचाही तितकाच वाटा असतो. माझ्या अॅक्शनवर त्याची रिअॅक्शन येते, त्या वेळी माझी व्यक्तिरेखा जास्त तिरस्कार करणारी होते. त्यामुळे माझी निगेटिव्ह भूमिका अधिक स्पष्टपणे आणि ठळकपणे रसिकांपर्यंत पोहोचते. मला सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारणं आवडत असलं तरी माझं मन जास्त निगेटिव्ह भूमिकांमध्ये रमतं. जेव्हा मला रसिक भेटतात आणि सांगतात, की तुम्ही आॅफस्क्रीन तर खूप चांगल्या प्रेमळ वाटता. मात्र आॅनस्क्रीन पाहताना तुमचा खूप राग येतो. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून मला त्यांच्या भावना कळतात. म्हणजे निगेटिव्ह भूमिकेमुळे त्यांना राग येतोच, मात्र ती व्यक्तिरेखा त्यांना भावते.