पती, पत्नी और वो...
By Admin | Updated: December 12, 2015 02:02 IST2015-12-12T02:02:29+5:302015-12-12T02:02:45+5:30
‘पती, पत्नी और वो’ या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट आलेत. त्यांनी बॉक्स आॅफीसवर चांगली कमाईही केली. अनेक कलावंतांना तर अशा चित्रपटांमुळेच मोठी ओळखही मिळाली.

पती, पत्नी और वो...
‘पती, पत्नी और वो’ या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट आलेत. त्यांनी बॉक्स आॅफीसवर चांगली कमाईही केली. अनेक कलावंतांना तर अशा चित्रपटांमुळेच मोठी ओळखही मिळाली. तिहेरी नात्यांच्या भावविश्वात गुंतलेली पडद्यावरची ही कथा यातल्याच काही कलावंतांनी प्रत्यक्ष आयुष्यातही जगली. कुणी ‘वो’च्या नादी लागून आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली, तर कुणी पत्नीपे्रमाच्या पाशातून बाहेर पडू शकले नाही आणि अशावेळी त्यांच्या ‘वो’ला अख्खे आयुष्य एकटेच जगावे लागले. कोण कोण होते यात बघा जरा...
अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची प्रेमकथा ‘दो अनजाने’च्या सेटवर सुरू झाली. त्यावेळी अमिताभने जया भादुरीशी विवाह केला होता. या दोंघाबद्दलचे गॉसिप प्रसिद्ध होत होते. मोठ्या वृत्तपत्रात अशा बातम्या झळकत होत्याच. एक दिवस जया भादुरीने रेखाला जेवनाचे आमंत्रण दिले. याच वेळी काहीही झाले तरी मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही, हे तिने रेखाला ठणकावून सांगितले. आधी रेखानेही आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली पण नंतर या सर्व गोष्टींना तिने नकार दिला. आपल्या प्रेमाचे कोणतेही भविष्य नाही हे तिला कळले असावे कदाचित.
धमेंद्र - हेमा मालिनी : ‘तूम हसीन मैं जवान’च्या शूटिंगदरम्यान वीरू (धमेंद्र) बसंतीच्या (हेमा मालिनी) प्रेमात पडला. त्यावेळी त्याचे लग्न प्रकाश कौरशी झाले होते. सनी व बॉबी ही दोन मुलेही त्याला होती. दोघांत जरी १३ वर्षांचे मोठे अंतर असले तरी ही प्रेमकथा फुलली अन् बहरलीही. हेमाने विवाहित पुरुषांशी लग्न करण्याचा प्रस्ताव मान्य केला. मात्र प्रकाश हिने घटस्फोट देण्यास नकार दिला. अखेर धमेंद्र व हेमा मालिनीने इस्लाम कबूल करून कायदेशीर विवाह केला.
मिथुन चक्रवर्ती - श्रीदेवी : श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात पडली त्यावेळी मिथुनचा योगिता बालीशी विवाह झाला होता. त्यांनी लपून विवाह केला असल्याचेही सांगण्यात येत होते. ही गोष्ट योगिता बालीपासून लपवून ठेवली गेली. याच तणावातून योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशीही अफवा उडली. यानंतर त्यांनी विवाह न करण्याचे ठरविले. अखेर श्रीदेवीने बोनी कपूरशी विवाह केला. बोनीदेखील विवाहित होता. त्याने या सुंदरीसाठी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला, मुलालाही सोडले!
राज बब्बर - स्मिता पाटील : नादिराने दोघांचे संबध उदार मनाने स्वीकारले. दोघांच्या विवाहाबाबत नादिरा हिचा विचार काही वेगळा दिसतो. ती म्हणते की स्मिताला माझ्या नवऱ्यासोबत राहायला आवडत होते. तिला त्याचा सहवास हवा होता. दोघांच्या अफेअरची चर्चा माझ्या कानावर आली होती, पण मी तिचा स्वीकार केला. तिला आपल्या घरी जागा दिली. आम्ही सर्वांनी एकमेकांचा कायम आदर केला. मात्र ही प्रेमकथा फार काळ चालली नाही. प्रसूतीच्या दरम्यान स्मिताचा मृत्यू झाला. राज परत नादिराकडे आला तर प्रतीकची देखरेख त्याच्या आजोबांनी केली.
आदित्य पांचोली - कंगना राणावत : कंगना राणावत स्ट्रगल करीत असताना ती आदित्य पांचोलीला भेटली. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यावेळी या दोघांत सुमारे २० वर्षांचे अंतर होते. आदित्य विवाहित होता व त्याला मुलेही होतीच. दरम्यान, दोघांत वितुष्ट आले. याच काळात आदित्य पांचोलीने कंगनाला घर विकत घेण्यासाठी मोठी रक्कम दिल्याची वार्ता पसरली. या दरम्यान कंगनाच्या बहिणीवर अॅसिडहल्ला झाला. यावेळी हॉस्पिटलचे बिल आदित्यने दिल्याची बातमी आली होती. यात कंगनाला आरोपी करण्यात आले होते.
संजय खान - झीनत अमान : संजय खान याने आधीच अभिनेत्री झरीन खान हिच्याशी निकाह केला होता. मात्र तो स्वत:ला झीनत अमानसारख्या बोल्ड व ब्युटीफुल अभिनेत्रीसोबत विवाह करण्याच्या मोहापासून आवरू शकला नाही. पण दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. संजयची पत्नी झरीनच नव्हे तर झीनतचे अपंगत्व यासाठी कारणीभूत ठरले. झीनतने आपला एक डोळा गमविला, सोबतच तिची प्रकृती ढासळू लागली आणि ही कथाही तेथेच संपली.