शंभरी अर्धवटरावांची
By Admin | Updated: October 6, 2016 02:53 IST2016-10-06T02:53:12+5:302016-10-06T02:53:12+5:30
रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांवर लोकांनी भरभरून प्रेम केले. चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला हसवणाऱ्या अर्धवटराव या बाहुल्याने नुकतीच शंभरी पार केली

शंभरी अर्धवटरावांची
रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांवर लोकांनी भरभरून प्रेम केले. चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला हसवणाऱ्या अर्धवटराव या बाहुल्याने नुकतीच शंभरी पार केली. त्या निमित्ताने शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्याशी ‘लोकमत सीएनएक्स’ने साधलेला हा खास संवाद...
अर्धवटराव या बोलक्या बाहुल्याला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत, याविषयी काय सांगाल?
माझे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात शब्दभ्रम ही कला आणि बोलक्या बाहुल्यांची संकल्पना रुजवली. वडिलांनी त्या काळात बाहुल्या तयार करून त्यांचे कार्यक्रम केले. आज त्यांनी तयार केलेल्या अर्धवटरावांची शंभर वर्षं पूर्ण झाली या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. जगभरात आज शंभरी पार करणारे अनेक बाहुले आहेत, पण ते संग्रहालयात आहेत. मात्र, अर्धवटराव आजही लोकांचे मनोरंजन करत आहेत.
अर्धवटरावांच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रवासाला सुरुवात कशी झाली?
काही वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून अर्धवटराव आणि आवडाबाई या बाहुल्यांना घेऊन मी कार्यक्रम सादर केले. यानंतरच्या काही जाहिरातींमध्येदेखील बाहुल्यांची कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यानंतर महेश कोठारेंनी बोलक्या बाहुल्याला चित्रपटात घेण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या 'झपाटलेला' या चित्रपटातून 'तात्या विंचू'ने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्या पूर्वी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'महान' या चित्रपटात बाहुल्यांना घेऊन मी काम केले होते. त्या वेळी अमिताभ बच्चनदेखील या खेळाला बघून खूप प्रभावित झाले होते. अशा प्रकारे 'अर्धवटराव' आणि 'तात्या विंचू'चा चित्रपट इंडस्ट्रीत प्रवेश झाला.
आजच्या तरुणाईने शब्दभ्रम या कलेत करिअर
करावे असे तुम्हाला वाटते का?
करिअरच्या दृष्टीने या कलेत खूप वाव आहे. नव्या पिढीने या कलेत करिअर करावे. मात्र, ही कला शिकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे.
तुमचे संपूर्ण कुटुंबीय या कलेत तुमच्याबरोबर सहभागी झाले आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटते?
आमच्या घरात पहिल्यापासूनच या खेळाची सगळ्यांना आवड होती. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात मला पत्नी अपर्णाची साथ मिळाली. त्यानंतर, माझ्या मुलांनीदेखील करिअर म्हणून हीच कला स्वीकारली. आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी माझा मुलगा इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यानंतर, त्याने स्वत:हून नोकरी सोडून या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमचे संपूर्ण कुटुंब ‘बोलक्या बाहुल्यां’चे झाले आहे.
तुमच्या करिअरचा टर्निंग पॉइंट कोणता?
लहानपणापासून मी वडिलांजवळ बोलक्या बाहुल्यांचा खेळ शिकत होतो. या खेळाबरोबरच मी माझे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षणदेखील पूर्ण केले. बाहुल्यांच्या खेळासाठी मला एकदा अमेरिकेत बोलावण्यात आले. तिथे गेल्यावर बाहुल्यांचा खेळ पाहून माझ्या लक्षात आले की, या खेळामध्ये करण्यासारखे खूप काही आहे. मग भारतात येऊन मी नोकरी सोडून दिली आणि या कलेला प्राधान्य दिले. तोच माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.