बालवर्गात अडकलेला तास!

By Admin | Updated: February 26, 2016 21:26 IST2016-02-26T21:26:35+5:302016-02-26T21:26:35+5:30

कोणत्याही चित्रपटाचा केवळ विषय चांगला असून चालत नाही; तर त्या विषयाच्या खोलात शिरून त्याची मांडणी कशी केली जाते हे महत्त्वाचे ठरते. पण तसे झाले नाही तर मात्र मेहनतीवर पाणी पडल्याचे चित्र दिसते.

Hours stuck in child! | बालवर्गात अडकलेला तास!

बालवर्गात अडकलेला तास!

राज चिंचणकर - 
कोणत्याही चित्रपटाचा केवळ विषय चांगला असून चालत नाही; तर त्या विषयाच्या खोलात शिरून त्याची मांडणी कशी केली जाते हे महत्त्वाचे ठरते. पण तसे झाले नाही तर मात्र मेहनतीवर पाणी पडल्याचे चित्र दिसते. ‘बाबांची शाळा’ या चित्रपटाबाबत असेच काहीसे घडले आहे. या शाळेत शिकवला जाणारा विषय उत्तम आहे खरा; परंतु तो शिकवणाऱ्या शिक्षकाने त्यात जीव ओतला नसल्याने या विषयाचा तास केवळ बालवर्गात अडकलेला आहे. परिणामी ही शाळा काही व्यवस्थित भरलेली नसल्याचे पाहावे लागते.
एकदा ध्यानीमनी नसताना महिपतच्या हातून गुन्हा घडल्याने त्याला शिक्षा होते व तो तुरुंगात जातो. त्यामुळे महिपतची मुलगी सोनाली एकटी पडते. श्रीकांत जमदाडे हे त्या तुरुंगाचे जेलर असतात. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्यांचा कैद्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो आणि ते याबाबत ठोस पावले उचलण्याचे ठरवतात. त्यासाठी ते नीता या सामाजिक कार्यकर्तीच्या साहाय्याने एक प्रोजेक्ट तयार करतात. वडील व मुलगी, तसेच जेलर व कैदी यांच्या संवेदनांवर प्रकाश टाकत हा चित्रपट विचार करायला लावतो.
नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा व संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. परंतु मूळ कथेचा आवाका लक्षात घेता ते दोन पावले मागे पडले आहेत. एका क्षणी रागावर ताबा मिळवू न शकलेल्या आणि त्यामुळे हातून गुन्हा घडलेल्या व्यक्तींविषयी हा चित्रपट बोलतो. अशा व्यक्ती काही सराईत गुन्हेगार नसतात, यावरही तो भाष्य करतो. या व्यक्ती किंवा कैदी शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर समाज त्यांना स्वीकारतो का, हा प्रश्न या चित्रपटाने उपस्थित केला आहे. वास्तविक हा विषय महत्त्वाचा आहे; परंतु दिग्दर्शक आर. विराज यांची दिग्दर्शकीय मांडणी त्या तोलामोलाची झाली नसल्याने गडबड उडाली आहे. चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंटही साधारण आहे.
चित्रपटात शशांक शेंडे यांनी साकारलेला महिपत चमक दाखवून जातो. मात्र जेलरची भूमिका रंगवणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या भूमिकेने थोडा धक्का दिला आहे. त्यांची भूमिका लेखनातच नीट उतरली नसल्याचा फटका सरळसरळ या व्यक्तिरेखेला बसला आहे. साहजिकच, त्यांनी ती सावरण्यासाठी केलेले प्रयत्न तोकडे पडल्याचे जाणवते. छाया कदम (नीता), आरती मोरे (सोनाली) यांनी अभिनयाची चुणूक दाखवली आहे. उषा नाईक, ऐश्वर्या नारकर आदी अनुभवी कलावंतांचा उपयोग करून घेतला नसल्याचेही चित्रपटात पाहावे लागते. एक सशक्त कथा ज्या तडफेने पडद्यावर उतरायला हवी होती, अगदी त्यातच ती कमी पडल्याचे शल्य हा चित्रपट देतो आणि हे दु:ख पचवणे भाग पडते.

Web Title: Hours stuck in child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.