2016मधील हॉट कॉन्ट्रोव्हर्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 05:33 AM2016-12-26T05:33:41+5:302016-12-26T05:33:41+5:30

बॉलिवूड आणि कॉन्ट्रोव्हर्सी जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असा एकही महिना जात नाही, की एखादा सेलिब्रेटी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकत नाही.

Hot Controversy in 2016 | 2016मधील हॉट कॉन्ट्रोव्हर्सी

2016मधील हॉट कॉन्ट्रोव्हर्सी

googlenewsNext

बॉलिवूड आणि कॉन्ट्रोव्हर्सी जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असा एकही महिना जात नाही, की एखादा सेलिब्रेटी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकत नाही. यातील काही वाद मुद्दामून निर्माण केले जातात, काही अनाहुतपण अंगावर येतात तर काही विनाकारणच पेटवले जातात. २०१६ हे वर्षदेखील अपवाद नाही. ‘डिव्होर्स इयर’ म्हणूनही हे वर्ष ओळखले जाणार आहे. ‘असहिष्णुते’पासून ते ‘पाकिस्तानी कलाकार बंदी’ ते ‘सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी’पर्यंत सर्वच विषयांवर काही ना काही वादविवाद रंगले. चला तर मग एक नजर टाकू या वर्षातील काही गाजलेल्या ‘कॉट्रोव्हर्सी’वर.... Mayur Deokar

हृतिक-कंगनाचा राडा
अत्यंत खालच्या पातळीपर्यंत गेलेले हे प्रकरण पुढे अनेक वर्षे ध्यानात ठेवले जाईल. कंगनाने एका मुलाखतीमध्ये हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते. यावर नाराज होऊन हृतिकने तिला कायदेशीर नोटीस बजावून विनाअट जाहीर माफी मागण्यास सांगितले. कंगनानेसुद्धा मग तेवढ्याच त्वेषाने त्याचे उत्तर दिल्यानंतर वाद वरच्यावर चिघळत गेला. आमचे अफेअर असल्याचे ती सांगत होती, तर हृतिक म्हणायचा, की कंगना बळजबरी त्याच्या मागे लागली असून आतापर्यंत हजारो अक्षेपार्ह ई-मेल तिने पाठवले आहेत. अद्यापही हा वाद शमलेला नसून अधूनमधून ते एकमेकांवर टीका करीत असतात.

अमिताभ-ऐश्वर्याचे नाव पनामा पेपर्समध्ये
जगभरातील काळा पैसा कशाप्रकारे लपवला जातो, याचे पितळ उघड पाडणाऱ्या पनामा पेपर्समध्ये हिंदी सिनेसृष्टीचा शहेनशहा अमिताभ बच्चन संचालित चार कंपन्यांचे नाव समोर आले. हे ऐकून तर सगळी इंडस्ट्री हादरली. एवढेच नाही, तर सून ऐश्वर्याचेही नाव पनामा पेपर्समध्ये समाविष्ट होते. हे सर्व खोटे आहे, असे सांगताना बिग बींच्या नाकी नऊ आले होते.

आमिर खानला भोवली ‘असहिष्णुता’
भारतात ‘असहिष्णुते’चा मुद्दा गरम असताना आमिर खानने कमेंट करत आगीत तेल ओतण्याचे काम केले. तो म्हणाला होता, की ‘माझी पत्नी किरण
राव हिला भारत आता सुरक्षित वाटत नाही. दरम्यान भारत सोडण्याचा विचारसुद्धा मनाला शिवून गेला.’
यावरून एकच वादळ उठले.
आमिरवर चहूबाजूंनी टीका झाली. अनेक महिने त्याला या कमेंटविषयी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

सलमानची रेप कमेंट
सलमान खान आणि वाद यांचे म्हणजे ऊन-सावलीचे नाते आहे. सल्लूमियाँ काही तरी बेजबाबदार कमेंट करतो आणि मग सुरू होते नवी कॉन्ट्रोव्हर्सी. ‘सुलतान’च्या निमित्ताने तो म्हणाला होता, की ‘या चित्रपटासाठी कुस्तीचे प्रशिक्षण घेताना कराव्या लागलेल्या मेहनतीमुळे माझी अवस्था बलात्कार झालेल्या महिलेसारखी व्हायची.’ अशा असंवेदनशील वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. मीडिया, राजकीय नेते, सामाजिक संस्था, महिला आयोग सर्वांनीच त्याला फैलावर घेतले. अखेर मुलाच्या मदतीला वडील सलीम खान यांना पुन्हा यावे लागले आणि त्यांनी मुलातर्फे माफी मागितली.

सलमान खानचे पाक कलाकारांना समर्थन
‘उरी हल्ल्या’नंतर बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालावी, अशी मागणी होत असताना सलमानने त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले. ‘पाकिस्तानी कलाकार वैध कागदपत्रे, व्हिजा आणि वर्क परमिट घेऊन येथे येतात. त्यांना तुम्ही दहशतवादी कसे म्हणू शकता?’ असा सवाल करून त्याने बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला.

‘ऐ दिल है मुश्किल’ची मुश्किल
करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता असल्यामुळे राज ठाकरेंची पार्टी मनसेने चित्रपटाचे प्रदर्शन होऊ न देण्याची भूमिका घेतली. फवादचे सर्व सीन्स डिलीट करा; अन्यथा आम्ही फिल्म रिलीज होऊ देणार नाही, असे फर्मान त्यांनी सोडले. यावरून करण चांगलाच अडचणीत सापडला. परेशान होऊन त्याने स्वत:चे देशप्रेम व्यक्त करण्यासाठी पुन्हा कधीच पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नसल्याचे व्हिडिओद्वारे सांगितले. पुढे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने राज ठाकरेंच्या काही अटी मान्य करून हा चित्रपट प्रदर्शित झाला.

उडता पंजाब वि. सेन्सॉर बोर्ड

‘उडता पंजाब’ चित्रपटातील एक-दोन नाही, तर एकूण ९४ दृश्ये कापण्याचा आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने निमार्ता अनुराग कश्यम व सहकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी त्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू होता. बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी बंड पुकारून अखेर एक बदल मान्य करून चित्रपटाला ‘ए’ प्रमाणप्रत्र मिळवले आणि सिनेमा रिलीज केला.

नसीरुद्दिन शहांचे राजेश खन्नावर टीकास्त्र

आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखले जाणारे व्हेटरन अ‍ॅक्टर नसीरुद्दिन शहांनीसुद्धा काही तिखट वक्तव्ये करून वाद निर्माण केले. हिंदी सिनेमातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे सुमार दर्जाचे नट होते, अशी टिप्पणी नसीरुद्दिन शहांनी केली. त्यांची ही प्रतिक्रिया खन्नांची मुलगी ट्विंकल हिला चांगलीच झोंबली. तिने शहांवर ट्विटरवरून घणाघातील हल्ला केला. अखेर दोन पावले मागे घेऊन शहांनी माफी मागून या प्रकाराणाला पूर्णविराम दिला.

अजय देवगण वि. केआरके वि. करण जोहर

सहसा विवादांपासून चार हात लांब राहणाऱ्या अजय देवगणने स्वयंघोषित समीक्षक कमाल आर. खानच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्नी काजोलचा बेस्ट फ्रेंड करण जोहरवर हल्ला चढवला. ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ एकाच दिवशी रिलीज झाले. करणने ‘शिवाय’ची बदनामी करण्यासाठी केआरकेला २५ लाख रुपये दिल्याचा आरोप अजयने केला.
पुरावा म्हणून त्याने केआरकेशी फोनवर झालेले संभाषण रेकॉर्ड करून ट्विटरवर शेअर केले. त्यातून निष्पन्न तर काहीच झाले नाही. केआरकेला मात्र फुकटची प्रसिद्धी मिळाली.

Web Title: Hot Controversy in 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.